विविधांगी व्यक्तिमत्व-१०३

भारताचे माजी उपपंतप्रधान मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या विविध ठिकाणी पुतळे अनावरण प्रसंगीचे गौरवोद्गार.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे साहेब आहेत. कर्‍हाडात तर ते मामा म्हणून ओळखले जातात. संयुक्त नवमहाराष्ट्राचे शिल्पकार बनून त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. १९६२ मध्ये चिनी आक्रमणाच्या वेळी भारताचा स्वाभिमान धोक्यात आला आणि हिमालयाची बर्फशिखरे एका उन्मत्त आक्रमक राष्ट्राच्या युध्दाग्नीने पेटली. तेव्हा हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्रि धावून गेला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या ऐन तापत्या क्षणी राष्ट्रहिताची जाणीव त्यांनी स्वजनांचा रोष पत्करून क्वचित मानहानी सहन करून 'महाराष्ट्रापेक्षा पं. नेहरू मोठे' असे स्पष्टपणे सांगितले. तरी भारताच्या या महान नेत्याकडे दक्षिण व उत्तरेकडच्या काँग्रेस पक्षाच्या 'हायकमांड' मुखंडांची पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित असल्याचेच दिसून येते. भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिराजींची गोष्ट सोडा, पण त्यांचे स्वच्छ, सोज्वळ, निर्मळ मनाचे सुपुत्र आणि धडाडीचे युवानेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सातारा येथे यशवंतरावजींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केलेल्या भाषणांचे बारकाईने निरीक्षण केले तर ते औपचारिक आणि अपुर्‍या माहितीवर आधारलेलं होतं. ही चूक कदाचित त्यांना माहिती देणार्‍याची असू शकेल. उदा. दांडी यात्रेतील मा. यशवंतरावांच्या 'युवा सहभागा' चा उल्लेख अचूक नाही, असे आढळून येईल. असे का व्हावे?.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या भाषणातही एक प्रकारचा तिरकसपणा आहे. मा. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, उपराष्ट्रपती के. नारायणन यांचीही भाषणे काहीशी 'औपचारिक' आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा लोकनेता झाला नाही, असे तमाम महाराष्ट्रीय जनतेचे मत असले तरी भारतीय पातळीवरील काँग्रेसच्या उच्चपदस्थांनी विशेषत: दक्षिण आणि उत्तरेकडच्या नेत्यांनी या मताची फारशी कदर केलेली दिसत नाही.

११ मार्च १९८८ रोजी सातारा येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण मा. राजीव गांधी, पंतप्रधान यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले –

''भारताचा संरक्षण विभाग यशवंतरावांनी समर्थपणे पेलला, आमच्या सेनेची पुनर्बांधणी केली आणि स्वावलंबनाचा मूलमंत्र दिला. आज आपण जी सेनेची प्रगती पाहतो, तिची सुरुवात तेथूनच झाली. शिवाजी महाराजांनी सेनेला आणि जनतेला एकाच वेळी समर्थ नेतृत्व दिले होते त्याप्रमाणे यशवंतरावांनी महाराष्ट्राची जनता आणि भारतीय फौज या दोघांनाही अत्यंत उच्च प्रतीचे नेतृत्व दिले. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पायाही घातला. त्यांच्या कर्तृत्वाने शेतीचा विकास, उद्योगाची उभारणी, तंत्रज्ञान प्रगती, शिक्षण प्रसार झाला, त्यामुळे महाराष्ट्राचा विकास निश्चितच नेत्रदीपक झाला आहे. हा विकास करण्यामध्ये यशवंतरावांचा मोठा वाटा आहे.'' ते पुढे म्हणतात –“यशवंतरावांच्या कार्यपद्धतीची काही सूत्रे खास लक्षणीय आहेत. त्यांनी आपल्या लोकशाहीला बळकटी दिली, समाजवाद भक्कम केला, आमच्या निधर्मी राज्यपद्धतीला बळ दिले, अलिप्तता धोरणाला मजबुती दिली. सर्वप्रथम महाराष्ट्रात पंचायत राज्याची योजना साकार करून त्या चांगल्या कार्यक्षमपणे कशा काम करत आहे व विकास जलद गतीने कसा साधता येतो याचे प्रात्यक्षिक सर्व देशाला दाखवून दिले. यशवंतराव हे नेहमीच पंडितजींच्या सिद्धांतांचा पाठपुरावा करीत होते. महाराष्ट्रामध्ये समाजवादाचा पाया भक्कमरीतीने घातलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यशवंतरावांनी इंदिराजींना उत्तम प्रकारे साथ दिली. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले, त्यामुळे ग्रामीण भागात बँकांच्या शाखा वाढल्या. त्या शाखांद्वारे शेतकर्‍यांना व विकासकार्याला चांगला हातभार लागला. यशवंतरावांच्या मार्गानेच आपण गरिबी हटवू शकू. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीचा पाया घातला, ही सहकारी चळवळ ठामपणे गतिमान झाली आहे. महाराष्ट्रामध्ये यशवंतरावांनी कार्यकर्त्यांचे संच निर्माण केले आणि सहकारी चळवळीला खत पाणी घातले. हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे सफल झालेला आहे. आणि तो आता अधिक विकसनशीलतेकडे उन्मुक्त झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीला जितकी गती मिळाली आहे, तितकी इतर राज्यात दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या नेत्रदीपक विकासात यशवंतरावजींचा सिंहाचा वाटा आहे. आज भारतभर विविध बाजूंनी दबाव पडत आहेत, विघटनवादी शक्तींच्याद्वारेही दबाव पडत आहेत. जर आज यशवंतराव असते तर भारताच्या ऐक्यासाठी व अखंडतेसाठी त्यांनी आवाज उठविला असता.'' राजीवजी पुढे म्हणतात, “यशवंतरावांनी आपल्या विदेशनीतीवर चांगले लक्ष दिले होते.