व्याख्यानमाला१९७३-५

राजकारण हा शब्द एका अर्थाने चुकीचा. आज तर राजे अस्तित्वात नाहींत, आज ‘राज्यकारण’ हा शब्द वापरावा लागेल. राजाने कसें वागावे याच्याविषयी फार दीर्घ काळ विचार केला गेलेला आहे सर्वाची उत्तरे जवळ जवळ सारखीच दिसून येतात. सर्वांच्यामागे एक गोष्ट निश्चित दिसते की जो राजा आहे तो राजा राहिला पाहिजे. हा अधिकार दुस-याच्या हाती न जाण्यासाठी राजाने कोणते तंत्र वापरावे याचा खुलासा प्राचीनांनी वेगवेगळ्या प्रकारांना केलेला आहे. उदाहरणार्थ, कौंटिल्यानें सांगितले आहे की राजाला पैसे गोळा करायचे असतील तर ऐखाद्या स्थानाचे माहात्म्य वाढवावे. त्यासाठी देवतेची मूर्ति पुरून ठेवून साक्षात्काराने बाहेर काढावी. कोणी शंका घेतल्यास विषप्रयोग करावा. राजाच्या सत्ता असणे हीच गोष्ट महत्वाची होती. सगळी इथे बदलतात. ‘शाकुंतला’ त दुष्यन्ताच्या दरबारात शकुंतला जाते व दुष्यंत तिला झिडकारतो. त्यावेळी तीपसी म्हणतो, ‘अरे, खोटे बोलणे म्हणजे काय हे जिला माहीत नाही अशा मुलीवर, दुस-याला कसे फसवावे हे शास्त्र विद्या म्हणून शिकलेला तू आरोप करतोस ? “ राजाचे कामच ‘ परातिसन्धानमधीयते यै: ‘ ही विद्या शिकण्याचे होते. आपल्या मनांत काय आहे ते दुस-याला कळू न देणे, सत्यापासून दूर जाणे हे मुत्सद्देगिरीचे पहिले लक्षण मानले जाते. डिप्लोमॅट कोण ? तर ‘When he says yes’ , he means ’perhaps’ if he  says ’perhaps’, he means ‘no’ he  is not a diplomat. अशा पध्दतीचे राजकारण राजाच्या बाबत घडत आले त्यावेळी समाज ’ राजा म्हणेल ती पूर्व दिशा ’, ‘ना विष्णु: पृथिवीपति: ’ अशी श्रध्दा बाळगून होता. ‘ राजाचा ईश्वरदत्त अधिकार, ही विचारसरणी समाजाच्या मनात दृढमूल झालेली होती ‘My king right or wrong’ हे स्वामिभक्तीचे लक्षण होते. पती अनाचारी असला तरी त्याच्या एकनिषेठ असणे हा पतिव्रतेचा आदर्श तसेच राजाने आणि पावसाने झोडपले तर मुकाट्याने भोगायचे हा समाजाचा आदर्श होता. या मानसिक आदर्शापासून पुढे जाऊन कोणती ही एक व्यक्ती शास्त नाही, राज्य करणारी जनता ही शासकसत्ता आहे. हा टप्पा म्हणजे फार मोठा टप्पा आहे. वैचारिकदृष्या आपण या टप्पावर आलेले आहोत.

ज्या समाजाच्या आधारावर लोकशाही उभी करावयाची, तो एकसंघ असावा लागतो. कोणताही समाज जितका एकात्म नसेल तितक्या प्रमाणात त्या देशातील लोकशाही दुबळीच राहणार. अकसंधता, एकात्मता म्हणजे ‘माझ्यासारखेच दुस-याचे विचार असले पाहिजेत ’ असे नाही. एकात्मता हवी असेल तर त्यात वेगवेगळे विचार, कल्पना, प्रतिक्रिया असू शकतील, पण सगळ्यांच्या आत ‘ हम सब एक हैं ’ ही भावना मुरलेली असेल ही लोकशाहीची मुख्य अट आहे. हे ऐक संपूर्ण समाजजीवनाचे चित्र आहे. एकात्म समाजाचे चित्र ! ज्या ज्या कारणाने हे शक्य होत नाही त्या सर्व गोष्टींचा विचार आपण नीट केला पाहिजे.

बॅंकेत कर्ज देताना व्यक्तीचे तारण विचारण्यापेक्षा गावाचे तारण का स्वीकीरले जात नाही! त्यामुळे बॅंकांचे काम सोपे होईल. एकेक गांव उभा राहू शकेल. पण ही अत्यंत दुर्घट गोष्ट आहे ज्या गावाकडे अशा तारणावर एक लाख रूपये दिले जातील, त्यांचे वाटप आजच्या परिस्थितीत ‘ हा पुढारी, हा श्रीमंत, हा माझ्या जातीचा ’ अशा पध्दतीने होईल तर त्याचाच अर्थ ते गांव एकात्म नाही. लोक एकत्र राहतात, पण एकात्म नाहीत. जोवर हे असे आहे, समाजात असे गट पडलेले आहेत, तोपर्यत राजकारण हे एका गटाचे दुस-या गटावर आक्रमण ठरणार. हे आक्रमण प्रगट प्रगट असेल किंवा प्रच्छन्न, पण आक्रमण होत राहणारच. मार्क्सं म्हणतो, ‘ State is an instrument in hands of the ruling class for dominating over other classes ’ वरिष्ठ वर्ग शासन संस्था ताब्यात ठेवून त्याचा वापर करतो. मार्क्सच्या दृष्टीने हा वरिष्ठ वर्ग  मुख्यत: आर्थिक असतो. पण वर्ग कोणत्याही कारणाने संघटित झालेले असतील. या संघटित वर्गापैकी एक वर्ग सत्ता वापरीत असतो. मग जनतेचे हित कसे होणार ?