शब्दाचे सामर्थ्य ११


आई विठाई


आजोळी माझ्या आईला सर्वजण‘आक्का’म्हणत असत. ती घरात सर्वांत मोठी, म्हणून आला-गेला माणूसही तिला  ‘आक्का’च म्हणत असे.

आजोळी असताना एकदा आजीला मी विचारले, तेव्हा ती म्हणाली, ‘आक्काचं नाव देवाचं आहे. विठाई आपला देव आहे.’

आजी काय म्हणते, ते मला कळत नव्हते; पण ती काहीतरी चांगले म्हणाली, असे मला वाटले. याच वेळी बोलण्याचा ओघात माझ्या नावामागची कथाही तिने सांगितली. ती म्हणाली, ‘तुझ्या जन्माच्या वेळी आईला फार त्रास झाला. ती बेशुद्ध झाली. आपलं गाव खेडेगाव, दवापाण्याची सोय नाही. घरगुती औषध-पाणी केलं; पण गुण येईना. माझ्या जिवाला घोर लागला. अखेर सागरोबाला साकडं घातलं आणि देवाला काकुळतीनं विनवलं, आक्काला जगवण्यात माझ्या हाताला यश दे. तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव यशवंत ठेवू. सागरोबानं ऐकलं. म्हणून तुझं नाव यशवंत ठेवलं.’

आजीने, इडा-पिडा टळो, म्हणून गालांवरून बोटे उतरली आणि कडकड मोडली. तिच्या डोळ्यांत पाणी जमले. रात्री आजीने दृष्ट काढली आणि सागरोबाचा अंगारा लावला.

विठाई आणि यशवंत या दोन नावांमागचा इतिहास प्रथमच मला समजला. आईच्या प्राणांची साक्ष म्हणून माझे नाव यशवंत आहे, हे कळल्यापासून आई हाच माझा प्राण झाली.

माझ्या थोरल्या बंधूंना नोकरी मिळाल्यानंतर ते काही दिवस कराडमध्ये होते. नंतर त्यांची बदली होऊन ते विट्याला गेले; परंतु माझ्या आईने निर्णय घेतला की, दोन्ही धाकटी मुले घेऊन आपण कराडला राहावे आणि त्यांचे शिक्षण पुरे करावे. माझ्या आईचा हा एक ध्यास होता. तिने स्वीकारलेला मंत्र होता की, शिक्षण ही शक्ती आहे. ती मिळवली पाहिजे, आपल्या मुलांचे शिक्षण पुरे केले पाहिजे. या दृष्टीने तिने घेतलेला हा निर्णय आमच्या आयुष्याला दिशा द्यायला मूळ कारणीभूत आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे. तिच्या या निर्णयाच्या निमित्ताने आम्ही कराडकर झालो. त्यानंतर कराडशी जो संपर्क आला, तो कायमचाच ! तेच आमचे गाव झाले आणि कार्यक्षेत्रही झाले.

माझी आई शाळेत शिकली नव्हती, पण शिक्षणाचे मोल ती मनोमन जाणत होती. आमच्या घरची तशी गरिबीच असली; तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ही श्रीमंती आम्हां मुलांपर्यंत पोहोचविण्याचा तिचा सततचा प्रयत्‍न होता. देव आपल्या पाठीशी आहे, ही तिची निष्ठा होती. त्यामुळेच ती संकटकाळी कधी डगमगली नाही. आम्हांला ती सतत धीर देई. पहाटे दळण दळताना -

नका, बाळांनो, डगमगू
चंद्र-सूर्यांवरील जाई ढगू

ही दिलासा देणारी ओवी तिच्या मांडीवर झोपून मी कितीतरी वेळा ऐकली आहे.