अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 9

राज्यपुनर्रचनेच्या चळवळीच्या काळांत काँग्रेस सोडून जाणारे किती तरी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये परत आले आहेत. यशवंतरावांनी त्यांना दिलासा दिला आहे की, त्यांना मानानें वागविलें जाईल. तरी कांही ठिकाणीं भांडणे होऊं लागलीं आहेत. रस्सीखेंच चालू झाली आहे. पूर्वीच असलेल्या मतभेदांत नवी भर पडली आहे. ही जागा त्यांना कां? जुन्यांचा असा अनादर का? आमच्या पेक्षां काँग्रेसचें काम कमी करणा-यांना व नव्यांना एवढें प्रोत्साहन कां ? आमच्या काँग्रेसनिष्ठेचे हेंच बक्षीस काय ? यशवंतरावांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण अमकीं-तमकीं माणसें आम्हांला कमी लेखण्याच्या खटपटींत असतांना यशवंतराव त्यांना कां आवरीत नाहीत ? आमच्यावरील त्यांचे प्रेम कमी होत आहे असें आम्ही समजावें काय ? अशा प्रकारची गा-हाणीं घेऊन ही मंडळी माझ्याकडे येऊन म्हणतात की, "तुम्ही हें सारें यशवंतरावांना समजावून सांगा व आम्हांला साहाय्य करा."; तेव्हा मी त्यांना म्हणतो, "माझ्याकडून हें काम होणार नाही. कोणत्याहि व कसल्याहि प्रकारच्या भांडणाचा प्रश्न यशवंतरावांसमोर नेऊन त्यांना त्रास द्यावयाचा नाही हें धोरण मी ठरविलें आहे. त्यांनी आपणहून विचारल्यास मला माहीत असलेली परिस्थिती त्यांना सांगेन व ते जें विचारांती ठरवितील त्यालाच मी पाठिंबा देईन." अशा प्रसंगी मी म्हणत असतों, "आपला यशवंतरावांवर पूर्ण विश्वास आहे ना ? मग त्याना भेटून अथवा लेखी निवेदन पाठवून ते सांगतील त्याप्रमाणे, जरी आपल्या इच्छेविरुद्ध असलें तरी, वागत चला ! एकीकडे त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून म्हणावें आणि दुसरीकडे राग-आवेशांना बळीं जाऊन स्वत:च्या मताप्रमाणे धोरण आंखावें व स्वत:ला आणि यशवंतरावांना अडचणींत, धर्मसंकटांत टाकावें, हें सुसंगत ठरणार नाही. यशवंतराव सर्व दृष्टीनें, सर्व बाजूने विचार करूनच एखाद्या प्रश्नाचे बाबतींत निर्णयाला येतात. आपण एकाच दृष्टीने एखाद्या प्रश्नाकडे पाहत असतों आणि आपलें मत बनवीत असतो आणि मग यशवंतरावांची चूक झाली असें म्हणतों. ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाच्या हाताला हत्तीची सोंड लागली म्हणजे हत्ती सोंडेसारखाच आहे असें तो म्हणूं लागतो; पण डोळस माणसाला हत्तीचे खरे स्वरुप सांगतं येतें, तद्वत् यशवंतराव डोळसपणें व साधक बाधक रीतीनें विचार करून एखाद्या प्रश्नाचा निकाल लावतात. संघटण यंत्राचा एखादा खिळा बेकाम अथवा बाजूला सरकूं नये याबद्दल यशवंतराव सदा दक्ष असतात."

फड नासोंचि नेदाव । पडिला प्रसंग सांवरावा ।
अतिवाद न करावा । कोणी एकासी ।।

या समथोंक्तिनुसार संघटण शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने अतिवाद न करतां त्यांच्यासमोर आलेल्या वादग्रस्त प्रश्नांचा ते निकाल देतात.

अशा वेळीं शिस्तीकरिता व नियमांचे पालन व्हावें म्हणून कांही प्रसंगी जुन्या व चांगले काम करणा-या कार्यकर्त्यांना त्यांच्या चुकीबद्दल यशवंतरावांना पाठीशी घालता येत नाही. कर्तव्य म्हणून त्यांना कर्तव्यकठोर व्हावें लागतें. अशा वेळीं त्यांच्या हृदयाला वेदना होतात व त्यांच्या तोंडून असे उद्गार निघतांना मीं ऐकलें आहे की, "मी काय करूं ? ह्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मित्रांनी मला माझ्या संकटकाळी फार मदत केलेली आहे. त्यांचे ऋण मी कधीहि विसरणार नाही ; पण मला माझें कर्तव्य केलेंच पाहिजे." या त्यांच्या उद्गारांवरुन त्यांच्या हृदयांत सहकारी कार्यकर्त्यांबद्दल असणा-या सहानुभूतिपूर्ण नाजूक व कोमल भावनांची ओळख होते. एखाद्या वेळीं कार्यकर्त्यांच्या मनासारखें कांही काम होऊ शकलें नाही तरी त्याला ते विसरत नाहीत. पुन: प्रसंग आल्यावर त्याच्या सेवेचें चीज केल्यावांचून ते राहत नाहीत.

कोणत्याहि सरकारी अथवा निमसरकारी संस्थेवर सरकारतर्फे सदस्य-नियुक्तीचा प्रसंग आला की त्यांचेसमोर पेंच निर्माण होतो. सारे बरोबरीचे काम करणारे कार्यकर्ते ! कोणाला त्यांतून घ्यावें आणि कोणाला घेऊं नये ? ज्या कोणा एखा-दोघांना घेतलें की बाकीच्यांची नाराजी व्हवयाची.अशा वेळी त्यांचे तोंडून असे उद्गार निघतात की, "असले प्रसंग मनाला ताप देणारे असतात. सर्वांची सोय मला करतां आली असती तर किती बरें झालें असते ! काय करू ? जागा थोड्या, उमेदवार जास्त ! उपाय नाही !" यावरून त्यांचे ठाम मत झालें आहे की, कोणत्याहि सरकारी, निमसरकारी वगैरे संस्थांवर सरकारतर्फे सदस्यांना पाठवावयाची नामजद - नॉमिनेट-प्रथा राहूं नये. नागपूरच्या अधिवेशांत पास झालेल्या "सहकारी कायद्यांत" सहकारी संस्थेमध्ये नॉमिनेशनची प्रथा त्यांनी बंद करविली. राज्य-सत्ता विकेंद्रीकरण योजनेला जेव्हा कायद्याचें स्वरुप येईल त्यावेळी सरकारतर्फे स्थापिलेंली जिल्हा विकास मंडळें वगैरेसारख्या संस्थांचे अस्तित्व यशवंतराव राहूं देणार नाहीत. असें झाल्यास जिल्ह्यांतील सा-या संस्था निवडणुकीने लोकशाही पद्धतीने निर्माण झालेल्या दिसतील. नॉमिनेशनची ही प्रथा बंद झाल्यावर कार्यकर्त्यांमधील असंतोषाचें एक प्रमुख कारण नाहीसें होईल.