शब्दाचे सामर्थ्य ९

जतींद्रांचा आत्मयज्ञ ही एकच एक घटना त्या दिवशी सर्वांमुखी होती. वृत्तपत्रात मी त्या आत्मयज्ञाचे वृत्त वाचले आणि या प्रसंगाने मी भांबावून गेलो. जतींद्रांनी देशासाठी प्राण दिला, या घटनेने मला बेचैन केले. काय होत आहे, हे समजेनासे झाले. देहाचे व्यापार सुरू होते; परंतु मनाचे व्यवहार उधळले होते. परमदुःखाच्या खोल गर्तेत मी कुठे तरी पडलो आहे, असे स्पंदन मनात कोठे तरी चालू होते; परंतु कोठे जावे, काय करावे, कोणाला सांगावे, हे काही सुचत नव्हते. बधिर झालेल्या मनाने ती तसाच चालायला लागलो आणि चालता-चालता रडायलाही लागलो. मी केव्हा रडायला लागलो, हेही मला समजले नाही. गावातील घरे ओलांडून मी पुढे चाललो होतो. ती निर्मनुष्य घरे मला भयाण वाटली. सायंकाळी नदी ओलांडून जाताना नेहमी घरट्याकडे जाणारे पक्ष्यांचे थवे मला त्या दिवशी आढळले नाहीत. रानात भिरभिरणारा वारा सुस्तावला होता. झाडेझुडुपे स्तब्ध झाली होती. सारे वातावरण कुंद बनले होते. माझ्या मनाचे प्रतिबिंब मला जणू चराचरांत दिसत होते. त्यामुळे तर मी अधिकच व्याकूळ झालो. दिवस संपून गेला होता. मी वस्तीवर पोहोचलो, तेव्हा कडुसं पडलं होतं. वाढत्या अंधकारात झोपड्यांतील मिणमिणते दिवे वातावरणाला उजाळा देण्यास असमर्थ होते. काळ्या रानातील त्या काळ्या अंधारात नेहमी तासन् तास तारकांशी खेळ खेळणारा मी, त्या रात्री तारकापुंजात जतींद्रनाथ मला कुठे दिसतात का, हे शून्य दृष्टीने पाहत होतो. पोटात भूक असूनही अन्नावरची वासना उडाली होती. तहान-भूक हरपलेल्या स्थितीत मी एकच एक करीत होतो... एकसारखा रडत होतो. आई समजावीत होती आणि मी रडत होतो.

अशा स्थितीत रात्र सरली; पण माझे रडणे संपले नाही. मातेचे मऊ मन माझ्यामुळे मरगळून गेले होते. कलकत्त्याचे कोणीतरी निधन पावले, म्हणून मी दुःख मानावे, हे आईला समजत नव्हते. माझ्या केविलवाण्या मनःस्थितीचा तिच्यावर वेगळाच परिणाम झाला.  ‘मुलाला काय झाले आहे, पाहा, हो, याला कोणाला तरी दाखवा हो’असे ती शेजार्‍याना म्हणत होती. मी हे सारे समजत होतो; पण माझे मन आईला खुले करून कसे दाखवावे, हे मला उलगडत नव्हते.

जतींद्रांच्या देहातील राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रखर तेजोवलय माझे अंतःकरण छेदून गेले. हे मी या माउलीला कसे समजावून सांगणार होतो? एवढे मात्र खरे की, त्या घटनेने माझ्या चित्तवृत्तीत बदल झाला. देशात घडणार्‍या घटनांचे अर्थ मला अधिक जवळचे वाटू लागले. मी त्यांचे अर्थ समजावून घेण्याच्या मनःस्थितीपर्यंत पोहोचलो. कराडचे आमचे त्या वेळचे नेते श्री. बाबूराव गोखले, सदाशिवराव आळतेकर, त्यांचे चिरंजीव गणपतराव आळतेकर, माझ्या शाळेतील राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षक या सर्वांचे व्यक्तिमत्त्व माझ्या मनावर काही संस्कार घडवीत होते. ते जे बोलत असत, ते मी मनाने टिपत होतो. त्यादृष्टीने १९२७ ते १९४० हा बारा-तेरा वर्षांचा काळ शिक्षणाबरोबरच माझी राजकीय मनोभूमी तयार होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या काळात राजकीय चळवळ, तुरुंगवास, वैचारिक खळबळ अशा कितीतरी घटना घडल्या. अशा वेळी मला मित्रांची बहुमोल मदत झाली आहे. किंबहुना माझे व्यक्तिमत्त्व हे माझ्या सर्व मित्रांच्या आशीर्वादाचे आणि प्रयत्‍नांचे दृश्यरूप आहे, असेच मी मानतो.

१९३० साली मी राष्ट्रीय चळवळीत उतरलो, त्या वेळी माझ्या मनात एक वैचारिक द्वंद्व निर्माण झाले. स्वातंत्र्य-चळवळीला सामाजिक व आर्थिक स्वरूपाची एक बाजू असावी, असे मला नेहमी वाटे. त्यादृष्टीने रॉय यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर अधिक पकड करू शकला.

सांप्रदायिकतेने एखाद्या विचारांशी बांधून घेणे हा माझा स्वभाव नाही. जे मला पटत नाही, त्या विचारातून आणि कृतीतून दैनंदिन जीवनाला योग्य ते मार्गदर्शन लाभणार नसेल, तर मी अशा विचारापासून अलग होत गेलो आहे. वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा मी तोच जाणतो की, ज्यातून कार्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो. तसे न होईल, तर त्या विचारातच काहीतरी चूक असली पाहिजे, असे समजण्यास हरकत नसावी. तशी चूक असेल, तर विचार तपासण्याची माझी वृत्ती असते. १९४० पासूनची ती वैचारिक बैठक राजकीय प्रवासातील माझी कायमची सोबत झाली आहे.