शब्दाचे सामर्थ्य

Shabdhanche Samrthya 1
शब्दाचे सामर्थ्य

संपादक : राम प्रधान
-------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा

मनोगत
राजकारण व साहित्य यांच्यामध्ये समन्वय साधणारे यशवंतराव चव्हाण एक दुर्मीळ पुढारी होते.‘राजकारण व साहित्य - दोघांचेही माध्यम शब्द आहे. राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधू असतात,’असे प्रतिपादन करताना त्यांनी म्हटले,‘शब्दाच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य शब्द करतात, तसेच, साम्राज्यशक्ती धुळीला मिळविण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दांत आहे. कल्पना, विचार आणि शब्द ही मानवी इतिहासातील एक जबरदस्त शक्ती आहे.’

‘शब्दाचे सामर्थ्य’ या ग्रंथाची प्रेरणा वरील विचार आणि शब्दांत प्रतिबिंबित झालेली आहे. सुदैवाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचा विश्वस्त म्हणून त्यांची कागदपत्रे व लिखाण तपासणीचे काम काही वर्षांपूर्वी मी स्वीकारले. त्यात यशवंतरावांचे अनेक मूळ लेख पाहावयास मिळाले. बरेच लेख केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स व अनेक दिवाळी अंकांत वेळोवेळी प्रसिद्ध झाले होते.‘कृष्णाकाठ’व‘ॠणानुबंध’या आत्मचरित्रात्मक पुस्तकांत यशवंतरावांनी बर्‍याच लेखांचा उपयोग केला आहे. याव्यतिरिक्त अनेक मराठी पुस्तकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिल्या. प्रसंगी संदेश पाठविले व लेख लिहिले. या सर्व लिखित शब्दांबरोबर त्यांनी अनेक प्रसंगी केलेली भाषणेही सुदैवाने लिखित स्वरूपात वाचावयास मिळाली. या सर्वांतून यशवंतराव चव्हाण एक विचारवंत राजकीय नेता, असामान्य साहित्यिक आणि शब्दांचा भोक्ता, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यासमोर उभे राहिले. या ग्रंथात ते व्यक्तिमत्त्व मी सादर करण्याचा प्रयत्‍न केला आहे.

यशवंतराव चव्हाण म्हणजे एक देशभक्त, मुत्सद्दी, व्यवहारी राजकारणी व महाराष्ट्राचे शिल्पकार अशी ओळख सामान्यतः महाराष्ट्राच्या नवीन पिढीसमोर आहे. मागील पिढीतील ज्या लोकांचा यशवंतरावांशी संबंध आला अथवा त्यांना त्यांचे निरनिराळ्या क्षेत्रांतील कार्य पाहावयास मिळाले, तसेच, प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून त्यांचे उत्स्फूर्त विचार ऐकावयास मिळाले, त्यांनी यशवंतरावांचे असंख्य गुण अनुभवले. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर कित्येक मान्यवर व्यक्तींनी त्यांच्याविषयी लिहिताना त्यांनी पाहिलेल्या व अनुभवलेल्या अशा कित्येक पैलूंविषयी लिहिले. त्यामध्ये समाविष्ट असलेले काही पैलू म्हणजे, रसिक मन, विचारवंत, गुणग्राही, सौजन्यमूर्ती, दिलदार मित्र, लोकांच्या प्रेमात गुरफटलेला नेता, समर्थ, लोकशाहीचे पुरस्कर्ते, थोर चारित्र्यसंपन्न समाजसेवक, अभिरुचिसंपन्न कलारसिक, सुसंस्कृत राजकारणी, ओजस्वी वक्ता, सह्याद्रीचा प्रतिभासंपन्न भूमिपूत्र, मराठी मानाचा तुरा, इ.इ. परंतु माझ्या मते भावी पिढीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे कोडे म्हणजे यशवंतराव बळवंतराव चव्हाण ही असामान्य व्यक्ती कशी निर्माण झाली? कोणते संस्कार व कोणत्या व्यक्तींनी त्यांची बुद्धी, मन व विचार यांची जडणघडण केली? व त्यांनी महाराष्ट्राच्या पुढील पिढीसाठी काय वारसा ठेवला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याच लिखाणांचे उत्खनन करून शोधावी, या भावनेने या ग्रंथाची योजना हाती घेऊन त्याचे संपादन केले आहे.