शब्दाचे सामर्थ्य ४

राजकारण व साहित्य यांच्यामध्ये समन्वय साधणारे यशवंतराव हे एक असामान्य व्यक्ती होते, यात शंका नाही. साहित्य व शब्दांवरील प्रेम, त्याविषयी आपले विचार त्यांनी निरनिराळ्या प्रसंगांत मांडले आहेत. त्यावरून साहित्यिक यशवंतराव याविषयी बोध सहज उपलब्ध आहे. त्यांच्याच शब्दांत,‘साहित्य हे एक सामर्थ्य आहे. कारण ते विचार देणारे आहे. बंदुकीच्या गोळीने प्राप्त होत नाही, ते सामर्थ्य विचारांतून येते, संस्कारांतून येते आणि हे काम साहित्यामार्फत घडते.’परंतु केवळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य नाही, असे त्यांचे मत होते.‘जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी मोलाची भर कुणी घालू शकेल, असे मला वाटत नाही,’असे ते एका भाषणात म्हणाले होते.

यशवंतरावांच्या भाषाशैलीकडे पाहता, असे वाटते की, एक साहित्यिक म्हणून यशवंतरावांनी जगावयाचे ठरविले असते, तर मराठी भाषा कितीतरी पटीने समृद्ध झाली असती.‘यशवंतराव : एक साहित्यिक’या शीर्षकाखाली दि. १ मे, १९७५ च्या ‘समर्थ’साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात ना.सी.फडके यांनी लिहिले होते की,‘यशवंतराव मला अधिक प्रिय वाटतात, ते साहित्यिक आणि वक्ता या दोन्ही नात्यांनी.... यशवंतरावांची प्रभावी वाणी जशी स्पृहणीय आहे, तसाच, त्यांच्या लेखणीचा संचार कौतुकास्पद आहे. नेता आणि शासनकर्ता अशी जोड भूमिका यशवंतरावांना करावी लागत असल्याने त्यांच्या वाणीचा विलास नित्य होत असतो. त्यामानाने त्यांचे लेखन अधूनमधून क्वचित वाचावयास मिळते. पंरतु जेव्हा जेव्हा ते लेखणी उचलतात, तेव्हा तेव्हा अशा काही उत्कृष्ट दर्जाचं साहित्य त्यांची लेखणी निर्माण करून जाते, की वाचक थक्क होऊन जातो. राजकारण व राज्यकारभार यांची धुरा यशवंतरावांनी खांद्यांवर घेतली आहे खरी, परंतु त्यांच्या मनाला खरे आकर्षण आहे साहित्याचे नि कलांचे... यशवंतरावांचे पडलेले भाषण जसे कधी कुणी ऐकलेले नाही, त्याचप्रमाणे फसलेला लेख मी कधी वाचलेला नाही. क्वचित प्रसंगी त्यांची लेखनाची पातळी इतक्या उंचीवर गेलेली असते, की ती पाहून मी स्तिमित होतो.’

भाषण कसे व किती लांब करावे, याविषयी यशवंतरावांनी आपले विचार‘भाषा म्हणजे संवादच’या लेखात मांडले होते. तो लेख आत्मविश्लेषणात्मक असल्यामुळे या ग्रंथात समाविष्ट केला आहे. विद्यार्थिदशेपासून त्यांनी भाषणे केली. त्यांच्याच शब्दांत म्हणावयाचे, तर :‘आजच्या काळात माझी होणारी वेगवेगळी भाषणे यांचे तीन-चार प्रकार करावे लागतील. राजकीय विषयावरची पक्षासाठी केलेली भाषणे, साहित्यविषयक सभांतून केलेली भाषणे व लोकसभेमध्ये केलेली भाषणे अशा प्रकारचे भाषणांचे वेगवेगळे गट होतील. त्या प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो व त्याच्यासाठी स्वीकारल्या जाणार्‍या शैलीतही फरक असतो. आता शैलीत फरक आहे, असे जरी मी म्हणत असलो, तरी या वेगवेगळ्या शैलींत भाषण करणारा मी एकच माणूस असल्यामुळे माझ्यामधली शैली सर्वच ठिकाणी असते, परंतु विषय मांडण्याच्या पद्धतीत फरक असतो.’

आपले भाषण, त्यामधील मुद्दे, आपल्या भाषणाच्या विषयावरील वाचन व चिंतन जसे त्यांच्या भाषणात जाणवत असे, तसेच, त्यांनी आयुष्यभर केलेल्या विविध वाचनाचा संग्रह हेच त्यांचे शक्तिस्थान आहे, हे श्रोत्यांना सहज जाणवत असे. त्यांच्या भाषणात विषयाची मांडणी, नर्म विनोद आणि सुटसुटीत लोकशिक्षण भाषा ही महत्त्वाची अंगे असत, सामान्यतः ते अर्ध्या तासाहून अधिक बोलत नसत. आपल्या मितभाषेविषयी ‘नरूभाऊ लिमये - एक मोलाची मैत्री’या लेखात ते लिहितात : ‘सामान्यतः मी कमी बोलतो, असा प्रवाद आहे. त्यात काही सत्यांशही आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ लागला, माणसे राखण्यापेक्षा दुखावली जातील, असे वाटू लागले, कार्यसिद्धीऐवजी कार्यनाश होईल, अशी शंका येऊ लागली की, शब्दांवरचा माझा विश्वास फार फार कमी होतो. माझ्या कमी बोलण्यालिहिण्याचे हे एक कारण असू शकेल.’

त्यामुळे ते भाषा आणि भाषाशैलीचा कर्तृत्वसंपन्नपणे उपयोग करीत. मराठवाड्यामध्ये झालेल्या साहित्य संमेलनात त्यांनी सांगितले की,‘माणसाने भाषा निर्माण केली; आता भाषेला माणसे निर्माण करावी लागणार आहेत.’राजकीय असो अथवा सामाजिक असो, यशवंतरावांच्या प्रत्येक भाषणात त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट दिसतो.