समग्र साहित्य सूची १

खरे तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरच्या महाविद्यालयांतून व विद्यापीठांतून एम.ए. आणि पीएच.डी.पदवीसाठी यशवंतरावांच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा या हेतूने मग मी यशवंतराव चव्हाणांच्या साहित्याची सूची करण्याचे ठरविले. 'सूची' हा त्या व्यक्तिमत्त्वाच्या सांस्कृतिक अंगाचा खराखुरा दस्ताऐवज असतो. शिवाय संशोधन क्षेत्रात 'सूची' ही फार महत्त्वाची ठरते. संशोधकाला सूची शिवाय आपल्या संशोधनाच्या आडरानात प्रकाश गवसत नाही. संशोधनाच्या मार्गातील अनेक अडथळे बाजूस सारण्यासाठी 'सूची' सारखा संशोधकाला जवळचा मित्र नसतो. 'सूची' संशोधनाची गुरुकिल्ली आहे. संशोधनाच्या वाटा उजळणारा तो एक मोठा ठेवा आहे. म्हणून यशवंतरावांच्या समग्र साहित्याची सूची मग आकार घेऊ लागली.

ही सूची करताना मी चिंतन करून त्याच्या काही वाटा ठरविल्या आणि त्याद्वारे विभागश: त्याचे वर्गीकरण करून ग्रंथांचे
, लेखांचे, अग्रलेख, प्रस्तावना, भाषणे, मुलाखती आदींचा तपशील नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे.

या 'सूची' साहित्यात मग यशवंतराव चव्हाण यांची साहित्यसंपदा, यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी प्रकाशित ग्रंथ साहित्य, यशवंतराव चव्हाण यांचे आणि त्यांच्या विषयीचे स्वतंत्र लेख प्रकरणादी ग्रंथानिविष्ट साहित्य असलेले ग्रंथ, यशवंतरावांच्या प्रस्तावना/पुरस्कार लाभलेले ग्रंथ- नियतकालिके, यशवंतराव चव्हाण यांच्या संबंधीच्या प्रकाशित मुलाखती, यशवंतरावांवरील प्रकाशित गौरवांक/विशेषांक, यशवंतरावांनी विविध विश्वविद्यालये, विद्यापीठ पदवीदान समारंभात केलेली भाषणे, इतर महत्त्वाची भाषणे, यशवंतरावांना मिळालेली विविध मान्यवर संस्थांची मानपत्रे, विविध नियतकालिकांच्या संपादकांनी यशवंतरावांच्यावर लिहिलेले संपादकीय अग्रलेख, त्यांच्या व त्यांच्यावर इतरांनी लिहिलेल्या ग्रंथांची परीक्षणे इत्यादी प्रकारांतील साहित्याची साद्यंत सूची तयार केली आहे. (संपादकाला आज अखेर उपलब्ध झालेल्या साहित्याचीच सूची आहे.) त्यामुळे यशवंतरावांच्या या समग्र ग्रंथसूचीद्वारे यशवंतरावांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन त्यातून सहज घडते.

अंधारातून कंदिलाच्या साहाय्याने प्रवास करावा किंवा अनोळखी प्रदेशातून नकाशाच्या साहाय्याने मार्ग शोधून काढावा त्याचप्रमाणे संशोधकांना, अभ्यासकांना हा ग्रंथ मार्गदर्शक झाल्यावाचून राहणार नाही.

ग्रंथालये, दाते ग्रंथ सूची, प्रकाशन डायर्‍या, 'ललित', 'साहित्यसूची' सारख्या मासिकांतून प्रसिद्ध होणार्‍या नवप्रकाशित ग्रंथांच्या याद्या, वृत्तपत्रांतील लेख, अग्रलेख या सर्व नोंदींची मदत घेऊन या सूचीला 'सशक्त' करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ग्रंथातील सूचीच्या नोंदी करण्याचे कामी माझ्या दोन विद्यार्थिनी कु. प्रतिभा ताटे व सौ. वैशाली शिंदे आणि माझी नात कु. प्रतिभा पाटील यांनी बहुमोल मदत केली; त्यामुळे पुस्तक वेळेत तयार झाले.

- वि. वि. पाटील