यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ५

माध्यमिक शाळेत असताना आपल्या मनाची काय अवस्था होती याचे प्रत्ययकारी वर्णन यशवंतरावांनी थोडक्यात केले आहे. ते लिहितात, “ आम्ही मुले परावलंबी होणार नाही याचीही काळजी तिला (आईला )  होती. पण तिने तसे कधी भासू दिले नाही. त्या लहान वयात मला ते थोडे फार समजत होते, पण त्यावरचा उपाय मात्र उमजत नव्हता—नियतीला जग केवळ सुखीही ठेवायचे नाही आणि दु:खीही बनवायचे नाही. श्रीखंडाच्या जेवणातही ङिरव्या मिरचीची चटणी लागतेच; तरच त्या जेवणाला रूची येते आणि सुखाने श्रीखंड पोटभर खाता येते, पण त्या वेळी माझ्या पानात काहीच नव्हते. मोकळ्या ताटावर बसून भूक भागविण्याची आईची कला मला अवगत नव्हती. मनाच्या कोंडवाड्यातून बाहेर पडावे, धडपड करावी, शिकावे, आईचे ओझे कमी करावे असे नेहमी वाटे. परंतु जागच्या जागी पंख फडफडाविण्याव्यतिरित्त्क मी काही करू शकत नव्हतो. परिस्थितीचे कुंपण चारी बाजूंनी उभे होते-या कोडीतून बाहेर निसटायचे एवढेच माझ्या समोर होते.” (यशवंतराव चव्हाण ऋणानुबंध, पृ.१०)
 
या प्रकारच्या स्थितीत वाढणारी मुले पुढील काळात मनाने निबर होतात किंवा जरा परिस्थिती सुधीरली तर ख्यालीखुशालीत मग्न होतात. एकप्रकारे सर्वतुच्छतावादी होण्याचाही संभव असतो. पण यशवंतरावांना यांपैकी कशाचीच बाधा झाली नाही. आशावादाला त्यांनी प्रयत्नवादाची जोड दिली. लहानपणी वाट्यास आलेल्या अनुभवांमुळे त्यांच्यात सावधानपणा आला आणि म्हणून त्यांनी मनाचा तोल जाऊ दिला नाही, असे म्हणावयास हरकत नाही.
 
य़शवंतराव पदवी परीक्षेपर्यत शिकले; वकिलीच्या परीक्षेतही यशस्वी होऊन काही काळ वकीली केली, पण स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊन कॉंग्रेसच्या राजकारणात सक्रिय होता होता, १९४६ साली ते गृहखात्याचे संसदीय सचिव (पार्लमेंटरी सेक्रेटरी) झाले आणि पुढे व्दैभाषिकाचे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र अशा खात्यांचे मंत्री होत उपपंतप्रधानपदापर्यत चढले. त्यांच्या रूपाने महाराष्ट्रला एक विवेकी व सुसंस्कृत नेर्तृत्व लाभून महाराष्ट्राच्या जीवनावर त्यांनी आपला ठसा कायमचा उमटवला. या रीतीने कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवणा-या व्यत्त्कीच्या जीवनाचा आलेख काढायचा तर तिच्यावरील नुसते कौटुंबिक संस्कार पाहून चालत नाही, तर या संस्कारांबरोबरच त्या काळातील सामाजिक व राजकीय घडामोडींचाही संदर्भ लक्षात घेणे अगत्याचे असते. या अशा व्यापक पार्श्वभूमीवर यशवंतरावांच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा आलेख काढायचा आहे.
 
यशवंतराव कराडला सातवी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि मग माध्यमिक शाळेत त्यांनी प्रवेश केला. त्या काळात सातवी इयत्ता म्हणजे व्हर्न्याक्युलर फायनलची परीक्षा म्हणून ओळखली जात असे. ती झालेल्यास प्राथमिक शाळेत नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होत होता. पण यशवंतराव याप्रमाणे शिक्षक होण्याची वाट पाहत नव्हते. त्यांना जितके शिकता येईल तितके शिकायचे होते. म्हणून ते कराडच्या टिळक विध्यालयात दाखल झाले. मराठी सातवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यास माध्यमिक शाळेच्या पहिल्या तीन इयत्तांची परीक्षा देण्याची मुभा होती. तशी परीक्षा दिल्यामुळे यशवंतरावांना इंग्रजी चौथ्या इयत्तेत प्रवेश मिळवता आला.
 
कराडची ही शाळा स्थानिक लोकांनी लोकमान्यांच्या स्मरणार्थ स्थापन केली होती. या शाळेतल्या विध्यार्थ्याना पुण्याच्या नूतन-मराठी विध्यालयात दर वर्षी होणा-या वत्त्कृत्वस्पर्धेत भाग घेण्याची मुभा असे. त्याप्रमाणे १९३१ साली यशवंतरावांनी या स्पर्धेत भाग घेणा-या विध्यार्थ्यास दहा मिनिटांचा वेळ मिळे. यशवंतरावा्ना विषय दिला होता, ‘ ग्रामीणसुधारणा ’ त्याचे भाषण परिक्षकांना इतके आवडले, की त्यांनी आणखी दहा मिनिटे दिली आणि यशवंतरावांना दीडशे रूपयांचे पहिले बक्षीस मिळाले. नंतरच्या काळात यशस्वी वत्का म्हणून त्यांनी लौकिक मिळवला; त्याचा आरंभ वयाच्या सतराव्या वर्षी झाला होता.