बाबासाहेबांनी रामानुजाचार्याचे उदाहरण दिले आहे. रामानुजांनी जातिभेद व अस्पृश्यता मानली नाही तर चैतन्यांनी पुरीचे मंदिर अस्पुश्यांसह सर्वांना खुले केले होते व नंतरही ती परंपरा टिकली. महाराष्ट्रात हे झाले नाही. भागवत धर्म व संतमंडळी यांनी धार्मिक समतेचा संदेश दिला असला तरी सामाजिक समतेचा त्यात समावेश नव्हता, हे जोतिबा व डॉ. आंबेडकर दाखवून देत होते. याचे कारण या दोघांच्या मते भागवत धर्माने वैदिक धर्म मानला होता. यामुळेच आर्य समाज हा जरी जातीपातीच्या विरूध्द होता तरी वेदप्रामाण्य मानणारा असल्यामुळे जोतिबा आर्यसमाजाबद्दल आत्मीयता बाळगत नसत. जोतिबांनी कोणत्याच प्रस्थापित धर्माचा आधार न घेता सत्य धर्माचा पुरस्कार केला. त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती म्हणून त्यांनी विश्वाचा कर्ता असा एक निर्मिक असल्याचे मानले. या निर्मिकाची उपासना करण्यासाठी पुजारी इत्यादींच्या मध्यस्थीची गरज नाही; सर्व माणसे समान आहेत; त्यांना समान संधी मिळाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. यामुळे सत्यशोधकी विवाहादी विधी पुरोहिताशिवाय करण्याचा प्रघात त्यांनी पाडला.
देशातील बहुसंख्य सामान्य लोक शेती करणारे असून, त्यांच्या हलाखीबद्दल जोतिबा कळवळून लिहीत असत. शेतक-यांच्या हलाखीची त्यांनी शेतकरी व शेती यांच्यासंबंधी भरपूर लिखाण केले होते. शेतीत भाडवलपुरवठा करण्याची गरज असून चार टक्क्यांपेक्षा अधिक दराने व्याज न घेता कर्जपुरवठा करावा; शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था योग्य प्रकारे करावी असे रानडे सांगत असत त्यांनी व जोशी यांनी सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकातून या मताचा पाठपुरावा केला होता. लोकमान्य टिळकानी ‘केसरी’तून शेतक-यांची बाजू अशाच प्रकारे मांडली. रानडे व टिळक यांनी दुष्काळात शेतक-याचे प्रश्न हाताळले. शेतक-यांना द्यावा लागणारा सारा किती डोईजड आहे, याची चर्चा या दोघांनी केली तर गोखल्यांनी विधिमंडळात अशीच बाजू मांडली. असे असले तरी रानडे, टिळक, गोखले यांची व जोतिबांची हातमिळवणी होऊन एकत्रितपणे शेतक-यांची बाजू मांडण्याचे प्रयत्न झाले नाहीत, याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. किंबहुना, हीही आश्चर्याची बाब आहे की, महाराष्ट्रातील तत्कालीन नेत्यांनी जोतिबांचे कार्य व विचार यांची दखलच घेतली नाही. ती तशी तेव्हा दखल घेतली नाहीच, शिवाय नंतरच्या काळात महाराष्ट्रात समाजवादी पक्ष स्थापन झाला असतानाही त्याने जोतिबांचा विचार केला नाही. नानासाहेब गोरे यांनी ही उणीव मान्य करून म्हटले होते की, आम्ही (म्हणजे समाजवाद्यांनी) मार्क्सचा अभ्यास केला, पण जोतिबांकडे उशिरा वळलो.
पुण्यात १८९५ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले असताना मंडपाबाहेर गरीब शेतक-याचे चित्र असलेला फलक कोणीतरी लावला होता व लोकमान्यांनी त्याचा उल्लेख करून, काँग्रेसने शेतक-यांच्या समस्या निवारण्याच्या दृष्टीने कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. तो फलक जोतिबांनी वा त्यांच्या प्रेरणेने लावला होता असे मानले जाते. तेव्हा नेत्यांनी जोतिबांच्या या कार्यास साहाय्य करण्यास हरकत नव्हती. त्यांची सामाजिक व धार्मिक मते अमान्य असली तरी बहुजन समाजात एक नवा विचार मूळ धरत असताना त्याची नेत्यांनी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यर्थ नव्हती. केवळ नवा विचारच जोर धरून नव्हता तर सत्यशोधक समाजाला मिळणारा पाठिंबा वाढत होता. परंतु महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी जोतिबांच्या कार्याचे महत्त्व जाणले नव्हते, तर काँग्रेसबद्दल जोतिबांनाही आत्मीयता नव्हती. काँग्रेसचे धोरण व कारभार हा वरिष्ठ वर्गास व जातीस पोषक असल्याचे त्यांचे मत होते. काँग्रेस लोकप्रतिनिधींच्या हाती अधिकाधिक सत्ता देण्याची मागणी करत होती. जोतिबांचे म्हणणे असे होते की, मर्यादित मतदानाचा हक्क असल्यामुळे खरे लोकप्रतिनिधी निवडून येणार नाहीत आणि वरिष्ठ जातीच प्रबळ होतील. जोतिबांनी लिहिले, “ न्याशनल काँग्रेसांत समंजस असा शूद्रादि अतिशूद्र कधींच सामील होणार नाहीं, असे मी खात्रीने सांगतो कारण, तसे केल्याने आमच्या द्याळू इंग्रज सरकारचे शूद्रादि अतिशूद्राविषयीं मन विटणार आहे. “ अर्थात तसे झाले नाही.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाच्या प्रभावामुळे बहुजनसमाज काँग्रेसकडे आकर्षित झाला.