व्याख्यानमाला१९७३-६

अशी समाजरचना हवी की जेथे शासनसंस्थाच अस्तित्त्वात असणार नाही. मग राजकारण बाहेर जावून समाजरचनाच अस्तित्वात राहील. मार्क्सचे म्हणणे असे की ही गोष्ट केवळ शक्यच नव्हे, तर अटळ आहे. ज्यावेळी समाजात वर्गच असणार नाहीत त्या वेळी एका वर्गाने राज्य करण्याचा प्रश्नच येणार नाही. The state shall whither away.

आदर्शामध्ये शासनसंस्था नसेल आणि शासनविहीन सुसंघटित समाज अस्तित्वात असेल. हा आदर्श केवळ मार्क्सचा नाही. गांधीजींचा आदर्शही राजनीती नसावी, लोकनीती असावी असाच होता.

राज्यसंस्था नसावी, म्हणजे अराज्यवाद, म्हणजे अनार्किझम म्हणजे अराजक, म्हणजे सावळांगोंधळ ? यालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. समाजरचना बदलण्यासाठी अवधाने ठेवावी लागतात काही लोकांनी याकरिता अत्याचाराचा मार्ग स्वीकारला. शासनसंस्था नाहीशी केली पाहिजे, म्हणजे शासनकर्त्याना ठार केले पाहिजे असे त्यांनी मानले. या पण पध्दतीने केवळ एक शासनकर्ता जाऊन त्याच्या जागी दुसरा येतो. शासन संस्थेचा निरास करणे ही गोष्ट वेगळीच आहे. शासनकर्ते म्हणजे शासनसंस्था नव्हे. गांधी, विनोबा, जयप्रकाश यांच्यासारखे लोकही अराज्यवादाचा पुरस्कार करतात ही कल्पना देखील फार पूर्वीच्या काळापासून आहे. महाभारतात या आदर्शाचे वर्णन आहे.

“ नैवराज्यं न राजासीत् न दण्ड्यो न च दण्डिक: |
धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म परस्परम् |”

अर्थात धर्म म्हणजे नीतिनियम, सामाजिक वागणुकीचे नियम. तर असे शासनविहीन राज्य हे कल्पनेच्या आदर्शात शक्य आहे.

ज्या प्रमाणात समाजाची पातळी वरवर चढत जाते, त्या प्रमाणात बाह्य बंधनांची आवश्यकता कमी होत जाते. ही पातळी समाजातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी ओळखून वर न्यायची असते. सर्व माणसे देवमाणसे झाली तरच हे घडू शकेल असे मानण्याचे कारण नाही. तोच माणूस वेगवेगळ्या पध्दतीने वागत असतो. उदाहरणार्थ, एखादा बसस्टॉप घ्या. तिथे क्यू लावलेला नाही. अशा वेळी मी जर विचार केला की मीच एकटा रांगेने जाईन, सर्व लोक बसने निघून जातील आणि मी जागच्या जागीच राहीन. माझ्या अंगावर मुंग्याचे वारूळ तयार होईल तरी मला बस मिळणार नाही. म्हणून मलाही पुढे घुसूनच बस पकडावी लागते. इथे माझा दोष नाही तर रचनेचा दोष आहे. आज आपण शासनयंत्रणेकडून सगळ्या अपेक्षा ठेवतो; परंतु या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कांही रचनेची जबाबदारी आपलीही आहे. लोकशाहीचे खरे सामर्थ्य जितके वाढत जाईल तितके आपोआपच शासनाचे सामर्थ्य व व्याप कमी होत जातो. जनतेच्या सर्वसाधारण वृत्तीचे प्रतिबिंब शासनात उतरणे हे महत्त्वाचे आहे. शेवटी ध्येये ही ता-याप्रमाणें असतात आपण ता-यांपाशी पोचू शकत नाही. पण ता-याचा मागोवा घेतच खलाशी जात असतात राजकारण आणि समाजजीवन यांच्या एकात्मेच्या ध्येय ता-याच्या प्रकाशात आपल्या जीवनप्रवासाचा मार्ग आपल्याला आखता येईल.