विविधांगी व्यक्तिमत्व-१०५

दि. ८ जानेवारी १९९२ रोजी मुंबई येथील ‘यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्राचे’ उदघाटन व केंद्राच्या आवारातील साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण भारताचे राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांनी केले. त्या प्रसंगी त्यांनी केलेले भाषण-

राष्ट्रपतींनी सुरवातीला केंद्राच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व समई प्रज्वलित करून स्मृती-केंद्राचे उदघाटन केले. त्यावेळी केलेल्या भाषणात मा. राष्ट्रपती आर. व्यंकटरमण म्हणतात- ‘स्व. यशवंतराव चव्हाण हे संयम आणि नेमस्तपणाचे जणू आदर्शच होते’, या शब्दात त्यांचा गौरव करून ते पुढे म्हणाले, “विरोधकांच्या मताचा आदर करणे, त्यांना बरोबर घेणे हा मोठा गुण त्यांच्या अंगी होता. कै. चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ते उत्कृष्ट संसदपटू, बुद्धिमान व जनतेचे सच्चे मित्र होते. कोणत्याही पेचप्रसंगातून त्यांनी समाधानकारक तोडगा काढला. छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांचा यशवंतरावांच्या जीवनावर प्रभाव होता. राष्ट्रीय प्रश्नांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन पक्षातील असा लोकशाहीवादी होता. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, अर्थ, गृह इत्यादी खात्यांचा कारभार सांभाळताना श्री. चव्हाण यांनी केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या कार्यकाळात त्यांनी देशाला स्थिरता व बहुमान मिळवून दिला. श्री. चव्हाण अभ्यासू होते. एम. एन. रॉय यांच्या तत्त्वज्ञानामुळे त्यांचा दृष्टिकोन विशाल होता. पक्षाच्या राजकारणापेक्षा देशाचे हित सर्वात महत्त्वाचे आहे असे मानणार्‍यापैकी ते होते. केंद्रसत्ता बलवान करण्यासाठी त्यांनी बलवान महाराष्ट्र उभा केला. यशवंतराव हे महान स्वातंत्र्यसैनिक व कुशल प्रशासक होते.” राष्ट्रपती पुढे म्हणतात,

“प्रत्येक वास्तूला एक व्यक्तिमत्त्व असते. यशवंतराव चव्हाण केंद्राची वास्तू यशवंतरावांची ताकद, दृढता आणि कणखरपणा दर्शविते. या प्रतिष्ठानामार्फत राष्ट्रउभारणीचे कार्य सातत्याने चालू राहील” असे त्यांनी सांगितले. वरील विचार राष्ट्रपतींनी व्यक्त केले.

लोकसभा सभागृहात (संसद भवनात) प्रवेश करण्यासाठी असलेल्या लॉबीच्या प्रवेशद्वारात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते दि. ३ मे १९९४ रोजी झाले. उपराष्ट्रपती के. आर. नारायाणन्, सभापती शिवराज पाटील, गृहमंत्री शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदराव पवार ही प्रमुख मंडळी उपस्थित होती. त्यावेळी केलेल्या भाषणात पतंप्रधान म्हणतात- “आधुनिक भारतातील एक महान संसदपटू व नेते असलेल्या यशवंतरावांचा पुतळा अनावरण करण्याची मिळालेली ही संधी आपणास फार मानाची वाटते. यशवंतराव हे दूरदृष्टी व निश्चयी नेते होते. त्याचबरोबर त्यांचे पाय भक्कमपणे वास्तवात रोवलेले होते. तळागाळातील प्रागतिकपणा व लवचिकता त्यांच्याजवळ होती आणि म्हणूनच देशाबद्दल त्यांनी ठरविलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी इच्छाशक्ती त्यांच्याजवळ होती.” ते पुढे म्हणाले, “यशवंतरावांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महत्त्वाची समजली जाणारी बहुतेक खाती सांभाळली., परंतु यशवंतरावांच्या संरक्षण, गृह व अर्थ या खात्यातील कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा. अत्यंत कठीण अशा काळात यशवंतरावांनी ही तीन खाती सांभाळली. १९६२ मध्ये चीनने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यशवंतरावांनी संरक्षणखात्याची जबाबदारी सांभाळली. १९६६ ते ७० या काळात त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळले. या काळात अनेक राज्यांत काँग्रेसेत्तर आघाडीची सरकारे सत्तेवर आली. एक प्रकारची अनिश्चित व अस्थिर राजकीय परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली., परंतु ही अस्थैर्याची राजकीय परिस्थिती यशवंतरावांनी कौशल्याने हाताळली. १९७० ते ७४ या अर्थमंत्रीपदाच्या कारकीर्दीत विविध आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम त्यांनी राबविला. या तीन खात्यामार्फत त्यांनी देशाला नवी दिशा देण्याचे काम केले.”

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना पंतप्रधान पुढे म्हणाले, “यशवंतराव एक सच्चे देशभक्त व लोकशाहीनिष्ठ होते. त्यांचे जीवन तत्त्वनिष्ठ होते व या निष्ठा त्यांनी आयुष्यभर पाळल्या. राजकीय मतभेदांचा त्यांनी सद्सदविवेक बुद्धीवर कधी परिणाम होऊ दिला नाही. यशवंतरावांनी कर्तव्य बजावताना वैयक्तिक बाबीचा परिणाम त्यावर कधी होऊ दिला नाही किंवा त्याचा प्रभावही पडू दिला नाही. आपल्या सहकार्‍याबद्दल त्यांना आपुलकी होती व त्यांचे व्यक्तिमत्त्व हा सौजन्याचा आदर्श नमुना होता.”

शेवटी पंतप्रधान 'यशवंतरावांच्या पुतळ्यासाठी ही जागा शोधण्याची कल्पकता लोकसभेचे सभापती शिवराज पाटील यांनी दाखविली,' त्याबद्दल पंतप्रधानांनी आपल्या भाषणात या अभिनव कल्पनेचा विशेष उल्लेख केला.