विविधांगी व्यक्तिमत्व-११

अग्निदिव्यातून घडलेले नेतृत्व

स्वातंत्र्यानंतर १९६२ पर्यंत महाराष्ट्रातील निर्विवाद नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. त्यानंतर ते भारतीय व आंतरराष्ट्रीय नेते बनले. यशवंतरावांच्या राजकीय मूल्यमापनात सामान्यत: या दोन कालखंडातील कार्याचाच जास्त विचार केला जातो, पण आज यशवंतरावांच्याविषयी जसजशी अधिकाधिक चरित्रसाधने उपलब्ध होत आहेत आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीची चिकित्सा होत आहे, त्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळातील या असामान्य कर्तबगारी असलेल्या नेत्याच्या राजकीय पायाभरणीचा विचार अधिकाधिक आवश्यक ठरत आहे. यशवंतरावांच्या नेतृत्वात भावरम्यता आणि परखड वास्तवतावाद यांचा जो विस्मयजनक संगम आढळतो त्याची मुळं स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक मेहनतीमध्येच आपल्याला शोधली पाहिजेत. मुंबईत, दिल्लीत जगातील अनेक झगमगीत राजधान्या कार्यरत असताना हा नेता कृष्णाकाठच्या आठवणीने नेहमी भावविव्हळ राहिला, पण तत्त्व आणि देशहित यांचा संघर्ष उभा ठाकताच परखडपणे सत्ता आणि खुर्ची याचा त्याग करून तो स्वातंत्र्याच्या दिंडींत सामील झाला. असा नेता १९३० ते १९४६ या कालखंडातील एका अत्यंत गतिमान राजकीय आवर्तातून निर्माण झाला होता, हे आपणास लक्षात घ्यावे लागेल.

यशवंतरावांच्या उपजत नेतृत्वगुणांची त्यांना व इतर लोकांना पहिली चाहूल १९३०-३१ साली लागली. त्यावेळी हा कुमारवयातील तरूण आपला शालेय अभ्यासक्रम पार पाडत होता. आणि त्या पिढीचा राजकीय विचारांचा पाठही गिरवीत होता. त्यावर्षी पुणे येथे झालेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेत त्यांना दिडशे रूपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. दुसर्‍या महायुद्धपूर्वीच्या काळातील व आर्थिक मंदीच्या वर्षातील ते पारितोषिक आजच्या किंमतीने किमान तीस पट तरी जास्त आहे. त्याहीपेक्षा 'वक्ता दशसहस्त्रेषु' या उक्तीप्रमाणे यशवंतराव नेतृत्वाच्या पहिल्या कसोटीवर त्याचवेळी उतरले. एडमंड बर्क, अब्राहम लिंकन किंवा लोकमान्य टिळक हे नेते असेच वाकपटू होते. आणि विनोदाची झालर लावलेले हे प्रभावी वक्तृत्व पुढची पन्नास - पंचावन्न वर्षे संसदेत, सामाजिक व्यासपीठावर निवडणुकांच्या प्रचारसभांत किंवा अभिरूचीसंपन्न साहित्यिकांच्या मेळाव्यात सारख्याच सहजतेने श्रोत्यांची मने जिंकत राहिले.

यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रवाह हा Soldier to General  (सैनिकापासून सरसेनापतीपर्यंत) या थाटाचा आहे. १९३०-३२ कायदेभंगाच्या चळवळीत प्रभातफेरी, झेंडावंदन आणि बुलेटिन चिकटवणे यासारखी साध्या कार्यकर्त्याची कामे त्यांनी जेवढया तन्मयतेने केली तेवढयाच तन्मयतेने त्यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे पदाधिकारीपद सांभाळले आणि त्यामुळे ते नेहमीच लहानमोठया सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकांशी सहज समरस होऊ शकत. ही कामे त्यांनी कधी कमी लेखली नाहीत. म्हणूनच ते 'अखेरपर्यंत मी काँग्रेसचा शिपाई आहे आणि मागे कुणीही नसले तरी काँग्रेसचा झेंडा आणि विचार कधीही सोडणार नाही' असे बोलले आणि वागले.

कायदेभंगाच्या चळवळीमध्ये दीड वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा त्यांनी राजकीय विद्यापीठातील प्रवेशासारखी मानली. आचार्य भागवत, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. वि. भ. भुस्कुटे, ह. रा. महाजनी, एस. एम. जोशी यांच्याशी केलेल्या चर्चा, वैचारिक व बौद्धिक मार्गदर्शन यातून त्यांची सामाजिक व राजकीय बैठक अत्यंत स्पष्ट आणि ठाम बनली. या राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ यांनी प्रतिपादलेल्या भारतीय संस्कृतीचा समन्वय साधण्याचा प्रयत्‍न केला आणि जेव्हा म. गांधींनी स्वातंत्र्य चळवळ भारतीय संस्कृतीला प्रतिपादलेल्या अहिंसेचे अधिष्ठान दिले, तेव्हा म. गांधींचे राजकीय नेतृत्व स्वीकारण्यास यशवंतरावांना अत्यंत आनंदच झाला. कारण गांधीवादी विचार हा भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेला एक नवीन जीवन दृष्टिकोन आहे आणि या विचाराला जशी मूलभूत आर्थिक सिद्धांताची बाजू आहे, तशीच राजकीय बाजू आहे. आणि हा विचार आपल्या संस्कृतीशी सुसंगतही आहे, यशवंतराव म्हणत, ''अहिंसा आणि सत्य हे नुसते दोन शब्द नसून एकाच तत्त्वप्रणालीच्या दोन बाजू आहेत आणि म्हणूनच मी व माझ्या सहकार्‍यांनी गांधीजींचे राजकीय नेतृत्व मान्य केले. तसे पंडित नेहरू यांचा मानवतावाद आणि समाजवाद यांनीही मी प्रभावीत झालो आणि त्यांचा अनुयायी बनलो. या निष्ठेशी आम्ही प्रामाणिक राहिलो.'' ही कबुली म्हणजे यशवंतराव स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सिद्धांत आणि व्यक्ती यांची गल्लत करीत नसत त्याचे हे निदर्शक आहे. या सैद्धांतिक भूमिकेमुळेच हे नेतृत्व पुढे फार मोठी जबाबदारी सहजपणे सांभाळू शकले. जेव्हा विचार हा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ मानला जातो तेव्हाच नेतृत्वाची कसोटी लागते. यावरून असे दिसते की, भारतीय संस्कृती आणि मानवतावाद आणि त्यावर आधारलेले राजकारण याची बांधिलकी यशवंतरावांनी १९३५ दरम्यान स्वीकारली होती.