व्याख्यानमाला-१९८६

Vyakhyanmala 1987
यशवंतराव चव्हाण

व्याख्यानमाला

वर्ष चौदावे १९८६

नगरपालिका नगरवाचनालय, क-हाड
---------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

मनोगत - पी. डी. पाटील, नगराध्यक्ष

यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत १९८६ सालातील मा. साहेबांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत मा. श्री. द्वा. भ. कर्णिक, मुंबई यांची तीन व्याख्याने आणि त्याच सालात शारदीय व्याख्यानमालेतील मा. श्री. रायभानजी जाधव, औरंगाबाद यांचे प्रभावी भाषण, यांची एकत्रित मुद्रित प्रत वाचकांच्या हाती देताना संमिश्र भावनांनी माझे मन भरून आलेले आहे.

क-हाडचे सुपुत्र मा. यशवंतरावजी चव्हाण यांचे नेत्रदीपक व्यक्तिमत्व आणि विशेषतः त्यांचे विचार नि उच्चार समाज परिवर्तनाला सहाय्यभूत ठरावे या भावनेने यशवंतराव चव्हाणांच्या नावाने सन १९७३ सालापासून ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आली. आणि काही विचारवंतांच्या सूचनेवरून मालेमधील अभ्यासपूर्ण व्याख्याने पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात येवू लागली. परंतु मागील वर्षात काही अपरिहार्य कारणामुळे त्या प्रथेला खंड पडला होता.

दि. २५-१०-१९८४ रोजी मा. यशवंतरावजी चव्हाण यांचे दुर्दैवी देहावसान झाले, त्यानंतर हा पहिलाच भाषणसंग्रह प्रकाशित करीत आहोत.

ही व्याख्यानमाला यापुढेही अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा आणि त्यापैकी निवडक व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा मनोदय आहे.

आमच्या निमंत्रणाला मान देवून मा. द्वा. भ. कर्णिक मुंबई आणि मा. रायभानजी जाधव, औरंगाबाद या दोन विचारवंतांनी या मालेत व्याख्याने दिलीत त्याबद्दल त्यांचे कृतज्ञतापीर्वक आभार मानणे आमचे कर्तव्य आहे. तसेच लोकमान्य मुद्रणालयाचे संचालक श्री. गजानन गिजरे आणि त्यांचे कुशल, मेहनती कामगार यांनी हे पुस्तक वेळेवर व सुबक छापून दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

हे व्याख्यान पुस्तक आपल्या हाती देताना, ज्यांच्यासाठी उदंड आयुरारोग्य लाभावे अशी करुणा भाकावी त्या यशवंतरावांच्यावर मृत्यूचा घाला पडला आणि या देशातील अतिशय थोर, तळागाळातल्याविषयी अखंड आत्मीयता बाळगणारा सर्वगुण संपन्न असा जाणता नेता कृष्णाकाठी कायमचा विसावला! त्यांच्याच स्मृतीला हे व्याख्यान पुस्तक समर्पण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.