यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व -९

सरकारने १८७६ साली पुण्यात नगरपालिकेची स्थापना केली तेव्हा जोतिबांची एक सभासद म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेव्हापासून सहा वर्षे ते नगरपालिकेचे सभासद होते. तथापि त्यांनी १८८२ मध्ये शिक्षणसुधारणा करण्यासाठी सरकारने नेमलेल्या हंटर समितीपुढे दिलेली साक्ष लक्षणीय होती. उच्च शिक्षणाचा प्रसार करावा म्हणजे हे शिक्षण घेतलेले, समाजाच्या अनेक थरांत शिक्षणाचा प्रसार करतील असे विचार मांडले जात होते. पण या प्रकारे उच्च शिक्षण घेतलेल्या कितीजणांनी शिक्षणप्रसाराचे काम केले व बहुजनसमाजास त्याचा कितपत लाभ झाला, असा सवाल उपस्थित करून सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारास प्राधान्य देण्याचा आग्रह जोतिबांनी आपल्या साक्षीत धरला. जोतिबांनी हेही दाखवून दिले की, प्राथमिक शिक्षणच बहुजनसमाजापर्यत पोचत नसल्यामुळे व उच्च शिक्षण घेण्याची ऐपत बहुजनसमाजातील फारच थोड्या कुटुंबांत असल्यामुळे, उच्च शिक्षणाचा लाभ या समाजातल्या मुलांना मिळणे दुरापास्त असते. म्हणून प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हे पायाभूत तत्त्व हवे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, गोपाळ कृष्ण गोखले यांचाही हाच दृष्टिकोण होता. म्हणून त्यांनी तेव्हाच्या केद्रीय विधीमंडळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे विधेयक मांडले होते. यासाठी त्यांनी व त्यांच्या भारत सेवक समाजाने बराच प्रचारही केला होता. तथापि गोखले यांच्या प्रयत्नांचे स्वागत करूनही ब्रिटिश सरकारने सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा खर्च परवडणार नाही अशी बाजू मांडून, विधेयक स्वीकारण्यास नकार दिला.
 
जोतिबांनी शेतकरी गरीब का झाला, त्याची सर्व बाजूंनी नाडवणूक कशी होते याची मीमांसा करताना, हिंदू समाजाच्या धार्मिक परंपरेचेच कठोरपणे विश्लेषण केले. त्यांनी वेदान्तालाच आव्हान दिले. याच संदर्भात त्यांनी वर्णव्यवस्थेवर हल्ला केला. जोतिबांनी वेद, श्रुतिस्मृती इत्यादी नाकारली आणि वेद अपौरूषेय आहेत हे एक थोतांड ठरवले. पुराणांमुळे प्राचीन काळाच्या इतिहासाची थोडीशी कल्पना येण्यास मदत होईल. पण वेद व पुराणे हे खरे ज्ञान नव्हे. जोतिबांच्या पाच वर्षे अगोदर जन्मलेल्या लोकहितवादीची हीच विचारसरणी होती. जे ज्ञान प्रयोगसिध्द नाही ते खरे ज्ञान नव्हे असे सांगून, लोकहितवादींनी घटपटाची नसती खटपट करणे व्यर्थ असून, आधुनिक पाश्चात्य विध्या आत्मसात करण्याची आवश्यकता प्रतिपादली होती. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी या आधी हीच भूमिका घेऊन पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र यांचे व इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता.
 
इराणसारख्या देशात ब्राह्मण इकडे आले आणि त्यांनी एतद्देशीय लोकांवर मात करून आपले वर्चस्व स्थापन केले. मग त्यांनी जी समाजव्यवस्था निर्माण केली ती इथल्या मूळ लोकांवर अन्याय करणारी होती. जातींची उतरंड रचण्यात येऊन शिवाशिवीचा प्रघात सुरू झाला. वेद व पुराणे ही एतद्देशीयांना वाचण्यास बंदी करण्यात आली. या रीतीने आर्थिक व सामाजिक बाबतीत अन्यायकारक व्यवस्था करून ब्राह्मणांनी धार्मिक कर्मकांड तयार केले व शुद्रांना मानसिक गुलामगिरी ठेवण्याचा घाट घातला, अशी जोतिबांनी मीमांसा केली होती. इंग्रजी राजवटीमुळे जे बदल झाले आहेत त्याचा फायदा घेऊन शूद्रांनी शिक्षणाच्या व्दारे आपली उन्नती करून घ्यावी असा त्यांनी संदेश दिला.
 
जोतिबा, ब्राह्मण या शब्दापेक्षा धूर्त आर्य भट असे बहुतेक वेळी म्हणताना दिसतील. अस्पृश्यता ही या आर्य भटांनी निर्माण केल्याचे सांगून, ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरूध्द देशात अनेक ठिकाणी प्रतिकार झाले. गौतम बुध्दाचा धर्म हा या प्रतिकाराचाच भाग होता असे जोतिबा मानत. ते बुध्दाचा उल्लेख सांख्यमुनी असा करत. सांख्यमुनींनी अस्पृश्यांना जवळ केले कारण ते जातिभेदाच्या विरूध्द होते असा निष्कर्ष जोतिबांनी काढला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही यामुळे बौध्दमताचे आकर्षण वाटू लागले आणि अखेरीस त्यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली.