विविधांगी व्यक्तिमत्व - भाग-१
यशवंतरावांचा मला घडलेला परीसस्पर्श
मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या सर्वंकष जीवनाचा आणि त्यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक पैलूंचा प्रभाव माझ्यावर पहिल्यापासून पडलेला आहे. या परिसरातील अनेक तरुणांनी त्यांच्या राजकीय जीवनाप्रमाणेच याही वैशिष्टयापासून प्रेरणा घेतली व आपापल्या कार्यक्षेत्रात आपल्या कुवतीनुसार काम केले. साहेबांपासून अशी प्रेरणा घेऊन काम करणार्या अनेक छोटया कार्यकर्त्यांपैकी मी एक कार्यकर्ता आहे.
साहेबांचे राजकारण, साहित्यकारण व इतर सामाजिक कार्य यावर अनेक अंगांनी अनेक प्रकारे लिहिले आहे, त्यात नव्याने भर घालण्यासारखे माझ्याजवळ काही नाही. पण माझ्यासारख्या ग्रामीण परिसरात ग्रंथपाल चळवळीत काम करणार्या आणि साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांत रस घेणार्या कार्यकर्त्याला ही प्रेरणा व त्यासंबंधीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन हे साहेबांकडूनच मिळालेले होते, हे कृतज्ञतापूर्वक नमूद केले पाहिजे. मी तर असे म्हणेन की, कर्हाड परिसरातच नव्हे तर सर्व सातारा जिल्हाभर आज जो साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनाचा, ग्रंथालय चळवळीचा, वृत्तपत्रसृष्टीचा आणि वाङ्मय निर्मितीचाही विकास झाला आहे, त्याच्यामागे साहेबांची विधायक दृष्टी व खंबीर मार्गदर्शन उभे होते.
साहेबांच्यासंबंधी ज्या माझ्या स्मृती आहेत, त्याची सुरुवात १९५२ मध्ये होते. मी त्यावेळी ओगले ग्लास वर्क्समध्ये नोकरी करीत होतो. त्यावेळी झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. खुद्द साहेब या निवडणुकीसाठी एक उमेदवार होते. या निवडणुकीत काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासाठी हिरीरीने भाग घेत होतो. या प्रचारमोहिमेचे सूत्रधार मा. आबासाहेब पार्लेकर आणि श्री. ज्ञानुबुवा धोकटे (विरवडे गावचे) हे होते. मसूरला झालेल्या एका अटीतटीच्या प्रचारसभेतून निर्माण झालेल्या गोंधळात थोडीशी मारामारीही झाली. त्या मारामारीत मी व माझे काही सहकारी सापडलो. त्यावेळी मला झालेली जखम ही त्या प्रचारमोहिमेची खूण म्हणून अभिमानाने मी बाळगलेली आहे. या झालेल्या प्रकारात आम्हा छोटया कार्यकर्त्यांच्या प्रकृतीसंबंधी ओगलेवाडीच्या डॉ. आगाशे यांच्याकडे साहेबांनी दोन वेळा, श्री. ज्ञानुबुवा धोकटे यांच्याकडे तीन वेळा आस्थेवाईकपणे चौकशीही केली. आपल्यासाठी काम केलेल्या प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याच्या कामाची नोंद साहेब बारकाईने ठेवत असत व त्याच्या कामाचे कौतुकही करत असत. याचा अनुभव मला पुढेही एका प्रसंगी आला.
मी १९७८ मध्ये फुफ्फुसाच्या विकाराने जास्त आजारी असताना ऑक्टोबर महिन्यात पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मला अॅडमिट व्हावे लागले. उपचार केले. निदान झाले, पण शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. कराव्या लागणार्या शस्त्रक्रियेचा खर्च माझ्या आवाक्याबाहेरचा होता. त्यासंबंधी काय करावे या विवंचनेत मी होतो. त्या विवंचनेतच मी हॉस्पिटलमधून डिसचार्ज घेऊन कर्हाडला घरी परत आलो. साहेबांचा व माझा फारसा परिचय नसूनही मी साहेबांना माझ्या शस्त्रक्रियेसंबंधी व आजाराविषयी एक व्यक्तिगत सविस्तर पत्र लिहिले. त्याचा परिणाम असा झाला की, रूबी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांकडून आपल्या शस्त्रक्रियेची व त्या खर्चाची तरतूद झाली असल्याने आपण येथे यावे, असे मला कळविण्यात आले. ही गोष्ट साहेबांनी परस्परच केली. त्यासंबंधी मला त्यांनी केव्हाही ओळख दिली नाही. हा त्यांचा व्यक्तिगत चांगुलपणा म्हणावा लागेल.