व्याख्यानमाला१९७३-३

व्याख्यान पहिले - दिनांक : १२-३-१९७३

विषय- “राजकारण आणि समाजजीवन"

व्याख्याते - प्राचार्य देवदत्त दाभोळकर, फर्ग्युसन कॉलेज, पुणे ४.

जशी आरोग्याविषयी आस्था असली पाहिजे, तशीच राजकारणाविषयी आपल्या आस्था असली पाहिजे. राजकारण हा प्रत्येक व्यक्तीच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय मानला पाहिजे. सामाजिक जबाबदारीचा हा एक भाग आहे. राजकारणात नसणारा मनुष्य, या दृष्टिने पाहता समाजात असू नये.

जीवनाचे तत्वज्ञान हे प्रत्येकाचे काही ना काहीतरी असतेच. एखादा म्हणतो की जीवनाचे तत्वज्ञान नाही, पण ‘माझं काही तत्वज्ञान नाही’ हे देखील एक तत्वज्ञानच. या दृष्टीने ‘माझा राजकारणाशी संबंध नाही’ ही देखील राजकारणाकडे पाहाण्याची एक दृष्टीच आहे.

माझी विचारसरणी या बाबतीत, लोकशाही समाजवादी आहे. यशवंतरावजींचे नेतृत्व प्रभावी आहे, पुरोगामी आहे. पण त्या नेतृत्वाने मी पूर्णपणे संतुष्ट नाही. जवाहरलाल होते त्या पेक्षा अधिक थोर हवे होते असे मला नेहमी वाटते, तसेच यशवंतरावजीविषयीही वाटते.

राजकारण हेच आपले संपूर्ण जीवन असे मानणा-या काही व्यक्ती असतात. उलट राजकारण उत्साहाने करूनही राजकारण म्हणजेच संपूर्ण जीवन नाही हे जाणण्या-या  काहीं व्यक्ती असतात. यशवंतरावजी या दुस-या वर्गातले आहेत. जीवन हे राजकारणापेक्षा मोठे आहे. या वृत्तीतून राजकारणाकडे पाहणारे ते आहेत. ही वृती समाजाच्या दृष्टीने हितावह आहे. जे केवळ राजकारण म्हणून राजकारणाकडे पाहून सत्ता येनकेन प्रकारेण मिळविण्यासाठी मुल्यांचा बळी देणारे निव्वळ राजकारणी असतात ते समाजाला हितावह ठरत नाहीत. उदाहरणार्थ, नेपोलियन, ‘सर्व सत्ता माझ्या हाती रहाण्यासाठीं करावे लागेल ते करीन’ अशी त्याची वृत्ती होती. स्टॅलिन, मुसोलिनी, हिटलर ही आणखी काही अशीच उदाहरणे. याउलट जवाहरलालजींचे व्यक्तिमत्व, गांधीजींचे व्यक्तिमत्त्व, विनोबाजी, जयप्रकाशजी ही दुस-या प्रकारची उदाहरणे आहेत. टिळकही या प्रकारचेच होते. कुठेतरी त्यांच्या मनात राजकारणाच्या पलिकडे जाण्याची उत्कंठा होती. यशवंतराव याच मालिकेतील आहेत. साहित्य, कला आणि संस्कृती यांविषयी त्यांना आस्था आहे. ‘राजकारण आणि समाजजीवन’ या विषयाची निवड करताना समाजजीवनाचे राजकारण हे एक अंग आहे, ही माझी दृष्टी आहे. ही माझी दृष्टी आहे. केन्स हा ऐक मोठा अर्थ—शास्त्रज्ञ होता. तो म्हणतो, ‘मी अशी आशा बाळगतो की एक दिवस अर्थशास्त्राचे महत्व कमी होऊन अर्थशास्त्र आपली योग्य जागा घेईल. साहित्य, संस्कृती आणि कला यांना मानाचे स्थान मिळेल. आज समाजाचे Driving wheel हे अर्थशास्त्र आहे. It Should take the back-seat ” केन्स प्रमाणेंच जवाहरलालजी, गांधीजी, निनोबाजी, इत्यादी नेत्यांना वाटते राजकारण Will eake  the back-seat ही आशा कितपत युक्त आहे या विषयीचे माझे विचार मी मांडणार आहे.