विविधांगी व्यक्तिमत्व-१३

ग्रंथप्रेमी यशवंतराव

यशवंतरावांचा जन्म अगदी सामान्य शेतकर्‍याच्या घरात झाला असून त्यांच्या जीवनाला कुठल्याहि मोठ्या अगर प्रतिष्ठित घराण्यातील पार्श्वभूमी अथवा परंपरा लाभलेली नाही. यशवंतरावांची आई शाळेत शिकलेली नव्हती, पण शिक्षणाचे मोल ती मनोमन जाणत होती. शिक्षण ही शक्ती आहे ती मिळविली पाहीजे हा तिचा ध्यास होता. घरची गरिबी असली तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती. ‘देव आपल्या पाठीशी आहे.’ ही तिची निष्ठा होती. त्यामुळेच ती संकटकाळी कधी डगमगली नाही. एका खेड्यातील, सामान्य घरातील, बापाच्या छत्रसावलीला मुकलेला हा लहानसा मुलगा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत काढीत आपल्या आयुष्याची सफर-संपूर्णत्वाला कशी नेतो याचा परिचय भारतीय जनतेला आहे तो मुख्यत: राजकीय नेता म्हणून. मुंबई राज्याच्या विशाल द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री, नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दिल्ली येथे गेल्यावर संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र, खात्याचे मंत्री व उपपंतप्रधान आणि आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष म्हणून अधिकारपदे त्यांनी भूषविली आहेत पण त्याहि अगोदर स्वातंत्र्य लढ्यातील पुढारी, कॉंग्रेसचे संघटना कुशल कार्यकर्ते म्हणून ते राजकारणात अग्रेसर होते पण या ३५-४० वर्षाच्या अखंड धकाधकीच्या राजकीय जीवनात राहूनहि यशवंतरावांनी आपली रसिकता, साहित्यप्रेम ग्रंथप्रेम व्यासंग हे गुण जपलेले होते. यशवंतराव हे चिकित्सक रसग्राही वाचक होते. वाचनाला दिशा चौफेर होती. लो. टिळक यांच्या कार्याची सांगता आणि महात्माजींच्या कार्याचा उदय अशा कालावधीमध्ये यशवंतरावांचे बालपण गेले. प्रो. फडके, खांडेकर यांचीपिढी वाढली होती. विशेषत: खांडेकरांच्या लेखनाचा आपल्या विचारावर व भावनांवर खोल ठसा उमटला होता हे त्यांनी नमूद केले आहे

१९३२ च्या फेब्रुवारी महिन्यात अठरा महिन्याच्या कारावासाची येरवडा जेलमधील सजा यशवंतरावांना खूप काही देऊन गेली, शिकवून गेली, ज्ञानसमृद्ध करवून गेली. आचार्य भागवत, एस. एम. जोशी, रावसाहेब पटवर्धन, वि. म. भुस्कुटे, ह. रा. महाजनी आदि अनेक विद्वत्त रत्‍नांचा त्यांना नुसता सहवास लाभला नाही तर अनेक ग्रंथांचा परिचय त्यांना करवून गेला ( घेता आला ) ह. रा. महाजनींच्यामुळे कालिदासाच्या ‘शाकुंतल’चा जसा सखोल परिचय झाला. तसाच आचार्य भागवतानी ‘ज्युलिअस सीझर’ हे नाटक खुबीदार शैलीने शिकविले. यशवंतरावांची ही ज्ञानसाधना चालू असताना राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि त्यांचा परस्पर संबंध मनात ठसविता आला. गांधीवादी विचार हा भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेला एक नवीन जीवन दृष्टीकोन आहे आणि त्या विचारांना जशी काही मुलभूत बाजू आहे तशीच राजकीय बाजू आहे. इतकेच नव्हे तर ते जीवनाचं एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. याच कारावासात यशवंतरावांच्या राजकीय शिक्षणाचा पाया घातला गेला.

तुरूंगामध्ये ‘माझी जन्मठेप’, ‘लो. टिळक चरित्र’ नेहरू, गांधी, टॉलस्टॉय, रविंद्रनाथ टागोर, एम. एन. रॉय यांचे साहित्य आदि पुस्तके त्यांनी वाचली. स्वा. सावरकर यांचे ‘कमलावाक्य’ आचार्य भागवत तुरूंगात समजून सांगत असत त्याचा लाभ यशवंतरावांना झाला. शाळेत असताना तरूणपणी खांडेकरांच्या भावनाप्रधान कादंबर्‍या, फडके यांच्या प्रणयकथा, संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्‌मयातील काव्याचा गोडवा चाखला, गॉर्की यांची ‘आई’ कादंबरी असे काही अक्षर वाङ्‌मय त्यांनी वाचले. त्यामुळे त्यांचा समाजमुख पिंड घडविण्यात मोठी मदत झाली.

वाचनाने जीवनातील सर्वसुखे मिळतात ज्ञान व मनोरंजनाबरोबरच त्यातून विसावा मिळतो. मानसिक सुखाप्रमाणे इंद्रियजन्य सुखंहि मिळतात कारण पुस्तकांचा गंध, स्पर्श सुखावणारा असतो. त्याच्या पानाची फडफडदेखील श्रवणेंद्रियाला आनंदित करते. एकटेपणातील सोबत म्हणजे ‘ग्रंथ’ असा अनेकांचा अनुभव असतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर या वाचनाला ग्रंथांना वेगळचं महत्त्व असतं त्यांच्या सहवासात अनेक दु:खं हलकी होतात. कुणाला आपले विचार घासूनपुसून घ्यायला वाचनाची मदत होते, तर कुणाच्या कल्पकतेला त्यामुळे धुमारे फुटतात. अनेक नेत्यांना कारावासातील भयानक दिवस या ग्रंथांच्या सोबतीने सुसह्य करता आले हे आपण नित्य वाचत असतो. प्रसिद्ध फ्रेंच लेखक ‘मान्तेन’ याला पुस्तकांचा मोठा आधार वाटे. आपल्या कोणत्याहि त्रासदायक प्रश्नांची उत्तरं आपल्या वाचनातून आपल्याला मिळतात असं तो म्हणे.