व्याख्यानमाला-१९८६-६

त्याचवेळी राष्ट्रवादाचं बाळकडूही यशवंतरावांना पाजलं जात होतं. लोकमान्य टिळकांच्या उदयाचाच नव्हे तर वैभवाचाही तो काळ होता. न्यायासनासमोर टिळकांनी घनगर्जना करताना म्हटलं की “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.” लोकमान्यांनी स्वराज्य संपादनासाठी होमरूललीगही स्थापन केली. त्यांच्या जोडीला बेझंट बाईनीही तितकीच लढाऊ होमरूललीग स्थापन केली. या लढाऊ कार्यक्रमामुळे यशवंतरावांच्या सारखा संस्कारक्षम तरुण भारावून जाणे साहजिकच होतं. राष्ट्रवादाचं हे बाळकडू यशवंतरावांच्या रक्तात भिनत गेलं.

शिवाय त्यावेळी निरनिराळ्या राजकीय गटांची बौद्धिके होत असत. यशवंतरावांचेच काय, आमचेही राजकीय शिक्षण त्या बौद्धिकातूनच झालेले आहे. आता ही बौद्धिके होतात किंवा नाही याची मला माहिती नाही. कदाचित् पुढा-यांप्रमाणे अनुयायीही आता शिक्षणाच्या बाबतीत बनचुके झाले असणे शक्य आहे. पण त्यावेळी कम्युनिस्ट, रॉयवादी, समाजवादी अशा डाव्या गटाच्या लोकांची सर्रास बौद्धिके होत असत आणि त्यातून तरूण मंडळींना निरनिराळ्या विचारांचा मागोवा घेता येत असे. आम्हाला नवोदित पुढा-यांच्या विचारसरणीचाही मागोवा घेता येत असे. यशवंतरावांच्या विचारसरणीचा जो कल मला दिसून आला तो ध्येयवादित्वावर आधारलेला होता. राजकारणात त्यांची जी धारणा होती ती संपूर्ण स्वातंत्र्याचा ध्यास घेणारी धारणा होती. लोकमान्य टिळकांची होमरूललीग ही त्यांना मान्य होती याचे कारण स्वातंत्र्य आंदोलनातील ते पहिले पाऊल होते. त्या चळवळीमधूनच देशातील व्यापक राष्ट्रवादी चळवळीचा उगम झाला. यशवंतरावांनी राष्ट्रवादाचा वारसा देणारे पुढारी म्हणून लोकमान्यांचा स्वीकार केला. त्यांच्यानंतर महात्मा गांधींनी रणशिंग फुंकले. राष्ट्रवादाची जागती ज्योत त्यांच्या हाती होती, पण गांधीजींच्या तत्वज्ञानाला आणि विचारसरणीला आध्यात्मिक बैठक होती हे विसरून चालणार नाही. यशवंतरावांनी स्फूर्तिदाते गुरु म्हणून गांधीजींचीच निवड केली. त्यांची धारणा अशी होती की गांधीजींच्या मार्गाने आपण चळवळ चालविली तरच स्वातंत्र्याच्या आंदोलनाला यश मिळू शकेल. गांधीजींनी १९३० साली सविनय कायदेभंगाचा पुकारा केला, तेव्हा उत्स्फूर्तपणे यशवंतरावांनी त्यात उडी घेतली. यशवंतराव त्यावेळी १७-१८ वर्षाचेच असतील. यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय जीवन त्या दिवसापासूनच सुरू झाले. त्यांनी प्रत्यक्ष चळवळीत भाग घेतला, आपल्या विचारांची पठडी तयार केली. समाजाला चालना देण्याच्या दृष्टीने काय काय केले पाहिजे याचे आडाखे बांधले. आणि निश्चित स्वरूपात त्यांनी आपल्या जीवनाची तशीच कार्याचीही दिशा ठरवली. यशवंतरावांचं एक वैशिष्ट्य म्हणून असं सांगता येईल की त्यांनी आपली आकांक्षा देशसेवा आणि ध्येयवाद ही ठरविली आणि मग सबंध भावी आयुष्यात या आकांक्षेपासून ते कधीही विचलित झाले नाहीत.

पुढील काळात यशवंतरावांच्या राजकीय जीवनाला बहर येत चालला आणि ते विधानसभेच्या प्रांगणात चमकू लागले. योगायोग असा की काँग्रेस पक्षाने अधिकारग्रहण केल्यानंतर चव्हाणांची पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. पण त्यांना मोरारजी देसाई यांच्या अधिकाराखालील गृहखात्यात काम करण्याचा आदेश मिळाला. वस्तुतः मोरारजी व यशवंतराव यांच्यामध्ये ध्येय धोरणाच्या बाबतीत कसलेही साम्य नव्हते. मोरारजी यांचे तत्वज्ञान व ध्येय यशवंतरावांना मुळीच मान्य होण्यासारखे नव्हते. पण एक शिस्तबद्ध सैनिक म्हणून यशवंतरावांनी आपल्याकडे सोपविलेली कामगिरी निष्ठेने आणि तितक्याच शालीनतेने पार पाडली. त्याचवेळी त्यांचे विचारमंथन चालूच होते आणि समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने जे एक एक पाऊल पुढे पडत होते त्यात चैतन्य आणण्यासाठी आपल्याला कोणती पूर्वतयारी करता येईल याचाही ते गंभीरपणे विचार करू लागले होते.