व्याख्यानमाला१९७३-४

राजकारण या शब्दाचा वापर करताना आपण निर्भत्सनेचा अंश मनात बाळगतो. ‘राजकारण खेळु लागला’ याचा अर्थ करताना ‘Everything is fsir in war’ या वाक्यप्रचाराची छाया मनात असते. ‘या संस्थेत राजकारण शिरले आणि खेळखंडोबा झाला’ असे म्हणताना राजकारण हे खळखंडोबा करणारेच आहे असे आपण मानतो. ही विधाने करताना  राजकारण या शब्दाचा अर्थच आपण मर्यादित करीत असतो. येनकेन प्रकारेण सत्ता मिळवणे आणि टिकविणे व यासाठी बरेवाईट करीत असतांना संस्थेचा विचार न करणे, पक्षाचा विचार न करणे, देशाचा विचार न करणे हा राजकारणाचा मर्यांदित अर्थ आहे. या क्षेत्रात वावरणारे लोक अनेकदा असाच विचार करतात. कांही विचारवंत मानतात की मनुष्य मुळात कितीही चांगला असला तरी राजकारणांत सत्ता प्राप्त झाल्यानंतर. ‘Power  corrupts “ absolute power corrupts absolutely” सत्ता मणसाला बिघडवते व अमर्याद सत्ता माणसाला अमर्यादपणे बिघडविते.

पण खरे म्हणजे राजकारण हे एक अत्यंत अवघड असे व्रत आहे. असिधाराव्रत आहे. म्हणून टिळक, जवाहरलालजी, गांधीजी इत्यादींविषयी आदर वाटण्याचे कारण हे की तेथे त्यांनी व्रतपालनाची जाणीव आणि वृत्ती कायम ठेवली. हें क्षेत्र उजळणारे हे लोक ठरले. Spiritualisation of  Politics  असे गांधीजी म्हणत असत. व्यक्तिगत सत्तेच्या पलिकडे जाऊन नैतिक मूल्यांवर सत्ता दृढ करावी. हे शिक्षण नामदार गोखल्यांकडून भारतीय राजकारणाला मिळालेले आहे.

आपली नेत्याकडून त्या त्या वेळी एवढीच अपेक्षा असते की त्याने लढाई जिंकली पाहिजे, मग ती अपेक्षा नेत्याचीही असली तर फारशी चूक का मानावी?  क्रीडाक्षेत्रातही ही अपेक्षा असते. पाचव्या टेस्टच्यावेळी ड्रॉ होण्याची भूमिका वाडेकर घेतो. म्हणजे क्रीडाक्षेत्रातही मनाची तयारी होत नाहीं;  मग राजकारणात तर  ते अनंत पटींनी अवघड आहे. भारत स्वतंत्र झाला नाही तरी चालेल, पण नैतिक मूल्यांना धक्का लागता नये असे म्हणणारे एखादेच गांधीजी असतात. हे शंभर टक्के नेहमीच शक्य नाही; परंतु जाण्याची दिशा कोणती राजकीय जीवनातली महत्वाची गोष्ट असते. वाडेकर काय करतो ही गोष्ट एका दृष्टीने महत्त्वाची आहे. पण पन्नास हजार प्रेक्षक आणि रेडिओ ऐकणारे पन्नास लाख म्हणत की Why don’t you declare ? ‘ नो दुराणी नो टेस्ट ’ म्हणणारे लोक ‘ No declaration, no  test’ म्हणत नाहीत. आपल्या स्वार्थासाठी नेत्यांनी सर्व कांही केले पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. नेत्याला जनतेच्या पुढेच कांही पावले चालत जावे लागते. असेच एक विद्यार्थ्यांचे शिबीर भरले होते. ‘ भारताची सद्य: स्थिती ’ हा चर्चेचा विषय होता. भारत ज्या दुर्गतीला गेलेला आहे त्याची मीमांसा चालली होती. पक्ष, नेते इत्यादीना दोष देणारी, तारूण्याला साजेशी भाषणे होत होती. एकाने प्रश्न मांडला, की ‘ भारत दुर्गतीला गेलेला आहे, याला जबाबदार अनेक लोक व पक्ष आहेत. पण भारताच्या दृष्टीने अनुचित असे माझ्या हातून काही घडले आहे काय, याचा आपण प्रत्येकाने विचार करू या.’  विचारासाठी पाच मिनिटे वेळ देण्यांत आला. त्यानंतर एकाने म्हटले, ‘ मी रेल्वेचा प्रवास तिकीट घेतल्याशिवाय केला, ही अनुचित गोष्ट मी केली.’  मग इतरांनाही धीर आला. प्रत्येकाने आपली ही अशीच घटना सांगितली. त्या विद्यर्थ्यांनी आपण चुकवलेले पैसे स्टेशनमास्तरना नंतर नेऊन दिले !

तेव्ह आपण ज्या वेळी नेते काय करतात याचा विचार करतो, तेव्हा ‘ आपण ’ काय करतो हाही विचार केला पाहिजे. माझ्या अंगात जेवढी शक्ती आहें त्या आधाराने मी काय करतो आहे, हा विचार प्रत्येक व्यक्तीने करणे हा राजकारणाचा समानजीवनाशी संबधित भाग आहे. आपण असे समजतो की पाच वर्षातून एकदा मतदान करून आपण आपली जबाबदारी संपवासची आहे. ही मनोवृत्ती असेल तर लोकशाही समाज उभाच राहू शकत नाहीं.