यशवंतरावांच्या जीवनातील तो जडण-घडणीचा काळ होता आणि वाचनाने संस्कार त्यावेळी नकळत होत होते. महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर वाचनांच्या कक्षा वाढलेल्या दिसून येतात. इंग्रजी व मराठी या दोन्हीहि भाषेतील पुस्तके ते वाचत असत. एका बाजुला टिळक, आगरकर, सावरकर, चिपळूणकर यांचे ग्रंथ तर दुसर्या बाजूला हरि नारायण आपटे, नाथ माधव, वामन मल्हार जोशी, माडखोलकर यांची पुस्तके. रविकिरण मंडळातील कवि यशवंत, गिरीश, माधव ज्युलियन यांचे काव्यहि त्यांनी वाचले. मार्क्सवादी व त्यावर टीका करणारे असे दोन्ही तर्हेचे वाङ्मयहि त्यांनी वाचले. ‘राइज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ एस्. जी. वेल्स यांचे ‘आऊट लाईन वर्ल्ड हिस्ट्री इम्पिरिअॅलिझम’ चर्चिलची मेमॉयर्स. अगाथा ख्रिस्तीच्या हेरगिरीच्या कादंबर्या, मोपासा, व्हिक्टर व्ह्युगो, हेमिंग्वे, थॉमस हार्डी, जॉन गंथर अशा काही निवडक लेखकांची पुस्तके त्यांनी वाचलेली दिसून येतात.
यशवंतराव एके ठिकाणी म्हणतात की, ‘विशाल भाषिकाचा मुख्यमंत्री असताना सरकारी कामकांजाच्या बाहेरचे वाचण्यास वेळ कमी मिळायचा मुख्यमंत्री पद हे निदान त्या काळात तरी काटेरी मुकुटाप्रमाणे होते. त्यावेळी माझ्या वाचनात काहीसा खंड पडला व तो भरून कसा मिळेल याची विवंचना लागली. दिल्लीत आल्यानंतर अनेकविध नवे विषय हाताळावयाचे होते. नित्याच्या कामासाठीहि अधिक पद्धतशीर व्यासंगाची आवश्यकता होती. त्यामुळे दिल्ली येथे आल्यानंतर वाचन अधिक योजनाबद्ध झाले.’ दिल्ली येथे आल्यानंतर वाचनाचा नुसता खंडच भरून निघाला असे नाही, तर ज्ञानाच्या अनेक शाखांची जवळून ओळख झाली त्याविषयीची जिज्ञासा वाढली. ज्ञानाचे विशाल क्षितीज दिसू लागले. देशाचे जे प्रश्न मी मुंबईत राहून समजून घेत होतो त्यापेक्षा त्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे. त्याच्या कक्षा मोठ्या आहेत याची दिल्ली येथे आल्यावर तीव्र जाणीव झाली आणि असे वाटू लागले की, अधिक व्यासंगाची, अधिक व्यासंगाची, अधिक वाचनाचीहि गरज आहे आपण वाचण्यासारखे, शिकण्यासारखे बरेच राहून गेले आहे या अपूर्णतेची जाणीव असल्याचे ते सांगतात.
ते पुढे म्हणतात, 'माझ्यावर वेगवेगळ्या खात्यांच्या जबाबदार्या पडल्या त्यामुळेहि वाचनाचे क्षेत्र व खोली वाढत गेली. युद्धतंत्र, युद्धशास्त्र, भारताच्या संरक्षणविषयक समस्या यांचा प्रथम अभ्यास करावा लागला. त्यानंतर गृहखात्यात आल्यावर असेच विविध विषय हाताळावे लागले. घटनात्मक प्रश्न त्या काळात उपस्थित झाले होते. अर्थखात्यात असताना आर्थिक नियोजनाचे पश्न, आर्थिक विकासाचे प्रश्न, जगातील विकसनशील देशाचे अर्थकारण, प्रगतराष्ट्राचे अर्थकारण याचा अभ्यास केला. त्यातून सगळे विश्वच डोळ्यासमोर आले, जागतिक राजकारण, जागतिक नेत्यांची चरित्रे, विविध देशांच्या सामाजिक, राजकीय समस्या, त्यांचे राजकीय इतिहास आदी विविध विषय पुढे आले त्यातून स्टॅलिन, केनेडी, कुश्चेव्ह, मॅकमिलन, इडन आदी विख्यात राजकीय नेत्यांची चरित्रे, त्यांचे कर्तृत्व, त्यांची धोरणे यांच्या विषयीचे अनेक ग्रंथ वाचले. सतत वाचन करीत असता आपल्याला मुळीच कंटाळा येत नाही. खरा ज्ञानोपासक आपल्या अज्ञानाची जाणीव असणाराच असतो. यशवंतराव म्हणतात, 'मी एक असाच नम्र ज्ञानोपासक आहे. एखाद्या ग्रंथालयात उभे राहिले की शेकडो ग्रंथकारांचे ग्रंथ आपल्याकडे पाहता आहेत, असा मला भास होतो. तेथेच आपण नम्र होतो. ज्ञानसागराचे विस्तीर्ण स्वरुप नजरेपुढे येते आणि मग आपण करतो ते वाचन म्हणजे शिंपल्याने पाणी पिण्याचा प्रयत्न आहे अशी जाणीव होते.'
यशवंतराव नुसते ग्रंथवेडे नव्हते, त्यांची वाचनाची, अभ्यासाची दालने किती विस्तृत होती आणि त्यांची अभ्यासाची किंवा पुस्तके वाचण्याची पद्धती किती अर्थपूर्ण होती, याचे यथार्थ दर्शन त्यांच्या स्वतःच्या ग्रंथसंग्रहावरुन होते.