विविधांगी व्यक्तिमत्व-९

समाजसंगराचा सरसेनापती

१९६१-६२ साल असावे. सांगली येथे यशवंतरावांचा ४६ वा वाढदिवस मोठया थाटाने साजरा करण्यात आला. त्यावेळी यशवंतरावांनी केलेल्या भाषणातील एक उतारा येथे मुद्दाम दिला आहे. त्यावरून आपणास यशवंतरावांच्या यशाची गुरुकिल्ली सापडेल. ते म्हणतात, तत्त्ववेत्ता राजा व्हावा असे स्वप्न प्लेटोने रंगविले., पण तत्त्ववेत्ते जेव्हा काय भयानक घडते याचा अनुभव आज अर्ध्या जगातील जनता अनुभवत आहे.

तत्त्ववेत्त्याच्या राजकीय अपयशाचे कारण यशवंतराव चव्हाण सांगतात त्याप्रमाणे त्याला आपल्या मर्यादांची जाणीव नाही हेच होय. तत्त्वज्ञानात तो मर्यादाशील असतो, पण भलत्या क्षेत्रात शिरला की तो अमर्याद होतो. हाच न्याय सर्वत्र लागू आहे. म्हणून मानवाच्या यशाचे गमक त्याच्या मर्यादा पुरुषोत्तमत्वावर अवलंबून आहे.

कित्येकांना असे वाटते की, यशवंतराव एकदम पुढे आले, पण तसे नाही. पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, द्विभाषिकाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री, उपपंतप्रधान हे त्यांच्या प्रगतीचे टप्पे मानले तर पहिल्या २ अवस्थांमध्ये ते आपल्या कुवतीचा अंदाज घेत होते. यालाच उमेदवारीचा काळ म्हणतात. त्यानंतर राज्याची पुनर्रचना झाली. महाराष्ट्रात आंदोलनाची वावटळ उठली. कित्येकांनी लोकप्रियतेच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. आपल्या मर्यादा न ओळखता झेप घेण्याचा प्रयत्‍न केला. दिव्यावर पतंगाने झेप घ्यावी तशी त्यांची अवस्था झाली. यशवंतरावांनी प्रश्नाच्या मर्यादा ओळखल्या आणि आपल्याही मर्यादा न ओळखता झेप घेण्यात मर्यादातिक्रम होतो. मर्यादा ओळखून मार्ग शोधण्याचा प्रयत्‍न केल्यास मर्यादा ओलांडता येतात. गरजेची जाणीव होणे यातच मूलभूत स्वातंत्र्याचा प्रारंभ असतो, या जर्मन तत्त्ववेत्ता हेगलच्या विचारांना अनुसरून यशवंतरावांची वरील वाटचाल विरोधाभासात्मक वाटली तरी समर्थनीय आहे.

इंद्रप्रस्थाहून अमृतकलश आणणारे देव अथवा संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा देण्याबद्दल श्रेष्ठींची परवानगी मागणारे '६५' अथवा अ‍ॅसिड बल्बच्या सिद्धांतानुसार संयुक्त महाराष्ट्र मिळवू पाहणारे हे सारे प्रश्नाच्या मर्यादा ओळखू शकले नाहीत. राष्ट्रीयत्वाच्या, लोकशाहीच्या, पक्षाच्या अशा अनेक मर्यादा ओळखून मार्ग काढायचा होता. पण लोकप्रियतेचा मोह अनावर असतो हेच खरे. त्या भावनेच्या भरात जो ओरडणार नाही तो दुबळा, भेकडा, द्रोही! यशवंतरावांनी हे सारे सहन केले. कारण पुढील यशाची पाऊलवाट या घनदाट जंगलातून गेली होती. प्रवास खडतर खरा. पण हा प्रवास जीव मुठीत धरून न करता धीरगंभीरवृत्तीने, छाती वर काढून करायचा होता. ही महान कसोटी होती. जीवनात तो आणीबाणीचा क्षण होता. लोकनिंदेच्या तापलेल्या तव्यावरून चालायचे होते. यशवंतरावांनी हे दिव्य केले आणि म्हणूनच लोकांना त्यांच्या नेतृत्वाची प्रचीती आली.

यशवंतरावांचे खरे यश या खडतर काळातून आपल्या पक्षाचे तारू सहिसलामत पैलतीराला नेण्यात आले. एक काळ असा होता की, महाराष्ट्रात काँग्रेसला उभे राहायला जागा नव्हती. एक काळ असा आला की, काँग्रेसने महाराष्ट्रातील ८० टक्के जागा व्यापल्या. एक काळ असा होता की, त्यावेळी फक्त 'काँग्रेस मुर्दाबाद' याच घोषणा ऐकू येत होत्या. त्यावेळी काँग्रेस नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे स्वागत, चपला व जोडे यांनी होत होते. एक काळ असा होता की, पदयात्रा काढून मते मागितली तरी लोक मते देण्यास राजी नव्हते. पुढे एक काळ असा आला की, लोकांनी काँग्रेसला भरभरून मते दिली. त्यावेळी 'काँग्रेस झिंदाबाद' च्या घोषणांनी महाराष्ट्र दुमदुमून गेला व यशवंतरावांवर पुष्पहाराची वृष्टी होऊ लागली.

साहित्य सभा देखील काँग्रेस विरोधाने भारावून गेल्या, तर त्याच व्यासपीठावरील साहित्यिक यशवंतरावांची वाङ्‌मयीन पूजा बांधू लागले. एके काळी सार्वजनिक जीवनातील विविध चळवळी काँग्रेस विरोधाने पछाडलेल्या होत्या. पुढे असा काळ आला की, प्रत्येक समारंभाचे, सत्काराचे अग्रस्थान यशवंतरावांकडे जाऊ लागले. कालमर्यादा ओळखण्यानेच कालावर मात करता येते याचा यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा?