यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ६

यशवंतराव व त्यांचे काही मित्र यांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा उपक्रम कराडमध्ये याच सुमारास सुरू केला. या उत्सवात भजनाचे कार्यक्रम ठेवण्याची कल्पना निघाली आणि मग हे कार्यक्रम यशस्वी होत गेले. टाळ, मृदंग यांच्या साथीत भजन हा प्रकार या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्याची आवड निर्माण झाली, असे यशवंतरावांनी लिहिले आहे. कृष्णा बागणीकर, भागवत हणबरवाडीकर, म्हैसूरकर महाराज, औधचे आंधळे पण नाणावलेले मृदंगवादक दाजी गुरव अशांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. या अशा कार्याक्रमांसाठी कराडच्या आसपासचे लोकही हजर असत. यानंतर आपले मित्र काशिनाथपंत देशमुख यांच्याबरोबर भजनाचे  अनेक कार्यक्रम यशवंतरावांनी सुटीत ऐकले. यातून संगिताची आवड निर्माण झाली व वाढत गेली. यामु्ळे यशवंतरावांना रागदारीचेही ज्ञान झाले. पुढील काळात ही आवड त्यांनी जोपासली. नाटकाचाही छंद याच वेळेला लागला कराडला वर्ष-दीडवर्षानी ‘आनंदविलास’ नाटक कंपनी येत असे. तिची नाटके यशवंतरावांनी कधी चुकवली नाहीत. दीनानाथ मंगेशकर, रघुवीर सावरकर इत्यादीची नाटके यशवंतरावांनी कराडमध्येच पाहिली. नाटके पाहता पाहता आपणही नाटकात काम करावे अशी इच्छा निर्माण होऊन, शाळेतल्या संमेलनात माईसाहेब या नाटकात त्यांनी एक भूमिकाही केली अधिक चांगली नाटके पाहण्याची इच्छा कोल्हापूरला केशवराव दाते यांचे नाटक पाहून पुरी करता आली.
 
नाटकाप्रमाणे तणाशाही मित्रांसमवेत पाहण्याची संधी यशवंतरावांनी सोडली नाही. संगीत, भजन, नाटक यांप्रमाणेच कुस्त्यांचे फड हा यशवंतराव व त्यांचे मित्र यांचा आवडीचा कार्यक्रम होता. तथापितालमित जाऊन नियमित व्यायाम करण्याचे मात्र त्यांनी टाळले होते. ही कसर ते पोहून भरून काढत. या रीतीने ग्रामीण भागात वा कराडसारख्या मध्यम शहरात त्या वेळी करमणुकीचे हे जे कार्यक्रम होत असत, त्यांचे आकर्षण यशवंतरावांना होते हाही संस्कार महत्त्वाचा होता.
 
माध्यमिक शाळेत असताना यशवंतराव केवळ वृत्तपत्रवाचनावर समाधान मानत नव्हते. त्यांनी पुस्तक वाचावर भर दिला. मिळतील ती  पुस्तके ते वाचत होते. सुटीत देवराष्ट्रास गेले तर पुस्तकांचा संच बरोबर नेण्यास ते विसरत नसत. स्वातंत्र्यपूर्व काळात-साधारण: माध्यमिक शाळेत शिकणा-या विध्यार्थ्यात-चालू राजकारणासंबंधी उत्सुकता असल्याचे दिसून येईल यशवंतरावांच्या ठिकाणी ही उत्सुकता बरीच होती. यामुळे स्थानिक वृत्तपत्रांच्या वाचनावर संतोष न मानता पुण्या-मुंबईहून येणा-या वृत्तपत्रांचे वाचन ते नियमितपणे करत होते त्यातच सातारा जिल्ह्याची ऐतिहासिक परंपरा मोठी होती आणि तिची वारंवार जाणीव व्हावी असे प्रसंगही येत असत.
 
ही ऐतिहासिक परंपरा शिवाजी महाराजांपासून सुरू होते. जिल्ह्यातील प्रतापगड व सज्जनगड हे शिवाजी राजाच्या काळातील पुरूषार्थाचे सतत स्मरण देत. पुढील काळात शाहू महाराजांनी सातारलाच छत्रपतीची गादी आणली. एल्फिन्स्टनने पेशव्यांचा पराभव करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट स्थापन केली. मग पुणे व आसपासच्या जनतेला राजी राखण्याचे प्रयत्न केले. पुणे, नाशिक, वाई इत्यादी ठिकाणी त्याने शास्त्री-पंडितांना दक्षिणा वाटल्या. तसेच त्याने मराठा समाज राजी राखण्याच्या हेतूने सातरच्या गादीवर भोसले कुळातील व्यत्त्कीला बसवण्याचे ठरवून त्याप्रमाणे मोठा समारंभ घडवून आणला. या रीतीने प्रतापसिंह महाराज छत्रपतीच्या गादीवर स्थानापन्न झाले. प्रतापसिंह महाराज तरूण होते, पण एल्फिन्स्टनवर ते प्रभाव टाकू शकले.

निवृत्त होऊन एल्फिन्स्टन स्वदेशी परतला तरी त्याचे भारतातील घडामोडीकडे लक्ष होते. लॉर्डडलहौसी हा गव्हर्नर-जनरल असताना त्याने भारतातल्या संस्थानांबद्दलचे धोरण बदलून, कोणत्या ना कोणत्या कारणाने एकेक संस्थान खालसा करण्याचे सत्र सुरू केले. सातारचे राजे प्रतापसिंह हे ब्रिटिश सरकारविरूध्द बंड करण्यासाठी शिपायांना चिथावणी देतात असा डलहौसीचा आरोप होता. पण प्रतापसिंह महाराजांनी तो नाकारला. त्यांनी चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिल्याच्या कारणास्तव त्यांना पदच्युत करण्यात आले आणि त्यांच्या जागी त्यांच्या भावाला बसवण्यात आले. तो मोठ्या आजाराने आजारी झाल्यामुळे त्याने वारसा नेमण्याची परवानगी मागितली. ती नाकारण्यात येऊन डलहौसीने सातारा संस्थानच खालसा केले.