यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व -७

डलहौसीचे हे धोरण एल्फिन्स्टनला मंजूर नव्हते. त्याने हिंदुस्थानातील संस्थानासंबंधी बराच मोठा लेखलिहिण्यासाठी टिपणे केली होती. त्यांत प्रतापसिंह महाराजांसंबंधी बरीच  टिपणे असल्याचे एल्फिन्स्टनचा चरित्रकार कोलब्रूक याने नमूद केले आहे. एल्फिन्स्टन इतका नाराज झाला होता, तर भारतात किती नाराजी असेल याची कल्पना केलेली बरी. भास्कर पांडुरंग तर्खजकर हे कंपनीच्या कारभाराचे टीकाकार होते त्यांनी लिहिले, की हिंदुस्थानातल्या कोणत्याही राजापेक्षा प्रतापसिंह यांना राजकीय जाण अधिक आहे. त्यांना दूर करून दुर्बल व्यत्त्कीला गादीचा वारस करून कंपनी सरकारचे काय साधले ? नंतरच्या काळात सातारच्या संस्थानाचे पुनरूज्जीवन करावे म्हणून रंगो बापूजींनी अविश्रांत परिश्रम केले, पण त्यांना यश आले नाही.
 
कंपनी सरकारच्या राजवटीशी सहकार्य न करता, तिच्याविरूध्द बंडाचे निशाण उभारण्यात उमाजी नाईक पुढे होता. त्याचे हे बंड सातारा जिल्ह्यातच झाले. तो रामोशी जातीचा होता. या जातीचे लोक तेलंगणातून  महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात या जातीचे काही लोक होते. पण कंपनीची राजवट आल्यावर रामोशांचा नेता उमाजी नाईक याने बंड केले. परंतु सरकारशी संघर्ष करताना उमाजी नाईक मारला गेला. सातारा जिल्ह्यांतील ब्रिटिश सरकारविरूध्द झालेले आणखी एक बंड म्हणजे वासुदेव बळवंत यांचे. त्यांनीही खेड्यापाड्यांतील गरीब लोक जमवून सशस्त्र उठाव केला होता. नंतरच्या काळात १८५७ चा उठाव मुख्यत: उत्तर भारतात झाला होता, तरीही महाराष्ट्र, दक्षिण भारत यातही अनेक ठिकाणी सशस्त्र उठाव झाले होते. ५७सालच्या उठावास अनेक प्रकारे मदत देणारे गट, कोल्हापूर आणि सातारा या भागात संघटित झालेले दिसतील.
 
इंग्रजी राज्य स्थिरावल्यावर इंग्रजी-शिक्षित पिढी पुढे येऊ लागली आणि मग १८८५ साली अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली. तीत लावकरच जहाल व नेमस्त असे तट पडले. या दोन्ही गटांचे पाठिराखे सातारा जिल्ह्यात होते. या विचारपंथांचे नेते मुंबई-पुण्याहून साता-यास येत; त्यांची व्याख्याने होत. लोकमान्य टिळक सातारला भाषणासाठी आले. तर मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकमान्य व गोपाळ कृष्ण गोखले यांचा सातारा जिल्ह्यातील कर्त्या लोकांशी संपर्क होता. कराडचाही याच कारमास्तव मुंबई पुण्याच्या पुढा-यांशी संपर्क येत असे. नरसिंह ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे सातारचे. ते लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’त साहाय्यक म्हणून पुण्यास गेले. पण त्यांचा जिल्ह्याशी नित्य संबंध येत होता. ते व शिवरामपंत परांजपे यांची १९२० नंतर कराडमध्ये जी भाषणे झाली, ती यशवंतरावांना अगदी लहान वयात ऐकण्यास मिळाली होती. वाईत नारायणशास्त्री मराठे यांनी प्राज्ञपाठशाळा स्थापन केली होती. ती निव्वळ प्राच्यविध्येचा अभ्यास करण्यासाठी नव्हती, तर तीत स्वदेशी, स्वावलंबन व राष्ट्रवाद यांचीही संस्था मिळत होती. या प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, दिनकरशास्त्री कानडे, परचुरेशास्त्री असे विव्दान तयार झाले होते आणि ते लोकशिक्षण व जागृतीचे महत्त्वाचे काम करत होते.
 
काँग्रेसचा हा एक राष्ट्रीय प्रवाह होता तसा आणखी एक विचारप्रवाह महाराष्ट्रात होता. तो सत्यशोधक समाजाने प्रवर्तित केला होता. नंतर याचेच रूपांतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीत झाले. या चळवळीचा बराच प्रसार सातारा जिल्ह्यात झाला होता. किंबहुना, तो जिल्हा सत्यशोधक समाजाचा मुख्य आधार होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यशवंतरावांचे वडीलभाऊ गणपतराव हे या समाजाचे वा ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचे एक सक्रिय कार्यकर्ते होते.

कराडमध्ये तेव्हा भाऊसाहेब कळंबे या नावाची एक महत्त्वाची व्यक्ती होती. यशवंतरावांनी लिहिले आहे की, कळंबे उत्तम शिक्षक होते. पण त्यांचा क्रांतिकारकांशी संबंध असल्याचा सरकारला संशय असल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. मग त्यांनी कराडमध्ये ‘विजयाश्रम’ या नावाची स्थापन केली. सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने शिक्षण देणे हा या संस्थेचा हेतू होता.