विविधांगी व्यक्तिमत्व-१०६

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदराव पवार हे आपल्या भाषणात म्हणतात-

“यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरचे आपले वैयक्तिक संबंध व त्यांचे मिळालेले राजकीय मार्गदर्शन याचा माझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनात फार मोठा फायदा झाला. माझ्यावर त्यांचे अपार ॠण आहेत. मी ते कधी विसरू शकणार नाही. ते केवळ आधुनिक महाराष्ट्राचेच शिल्पकार नव्हते, तर एक महान देशभक्त होते.” शरदराव पुढे म्हणतात- “यशवंतरावांचा लोकशाही समाजवादावर दृढ विश्वास होता. भारत हे एक कणखर व स्थिर राष्ट्र व्हावे असे यशवंतरावांचे स्वप्न होते. देशाचे सार्वभौमत्व टिकविण्याच्या दृष्टीने सामाजिक विषमतारहित देश त्यांना बनवायचा होता. देश हा धर्मनिरपेक्ष असलाच पाहिजे या तत्त्वावर त्यांची निष्ठा होती.” हे विचार शरदरावजी पवार यांनी आपल्या भाषणात प्रकट केले.

केवळ मराठी माणसानेच नव्हे. तर संसदीय लोकशाहीबद्दल आस्था असणार्‍या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असाच हा समारंभ होता. यशवंतरावजी चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या राष्ट्रीय जीवनातील कामगिरीची प्रशंसा करणारा कार्यक्रम संसदेत झाला.

या सर्व भाषणांवरून एक दिसून येते की, महात्मा गांधींसारखी १९१५ पर्यंत एक व्यक्ती द. आफ्रिकेच्या लढ्यात उतरलेले हिंदी बॅरिस्टर म्हणून प्रसिद्ध असली तरी, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर अवघ्या एका दशकात केवळ भारतातील नव्हे तर जगातील अव्वल दर्जाचा राजकारणी संत-महात्मा-बापू म्हणून जगमान्य झाली. तसेच देवराष्ट्रे यासारख्या ग्रामीण उपेक्षित परिसरात जन्मलेली आणि कर्‍हाडसारख्या छोटया शहरात वावरलेली 'यशवंत' ही व्यक्ती केवळ स्वत:चा निर्धार आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व यांच्या बळावर भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर चमकली. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची दखल अनेक जागतिक अव्वल दर्जाच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी घेतली. त्यांच्या मतांचा गंभीर विचार केला तर याचा भारतीय नेतृत्व आणि राजकारणावरही परिणाम झाला आणि या सर्वांना अगदी, काँग्रेस पक्षाच्या मुखंडांनाही ‘देखल्या देवा दंडवत’ म्हणून का होईना यशवंतरावांचे नेतृत्व (गांधी घराण्याचा अपवाद सोडून) मानावेच लागेल. कोणी त्यांच्या हयातीत तर कोणी त्यांच्या निर्वाणानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसे करणे त्यांना भाग पडले, हाच यशवंतरावजींच्या पुतळे-तैलचित्रे अनावरणप्रसंगी झालेल्या थोरामोठ्यांच्या भाषणांचा इत्यर्थ मला दिसतो.