यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ४

यशवंतराव चव्हाण यांचा देवराष्ट्र इथे १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून जवळ असलेल्या या गावी यशवंतरावांचे आजोळ होते. त्यांच्या जन्माच्या वेळी गावाची लोकसंख्या केवळ दीडदोन हजारांपर्यत होती. तथापि काही दशकांपूर्वी. सातवाहनांच्या राज्यानंतर छोटीमोठी राज्ये उद्याला आली त्यांत देवराष्ट्र हे एक होते. त्याची राजधानी होती कौडिन्यपूर. नंतर तिचे नाव कुंडली पडले.

यशवंतरावांनी कृष्णाकांठ या आत्मवृत्तात्मक पुस्तकात देवराष्ट्रचे प्रारंभीच वर्णन दिले आहे. ते सांगतात की, देवराष्ट्रचे कुबेर असेही नाव होते आणि गावात कुबेरेश्वराचे देऊळ आजही आहे. नैऋत्येला सागरेश्वराचे मंदीर आणि खिड लागते. ती ओलांडल्यावर कृष्णेचे खोरे असून स्वातंत्र्योत्तर काळात तिथे आणखी सुबत्ता आली असली तरी पूर्वीच्या काळीही सुबत्ता होती. सागरेश्वराचे देऊळ-सागरोबाचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्याला लागूनच वाहणा-या ओढ्याचे सोनहिरा असे मोहक नाव आहे.
 
गावात ज्यांची विहीर आहे आणि त्यामुळे ब-यापैकी शेती आहे, अशी पाचदहा कुटुंबे होती आणि थोडी व्यापार-उदीम करणारी. ही सोडली तर बाकी गरीब मराठा, सणगर, धनगर अशी जी कुटुंबे होती ती काबाडकष्ट करून जगत होती. शेती हा मुख्य व्यवसाय होता. यशवंतराव अशा शेजा-यांत वाढत होते. त्यांचे कुटुंब गरीब होते. वडील बळवंतराव हे विट्याजवळ असलेली थोडी शेती पाहत. पण कोरडवाहू जमीन काही फारसे उत्पन्न देत नसे. तेव्हा नोकरीच्या शोधात बळवंतरावांना फिरावे लागले. पण नंतर त्यांना बेलिफाची नोकरी मिळली. त्यांचे वडीलही बेलीफ होते. या नोकरीमुळे यशवंतरावांच्या वडिलांना फिरती असे, पण काही निश्चित उत्पन्न मिळत होते.
 
ज्ञानोबा, गणपतराव हे दोन भाऊ आणि राधाबाई ही बहीण अशी यशवंतरावांना तीन भावंडे होती. यशवंतरावांची पहिली शाळा देवराष्ट्र इथलीच. पण ते चार वर्षाचे असताना या कुटुंबावर मोठा आघात झाला. १९१७ सालात प्लेगची साथ आली होती आणि बळवंतराव देवराषट्र इथे आले ते आजारी होऊन. याच आजारात त्यांचे निधन झाले. यामुळे यशवंतरावांच्या आई विठाबाईवर आकाश कोसळले. घरात दुसरे मिळवते कोणी नव्हते. ज्ञानोबा तेव्हा सोळा-सतरा वर्षाचे होते. बळवंतरावांचे काम चांगले असल्यामुळे त्यांची बेलिफाची नोकरी ज्ञानोबा यांना देण्यात आली. परंतु देवराष्ट्र इथे राहणे शक्य नव्हते. तेव्हा विठाबाईनी कराडला बि-हाड हलवले. ज्ञानोबा काही रक्कम पाठवत, तीत विठाबाई काबाडकष्ट करून थोडी भर टाकत.
 
विठाबाई या निरक्षर होत्या, पण शिक्षणाचे महत्त्व जाणत होत्या. कोणाची नोकरी करायची नसेल तर करू नका, लोकांची कामे करायची असतील ती करा, पण शिक्षण सोडू नका; त्यामुळेच तुमचे भले होईल असे त्या आपल्या मुलांच्या मनावर बिंबवित असत. तेव्हा यशवंतरावांनी शिक्षणात खंड पडू देऊ नये. आपण घरखर्चाचे पाहू असे आश्वासन गणपतरावांनी दिले व ते अखेरपर्यत पाळले. यामुळे आपली आई व आपले भाऊ यांचे ऋण यशवंतराव कधी विसरले नाहीत. तसेच ज्या गरीब खेडुतांत ते वाढले होते त्यांनाही ते विसरले नाहीत आणि यामुळे मोठमोठ्या अधिकारपदांवर चढूनही त्यांचे दार अशा लोकांना नेहमीच मोकळे राहिले. नंतरच्या काळात यशवंतराव समाजवादी विचारांच्या प्रभावाखाली आले पण त्या विचारात कष्टकरी जनतेच्या कल्याणाचा जो गाभा आहे त्याबद्दलची जाणीव ग्रथवाचनाने तीव्र झाली असली तरी तिचा उगम स्वानुभवात होता.

यशवंतरावांवर त्यांच्या आईने आणखी एक संस्कार केला होता. तो म्हणजे कितीही संकटे आली तरी धीर न सोडता आशावादी राहण्याचा. विठाबाई संकटकाळी कधी डगमगल्या नाहीत आणि मुलांनीही धैर्य न सोडता संकटास तोंड दिले पाहिजे हा त्यांचा उपदेश होता.

 नका, बाळांनो डगमगू,
 चंद्र-सूर्यावरील जाई ढगू

ही ओवी त्या अनेकदा म्हणत. ती यशवंतरावांच्या मनावर ठसली होती.