विविधांगी व्यक्तिमत्व-१०१

साहेबांच्या वरील पत्रास अनुसरून नगरपालिकेने किल्ल्याचा तट व नदी यांच्यामधील संगमालगतची सुमारे साडेसात एकर
सपाटीची जागा पंतप्रतिनिधीकडून संपादन केली आणि १९७४ साली बागेचा आराखडा तयार केला. सभोवार तारेचे कंपाऊंड करून घेतले व बाग तयार करण्यास सुरुवात केली., परंतु ६ जून १९७६ रोजी दोन्ही नद्यांना आलेल्या भयावह पुराने नगरपालिकेने केलेले सर्व प्रयत्‍न वाहून गेले. त्यानंतर बागेचे काम भक्कम कसे होईल, यासाठी नगरपालिकेचे प्रयत्‍न सुरू होते. यासाठी संगमाच्या वळणावर भिंत बांधून तो भाग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने एक 'नागरी पर्यावरण सुधारणा प्रकल्प' तयार करून तो शासनाकडे १९८३ साली पाठविण्यात आला. (त्या प्रकल्पाचा समावेश सातव्या पंचवार्षिक योजनेत मध्यवर्ती सरकारने केला असल्याचे नगरपालिकेला समजले आहे. तो प्रकल्प पुरा होऊन संगमाच्या वळणावर संरक्षक तट बांधल्यानंतर हा परिसर पुराच्या धोक्यापासून सुरक्षित होणार आहे.)

२५ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्ली येथे यशवंतरावांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे अंत्यसंस्कार कोठे व्हावेत यासंबंधी बराच वाद झाला. हे संस्कार कर्‍हाड येथेच व्हावेत असा आग्रह कर्‍हाडकरांनी धरला. अखेरीस साहेबांच्या पार्थिव देहावर २७ नोव्हेंबर १९८४ रोजी दुपारी तीनच्या सुमारास प्रीतिसंगमावरच अग्निसंस्कार झाले आणि त्याठिकाणी तात्पुरती समाधी बांधण्यात आली. त्या जागी साहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्‍न झाले. त्या प्रयत्‍नांचा एक भाग म्हणून नगरपालिकेने संगमावरील आपल्या सदरील साडेसात एकर जागेत एक विस्तीर्ण उद्यान तयार करण्याची योजना हाती घेतली. त्यास 'यशवंत उद्यान' असे नाव देण्याचे निश्चित केले.

साहेबांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच स्व. वसंतरावदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'यशवंतराव चव्हाण स्मारक समाधी समिती' अशी एक उपसमिती फेब्रुवारी १९८७ मध्ये निर्माण झाली. समाधीच्या जीर्णोद्धारासाठी-प्लॅन-एस्टीमेट तयार करून घेणे व ते काम पूर्ण करणे, तसेच समाधीजवळ एक पर्णकुटी बांधणे व पाणदरवाजाकडून नदीकडे येणारा घाट दुरुस्त करणे आदी कामांची जबाबदारी या उपसमितीने स्वीकारलेली होती. तसेच त्यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी उपसमितीवरच होती. आतापर्यंत कर्‍हाड तालुक्यातील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कर्मचारी यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मुंबई येथील 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान' ने तीन लाख रुपये दिलेले आहेत. शिवाय उपसमितीच्या सदस्यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

कोल्हापूरचे ऑर्किटेक्ट श्री. बेरी यांनी समाधीचे प्लॅन व एस्टीमेटस् तयार केलेले असून ते काम कॉन्ट्रॅक्ट राजाराम जाधव, अ‍ॅडव्हान्स कन्स्ट्रक्शन कंपनी, कोल्हापूर यांच्याकडे सोपविण्यात आले होते. या कामासाठी दहा लाख रुपये खर्ची पडले. ऑर्किटेक्ट बेरी यांनी समाधीचे डिझाईन अत्यंत अभ्यासपूर्वक तयार केले आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील समाधीच्या अष्टकोनी असून तिची लांबी - रुंदी २० बाय २० फूट आहे. समाधीच्या सभोवतालच्या परिक्रमा आठ फुट सहा इंच रुंदीचा आहे. या मर्गाच्या बाहेरुन १६ इंच रुंदीचा व ४ फूट उंचीचा कठडा आहे. समाधीच्या पूर्वेस पाणघाटावर ३० बाय ३० फूट मापाचा अष्टकोनी चौथरा असून तेथून समाधीकडे जाणार्‍या मार्गाची रुंदी १५ फूट व लांबी ९५ फूट आहे. वरील चबुतरा, समाधीकडे जाणार मार्ग व समाधी आणि तिच्या भोवतालचा परिक्रमा मार्ग आदी सर्व कामे आर. सी. सी. मध्ये असून परस्परास जोडलेली एकजीव आहेत. या सर्व आर. सी. सी. कामाचा फौंडेशनसाठी जमिनीपासून सुमारे १५ फूट खोलीपर्यंत एक फूट जाडीचे ७५ आर. सी. सी. कॉलम्स उभे करण्यात आले आहेत. त्या सर्व कॉलम्सना जोडणार्‍या उभ्या-आडव्या बीम्स सर्वत्र आहेत. त्यावर प्रत्येक ठिकाणी आर. सी. सी. स्लॅबस् टाकण्यात आलेल्या आहेत. या प्रकारे वरील सर्व आर. सी. सी. काम एकमेकास जोडलेले एकजीव व भक्कम करण्यात आले आहे. परिक्रमेबाहेरील सभोवतालचा कठडा समाधीकडे येणार्‍या भागाच्या दोन्ही बाजूचे कठडे आणि चौथर्‍याच्या सभोवतालचा कठडा याची बांधकामे जमिनीखालील बीमपासून गोकाक अ‍ॅण्ड स्टोनच्या घडीव दगडामध्ये करण्यात आलेली आहेत. कठड्याच्या बांधकामाच्या मध्यभागी संगमरवरी जाळी आहे. परिक्रमा चौथरा व मधला मार्ग या सर्वावर आग्रा टाइल्स बसविलेल्या आहेत. मधील समाधीच्या सभोवारच माथ्यावर पिंकशेडची ग्रॅनाईट स्टोन फरशी बसवली आहे.