अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 6

माझी पत्नी नागपूर विभाग काँग्रेस कमिटीची अध्यक्ष व तिच्याकडे विदर्भाच्या प्रश्नाचें नेतृत्व आणि मी मंत्रिमडळांत ! महाराष्ट्रांतील ब-याचशा मंडळींनी आमच्याबाबत साशंक होणें स्वाभाविक होतें. हा केवळ दुटप्पीपणा आहे, असेंहि कांही म्हणूं लागलें. मी माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने यशवंतरावांना एक सविस्तर पत्र लिहून कळविलें होतें की, 'माझ्या भूमिकेमुळे आपल्या अंगीकृत कार्यात अडथळा येत आहे असें आपणाला वाटताक्षणी मला मंत्रिपदाच्या कामांतून मुक्त करावें. मंत्रिपद सोडल्यावरहि मी विदर्भांच्या प्रश्नाबाबत अखेरपर्यंत प्रयत्न करीन व काँग्रेसश्रेष्ठी जो अखेरचा निर्णय देतील तो मी प्रामाणिकपणें पाळीन व त्याचा प्रचार करीन !' यशवंतरावांनी मला यानंतर घरीं बोलावून घेतलें आणि म्हटलें, "माझें मन आपल्याविषयी मुळीच साशंकित नाही. कोणी कांहिही म्हणतो, माझा आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे." चंदीगड येथील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनाच्या वेळी महाराष्ट्रांतील कांही मंडळीनी मजविषयी शंका प्रदर्शित करतांच यशवंतरावांनी, " कन्नमवारांविषयी असा गैरसमज करून घेऊ नका" असें स्पष्ट सांगितले. नऊ सदस्य कमिटीत मी एकटा आपला दृष्टिकोण स्पष्टपणे मांडीत होतों. तरी या बाबतींत यशवंतरावांनी मनाला कधी लावून घेतलें नाही. पंडित गोविंद वल्लम पंतांच्या निवासस्थानीं ही चर्चा परस्परांच्या भावनांचा आदर ठेवून उच्च पातळीवरून व्हावयाची. नऊ जणांत मी एकटाच काय तो अलग विचाराचा होतो. तरी आमच्या परस्परांच्या प्रेमांत मुळींच अंतर आलें नाही व कसल्याहि प्रकारची कटुता आली नाही. याला कारण यशवंतरावांचा दिलदर्याव स्वभाव व विशाल अन्त:करण !

केवढा मानसिक ताण यशवंतरावांना या वेळीं सहन करावा लागला. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या वेदना प्राणघेऊ होत्या. आपल्या मनासारखें होत नाही म्हणून दुस-याशीं भांडण करून चटदिशी "एक घाव दोन तुकडे" करणें फार सोपें असतें. पण धीमे धीमें, वाटाघाटीने, प्रेमाच्या संबंधांत बिघाड न येऊं देतां एखादा वादग्रस्त प्रश्न सोडविणें हें महाकठीण कार्य असतें. यशवंतरावांनी ही कामगिरी फार कुशलतेने आणि अपार मनोधैर्याने पार पाडली. इतक्या अलगत रीतीने त्यांनी हें ऑपरेशन केलें की, मूल आणि आई दोन्ही सुरक्षित राहिली.

एकीकडे विदर्भाचा प्रश्न तर दुसरीकडे दोन्ही राज्यांचा बटवारा करण्याच्या प्रसंगी गुजराती बांधवांची अनुमति प्राप्त करून घेण्याचा प्रश्न ! यासंबंधी विचारविनिमय चालू असतांना मधूनमधून मतभेदांच्या ठिणग्या उडत नव्हत्या असें नाही. पण यशवंतरावांनी संताप येऊं दिला नाही, तीव्रता वाढूं दिली नाही. 'मेरी मुर्गी की एक ही टांग' असा अव्यवहारी हटवादीपणा त्यांनी स्वीकारला नाही. आपसांत न सुटण्याजोगा एखादा मुद्दा उपस्थित झाला की, त्याचा निर्णय गोविंद वल्लम पंत व मोरारजीभाई यांच्या मध्यस्थीने घ्यावयाचा !या नीतीने यश हासिल केलें.

द्विभाषिक मुंबई राज्याच्या विसर्जनाच्या प्रश्नाला तोंड फुटल्याच्या वेळीपासून तर हा प्रश्न पूर्णपणे सुटण्याच्या अखेरपर्यंत यशवंतरावांनी मोरारजीभाईंचे संबंध नीट सांभाळून ठेवले.  मोरारजीभाईंच्याच निवासस्थानी उतरून त्यांनी त्यांना म्हणावें की, " आता आम्ही मराठी-गुजराथी भाऊ भाऊ वेगळे होत आहोंत, आम्हांला आशीर्वाद द्या ! वडील या नात्याने आमच्या मालमत्तेची उचित ती विभागणी करायला आपण साहाय्यभूत व्हा."

पोटांत शिरून, विश्वास संपादन करून, दुस-यांकडून काम करवून घेण्याची कला फार कठीण असते. हें यशवंतरावांनाच साधलें आहे. हें इतकें नाजुक काम होतें की, असल्या प्रसंगी There is many a slip betwen the cup and the lip या नुसार हातातोंडाशी आलेला घास निसटून जात असतो. बाहेरची कांही विघ्नसंतोषी मंडळीहि कोणत्या तरी प्रश्नाबाबत मतभेदाच्या खडकावर हें आपसांतील वाटाघाटीचें तारूं फुटावें आणि हा विभाजनाचा प्रश्न १९६२ च्या आम निवडणुकींनंतर विचारांत घेण्यांत यावा, असेंच इच्छिणारी होती. पण यशवंतरावजींनी असा मोका येऊं दिला नही. सा-या वाटाघाटी यशस्वी केल्याच.

महाराष्ट्र राज्य निर्मितीबाबत अनेक पक्षांचे प्रयत्न झाले आहेत हें जरूर ! यांत जनतेकडेच विशेष श्रेय असलें तरी यशवंतरावांसारखा कुशल, प्रसंगावधानी विचारवंत नेता नसता तर आजचें हें महाराष्ट्र राज्य एवढ्या लवकर पाहतां आलें असतें किंवा नाही याची मला शंका आहे.