विदेश दर्शन
संपादक : रामभाऊ जोशी
-------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
प्रस्तावना
यशवंतराव चव्हाण यांचे, दीर्घकाल विश्वासात असलेले मित्र व चरित्रकार रामभाऊ जोशी यांच्या हाती 'विदेश-दर्शन' हा पत्रसंग्रह यशवंतरावांनी देऊन ठेवला होता. भारताच्या केंद्रसरकारचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व विदेशमंत्री या अनेक प्रकारच्या नात्यांनी ज्या विदेश-यात्रा यशवंतरावांच्या घडल्या, त्या यात्रांमधील विदेशांतून पाठविलेल्या पत्रांचा हा संग्रह आहे.
ही पत्रे त्यांनी त्यांच्या पत्नी सौ. वेणूताई यांना लिहिलेली आहेत. वेणूताईंची प्रकृती नेहमीच अस्वस्थ होती. यशवंतराव हे केंद्रीयमंत्री म्हणून प्रवासाला निघाले असताना, वेणूताईंनी त्यांच्यासह प्रवासाला निघणे क्रमप्राप्त व उचित झाले असते; परंतु यशवंतरावांच्या कार्यक्षमतेला ताण पडू नये म्हणून यशवंतरावांची त्यांना बरोबर घेण्याची उत्कट इच्छा असूनही वेणूताईंनी प्रवास नाकारला.
ही स्थिती यशवंतरावांना अस्वस्थ करणारी होती; परंतु नाइलाज होता. वेणूताई आपल्या प्रवासात सहभागी नसल्या, तरी त्यांना पत्रद्वारे विदेश-दर्शन व्हावे अशी त्यांची उत्कट इच्छा या पत्रलेखनाच्या रूपाने सफल झाली. रसिक वाचकही वेणूताईंप्रमाणेच हा पत्रसंग्रह वाचत असताना विदेश-दर्शनात रमतो. भारताचा एक अग्रगण्य, दूरदर्शी, बहुश्रुत, प्रज्ञावंत मुत्सद्दी या रूपात या 'विदेश-दर्शन' पुस्तकात यशवंतरावांचेही दर्शन घडते.
नोव्हेंबर १९६३ ते जानेवारी १९७७ एवढया दीर्घ कालखंडात विस्तारलेला हा पत्रसंग्रह आहे. प्रवासवर्णन म्हणून जो ललित साहित्याचा सुप्रसिध्द आकृतिबंध आहे, तो आकृतिबंध या पत्रव्यवहारालाही सहज रीतीने प्राप्त झालेला आहे.
आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि अन्य अनेक द्वीपे या पत्रव्यवहाराने व्यापली आहेत. ही एक तऱ्हेची पृथ्वीप्रदक्षिणाच आहे. बहुतेक प्रवास विमानातून केलेला आहे. त्याबद्दल ते म्हणतात, ''विमानातून प्रवास करताना सबंध मुलुख डोळयांखालून जातो आणि मग त्याचे वैभव मनावर ठसते.''
ते जेथे-जेथे जातात, तेथील विशिष्ट समाजजीवन, प्रदेशाचा निसर्ग आणि त्या प्रदेशाचा इतिहास, त्यांच्या मन:चक्षूंपुढे उभा राहतो. त्या त्या प्रदेशाची नैसर्गिक व ऐतिहासिक सगळी महत्त्वाची वैशिष्टये ते या पत्रव्यवहारात बिनचूक रीतीने टिपत जातात. राजकारण आणि अर्थकारण या दृष्टींनी त्या त्या प्रदेशाचा ते सखोल वेध घेतात, कारण विदेशगमनाचे ते मुख्य प्रयोजन असते.
ते जेथे-जेथे जातात, तेथील विशिष्ट समाजजीवन, प्रदेशाचा निसर्ग आणि त्या प्रदेशाचा इतिहास, त्यांच्या मन:चक्षूंपुढे उभा राहतो. त्या त्या प्रदेशाची नैसर्गिक व ऐतिहासिक सगळी महत्त्वाची वैशिष्टये ते या पत्रव्यवहारात बिनचूक रीतीने टिपत जातात. राजकारण आणि अर्थकारण या दृष्टींनी त्या त्या प्रदेशाचा ते सखोल वेध घेतात, कारण विदेशगमनाचे ते मुख्य प्रयोजन असते.