साहित्याप्रमाणेच गाणे, तमाशा, दशावतार याही गोष्टींत त्यांना रस होता. राजकारणात असले तरी या अल्प गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. आपल्यात अपुरेपणा राहू नये म्हणून ते कमालीचे दक्ष असायचे. खफही वेगळेपण आढळले की लगेच ते टिपण्याकडे त्यांचा कल होता. असा केवळ राजकारणाकडील माणसांचा त्यांचा शोध सतत चाललेला होता.
एका इंग्रजी लेखकाने म्हटल्याप्रमाणे 'नवीन विचार, नवीन ज्ञान समजून घेण्याची बौद्धिक उत्सुकता हेच खरे तारुण्याचे लक्षण आहे.' यशवंतरावांच्या चिरतरुण जिज्ञासेतच त्यांच्या ज्ञानाच्या अखंड प्रवासाचे गुपित आहे.
यशवंतरावांच्या ग्रंथप्रेमातून आलेल्या विचारांचा वारसा अनेकविध आठवणीतून येतो. 'नॅशनल बुक ट्रस्ट व मराठी पकाशन परिषद' यांनी संयुक्पणे आयोजित केलेल्या 'ग्रंथोत्सवा' चे पुणे येथे ५ डिसेंबर १९८२ रोजी उद्धाटन यशवंतरावांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी सांगितलेल्या एक-दोन आठवणी... ते म्हणाले, 'डॉ. विल्यम केरी या ख्रिश्चन मिशनर्याने बंगालमधील श्रीरामपूर येथे १८०५ मध्ये 'मराठी भाषेचा कोश' हे मराठी भाषेतील पहिले पुस्तक प्रकाशित केले. मराठी प्रकाशन व्यवसायाची ती सुरुवात होती. त्यानंतर गणपती कृष्णाजी पाटील, जावजी दादाजी आदीनी मोठ्या कष्टाने स्वदेशी छापखाने सुरु केले. पण मुलाचा जन्म आजोळी होतो तसे एका अर्थी मराठी प्रकाशनाचे बंगाल हे आजोळच म्हणावे लागेल. 'गणपत कृष्णाजीनी तुकाराम गाथा पकाशित करण्याचा निर्णय घेतला. छपाईच्या शाईमध्ये चरबी मिसळली असल्याने त्या काळातील सनातन्यांनी या पकाशनाला विरोध केला. तेव्हा गणपत कृष्णाजीनी शाईमध्ये चरबी ऐवजी शुद्ध तूप मिसळले ते तसेच जाहीर करुन शुद्ध तुपामध्ये 'तुकाराम गाथा' प्रकाशित केली' असे ते म्हणाले. शेवटी ग्रंथाचे महत्व विषद करुन ते सांगतात की, 'ग्रंथ हे माणसाचे कधीहि दगा न देणारे मित्र आहेत.' त्यांच्या या वाक्याने श्रोत्यांमध्ये खसखस पिकली, त्याचा रोख ओळखून ते लगेच म्हणाले, 'हा मी माझा राजकारणातला अनुभव सांगत नाही. जीवनात इतरत्रहि हाच अनुभव येतो.' यावर हास्यकल्लोळ उठला व त्यामध्ये स्वतः यशवंतरावहि सहभागी झाले.
आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यत यशवंतरावांनी मराठी भाषेवर नितांत प्रेम केले आणि वारकर्यांच्या निष्ठेने ज्ञानबा-तुकारामाची मराठीची पालखी शेवटपर्यत आपल्या खांद्यावर वागविली.
यशवंतराव चव्हाण यांचे अभिजात ग्रंथप्रेम, त्यांचा विपुल ग्रंथसंग्रह, चौफेर वाचन, सुजाण रसिकता इत्यादि सर्व तसे अपूर्वाईचे. खंत एवढीच की, या प्रतिभावंत चंद्राचे उदंड चांदणे बरसले ते मुख्यत: समाजकारण, राजकारण या प्रदेशावर. झर हा चंद्र पौर्णिमेच्या पूर्ण प्रकाशात शारदेच्या दरबारात फुलला असता तर हे 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर', घडवित, 'ॠणानुबंध' जोडत, 'कृष्णाकाठ' उजळत सागरतीरावरुन यमुनाकाठच्या दिशेने झेपावत असतानाच अकस्मात चंद्राला खळे पडले अन् कृष्णाकाठीच एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला ! सह्याद्रिच दुभंगला, शब्दहि मुके व्हावे असा हा वियोग. प्रबोधनाची गंगोत्री नियतीच्या आघाताने अबोल झाली. जनसामान्यांची रसिकता फुलवणारा कृष्णांकाठ मूक झाला. आता उरल्या फक्त पवित्र स्मृती.