व्याख्यानमाला - १९७३

Vyakhyanmala 1973
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला  


वर्ष पहिले १९७३

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

“यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’’ गेल्या वर्षी सुरू झाली. त्यानिमित्ताने ज्या थोर विचारवंताची तीन व्याख्याने झाली;  त्याची ही मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देताना मनाला एक समाधान जाणवते.

साहित्ये, सौंर्द्य, संगीत, क्रीडा करमणूक या समाजजीवनाला समाधान देणा-या गोष्टी आहेत. शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्ताने कराड नगर पालिकेने या संदर्भात कराडची एक वैशिष्ठ्यपूर्ण अभिरूची निर्माण केली आहे. त्याचबरोबर आजच्या गतिमान कालखंडात, नव्या पिढीतील समाजघटकांत चिकित्सक नि अभ्यासूवृत्ती वाढीस लागावी. सामाजिक; राजकीय, आर्थिक समस्यांचा आणि स्थित्यंतरांचा परिचय व्हावा ही निकडीची गरज आहे. समाजातील विचारवंतांचे विचारधन मुक्तपणे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यांत येत असते. एका प्रयत्नवादी, अभ्यासू नि यशस्वी अशा सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जन जागरणाचे: संस्काराचे कार्य आरंभिले आहे!

यशवंतरावजी चव्हाण क-हाडचे सुपुत्र आहेत, अखिल भारतीय नेतृत्त्व त्यांच्या परिश्रमाना लाभलेले फळ आहे. त्यांचा वाढ दिवस हा प्रत्येक कराडकरांच्या जीवनातील एक ममत्त्वाच्या भावनेंने हेलावणारा दिवस आहे!

यशवंतरावजी चव्हाण यांचा स्वरूपात दिसणारे हे नेत्रदीपक प्रज्ञाप्रचीतीचे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व कलेकलेने साकारत गेले; त्याचा विचार नि उच्चार समाज परिवर्तनाला उपकारक ठरेल या भावनेने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यांत निश्चित औचित्य आहे! सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचा परिचय होत राहिला; विचार-विवेक-विमर्ष या विचार मंथनाच्या प्रक्रिया व्यक्तीच्या जीवनावर जर संस्कार करून गेल्या तर कोणता सामाजिक अविष्कार दिसू शकतो त्याचे य़शवंतरावजी चव्हाण हे मूर्तिमंत उदाहरण आहे!