अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 4

विदर्भवासीयांचे यशवंतरावांवर एवढें प्रेम कां ?

विदर्भवासीयांचे यशवंतरावांवर प्रेम असावयाला अनेक कारणें आहेत. एक तर वर्धा सेवाग्रामांत महात्मा गांधींचे अनेक वर्षे वास्तव्य होतें. सेवाग्राम ही त्या काळात भारताची राजकीय राजधानी बनलेली होती. विदर्भांतील, विशेषत: नागपूर विभागांतील चार जिल्ह्यांतील जनता गांधीजींच्या वास्तव्याने, त्यांच्या विचारप्रणालीनें, विशेष प्रभावित झाली होती. यशवंतराव हे आज मुख्य मंत्री आहेत म्हणून त्यांच्यावर विदर्भवासीयांचें प्रेम जडलें आहे असें नव्हे, तर ती गांधीयुगांतील असून, गांधीजींच्या हाकेला ओ देऊन स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडांत उडी घेणारे आपल्यामधीलच एक बहाद्दर सेनानी आहेत म्हणून ! राज्यपुनर्रचना झाली नसती तरी त्यांच्याविषयी अत्यादराचा, आपुलकीचा भाव, विदर्भांतील जनतेंत सदाच राहिला असता.

पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाचा भाग अलग अलग प्रांतांत कित्येक वर्षेपर्यंत राहत होता, तरी राष्ट्रीय चळवळीच्या दृष्टीने त्यांच्यांत नेहमीच एकात्मता होती. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रांतील टिळक अनुयायांमध्ये दोन तट पडले. एक गांधीचें नेतृत्व हृदयापासून मानणारा व दुसरा त्यांचे नेतृत्व मुळीच न मानणारा ! विदर्भ विभागांतहि गांधीजींचे नेतृत्व मानणारा गट मोठ्या प्रमाणांत निर्माण झाला. बहुसंख्य जनता गांधीजींच्या नेतृत्वाकडे वळली. महाराष्ट्रांतील राष्ट्रीय विचारकांमध्ये झालेली ही पहिली विचारक्रांति होय ! या क्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रांतील व विदर्भांतील गांधीप्रेमी जनता एका विचारसूत्रांत आली व एकमेकांची अभिमानी बनली. दुसरी विचारक्रांति राज्यपुनर्रचना काळांत झाली. या विचारक्रांतीचें निशाण यशवंतरावांच्या हातीं आलें. या क्रांतीची घोषणा ता. १ डिसेंबर १९५५ रोजीं  फलटण मुक्कामी झाली. राज्यपुनर्रचनेच्या चळवळीच्या काळांतील हा ऐतिहासिक महत्त्वाचा क्षण होय.  काँग्रेसची नाव तुफानांत सापडली होती. महाराष्ट्रांतील काँग्रेस नेस्तना बूद होण्याच्या मार्गाला लागली होती. व्यक्तिनिष्ठा श्रेष्ठ की संस्थानिष्ठा श्रेष्ठ हा प्रश्न सोडवावयाचा होता. यशवंतराव या वेळीं निधड्या छातीने समोर आले. ता. १ डिसेंबर १९५५ रोजी त्यांनी फलटणला घोषणा केली की, "मुंबई राज्य-रचनेबाबत काँग्रेस कार्यकारिणी जो अंतिम निर्णय घेईल तो मी शिरोधार्य मानीन. संयुक्त महाराष्ट्र व पंडित नेहरु असा पेंच माझ्यापुढें आला तर मी नेहरुंनाच कौल देईन." यांत काँग्रेस सुरक्षित राहावी हाच हेतु होता. यशवंतरावांनी मर्दपणे काँग्रेसजनांना प्रसंगोचित मार्गदर्शन केलें व महाराष्ट्राचें 'पानिपत' होऊं दिलें नाही.

या निर्णयामुळे त्यांचेवर जनतेचा भयंकर क्षोभ झाला. शिव्याशापांचा वर्षाव झाला. त्यांची जागोजागी हेटाळणी, मानखंडणा होऊं लागली. त्यांना राजकीय जीवनांतून हद्दपार करण्याचे प्रयत्न सर्व बाजूंनी सुरु झाले. 'बरें वाईंट सोसावें समुदायाचें' या समर्थवचनानुसार हें सारें त्यांनी शांतपणे व धीराने सहन केले. शेवटीं ते या अग्निदिव्यांतून पार पडले व महाराष्ट्रांत काँग्रेसला त्यांनी संजीवन दिलें. मी व माझे साथी जरी त्यावेळी स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होतो तरी यशवंतरावांच्या या पुरषार्थाने व बहादुरीनें आम्हीहि प्रभावित झालों व त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालों. कारण, आम्ही देखील स्वतंत्र विदर्भापेक्षा काँग्रेसनिष्ठा व भारतनिष्ठेला प्रथम स्थान देणारे होतों आणि आजहि आहोत. एकूण फलटणच्या या घटनेने यशवंतरावांच्या चाहात्यांची व काँग्रेस निष्ठावंतांची जणुं पलटणच इकडे पश्चिम महाराष्ट्रांत व तिकड विदर्भांत उभी झाली.

तुका म्हणे कळवळ्याची जाति । करी लाभावीण प्रीति ।।

यानंतर थोड्या दिवसांनी ता. १६ जानेवारी १९५६ रोजीं पंडित जवाहलाल नेहरु यांनी रेडिओवर भाषण करून मुंबई केंद्रशासित केल्याचें जाहीर केलें. हा निर्णय जाहीर होतांच लगेच दुसरे दिवशी ता. ७ जानेवारीला मी व माझे एक विदर्भवासी साथी अशा दोघांनी, स्वतंत्र विदर्भाची चळवळ मागे घेण्यांत आली आहे, असें जाहीर केलें.

जवाहरलालजींच्या वरील घोषणेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सर्वसाधारण सभा पुण्याला झाली. निमंत्रणावरून मी व माझे एक साथी तेथें हजर झालों. मुंबई वगळून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या कामाला सुरुवात झाली. मुंबई, मध्यप्रदेश, हैद्राबाद राज्यांतील महाराष्ट्रीय मंत्र्यांच्या मुंबई सचिवाल्यांत दोन बैठकीहि झाल्या. या संधीचा फायदा घेऊन मी सातारा, कोल्हापूर, सांगली वगैरे भागांत दौरा केला व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेंत भाषणेंहि केलीं. मला कित्येक जण त्यावेळी म्हणूं लागले की, "आपण नवखे करू शकणार नाही!" साता-याच्या मुक्कामीं राजेसाहेब निंबाळकर यांनी मला प्रश्न घातला की, माझें व माझ्या सहका-यांचें धोरण कसें राहील? मी लगेच त्यांना उत्तर दिलें की, "जिकडे यशवंराव तिकडे मी व माझे साथी राहतील. मग यशवंतराव अल्पमतांत राहतो की बहुमतांत ! कारण, आपली व आमची जात एक आहे. ती म्हणजे काँग्रेस व भारत निष्ठावंतांची. हें नातें आपण सर्वांना सदा जखडून ठेवणारें राहील."