अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 10

मार्गदर्शक घटना

अल्पावधींत काँग्रेस तिकिटावर लढविण्यांत येणा-या निवडणुकींचे प्रसंग येतील. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बाबतींत निश्चित असें धोरण व दिशा ठरविली पाहिजे. 'या संस्थेंत मी कां आहे ? कोणत्या कामाबद्दल मला आकर्षण आहे? जनसेवेचें कोणतें कार्य माझ्या आवडीचें आहे?" वगैरे बाबतींत त्यांनी आपला निर्णय घेतला पाहिजे. काँग्रेसचें तिकीट मागणारे अनेक राहतील. नव्या-जुन्यांचा, त्यांच्या कार्याचा सर्व दृष्टीने विचार करून प्रदेश काँग्रेसाध्यक्ष व मुख्यमंत्री या बाबतींत अखेरचा निर्णय घेतील. त्यानंतर ज्यांना तिकीट मिळालें नाही त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला खुल्या दिलाने मदत करुन काँग्रेसची प्रतिष्ठा वाढविली पाहिजे. नाहीतर, 'बरें झालियाचे अवघे सांगाती' असें त्यांचे रूप प्रकट होईल.

या बाबतीत यशवंतरावांच्या राजकीय जीवनांतील एक घटना सर्वांना मार्गदर्शक अशी आहे. ते वयाने २३-२४  वर्षांचे असतांनाच त्यांच्यांत काँग्रेसप्रेम आणि शिस्त यांचे बीज किती रुजलें होतें हें स्पष्ट होतें. त्या सुमारास क-हाड म्युनिसिपालिटीची निवडणूक झाली. यशवंतरावांचे प्रिय बंधु गणपतराव हे काँग्रेसच्या विरुद्ध उभे होते. पण भावाच्या प्रेमाचा मोह बाजूला सारून यशवंतरावांनी त्यांचे विरुद्ध प्रचार केला आणि त्यांचा पराभव करवला. ते स्वत: या निवडणुकींत उमेदवार नव्हतें. तो आमदार व मंत्रिपद मिळविण्याचा काळ नव्हता. यशवंतरावांनी मग हें धाडसाचें काम कशाकरिता केलें ? केवळ काँग्रेसच्या शुद्ध प्रेमाकरितां व काँग्रेसची निष्ठा व्यक्त करण्याकरिता ! यशवंतरावांचे हें उदाहरण काँग्रेसच्या क्षेत्रांत काम करणा-या सर्व जुन्या व नव्या कार्यकर्त्यांनी आपल्या हृदयांत कोरून ठेवावयाला पाहिजे. ही त्यांची सुरुवातीच्या राजकीय जीवनांतील काँग्रेसनिष्ठा राज्यपुनर्रचनेच्या चळवळींतील आणीबाणीच्या प्रसंगी कामीं आली. या दोन महत्त्वाच्या घटनांमुळे - "हीरा ठेवितां ऐरणी ।  वाचे मारितां जो घणी । मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।" या तुकोबांच्या वचनानुसार काँग्रेसच्या राजकारणांत ते तावून, सुलाखून निघाले व त्यांचे तेज फाकलें. आजचें हें मुख्य मंत्रिपद व काँग्रेसश्रेष्ठींतील स्थान त्यांच्या निष्कलंक काँग्रेसप्रेमामुळे त्यांच्याकडे चालत आलें आहे. शिस्तीचें जीवन कसें मौलिक असते आणि त्याला किती श्रेष्ठत्व प्राप्त होतें हे यावरून स्पष्ट होतें.

महाराष्ट्र राज्य स्थिर व सुद्दढ राहण्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष नेहमी मजबूत, संघटित असावयाला पाहिजे. पुढलें वर्ष आम निवडणुकीचें आहे. काँग्रेसमध्ये शिस्तबद्धता, एकसूत्रीपणा राहणें अत्यावश्यक आहे. ही परिस्थिती निर्माण करणें काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातांत आहे. एकटे यशवंतराव या बाबतींत कांही करूं शकणार नाहीत. जें अत्यंत अवघड होतें तें म्हणजे विभागीय काँग्रेस कमिट्यांचे विसर्जन करून एकमेव अशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची निर्मिती करणें व डॉ. खेडकरांसारख्या अनुभवी, कसलेल्या पुढा-याने पार्लमेंटच्या सदस्यत्वाचा त्याग करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचें अध्यक्षपद स्वीकारणें.ही एवढी मोठी कामगिरी यशवंतरावांशिवाय कोणाला करतां आली असती ? दुस-या कोणालाहि हें साधलें नसतें. यशवंतरावांना या कामगिरीबद्दल द्यावयाचे योग्य बक्षीस तेंच राहू शकले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस संस्थेमध्ये एकजूट-ठेवण्याची पराकाष्ठा करणें. असे घडल्यास यशवतरावांचा मानसिक ताण कमी होईल व त्यांच्या इतर महत्त्वाच्या अंतर्भूत कार्यांत फार मदत केल्यासारके होईल. श्री. एस.एम. जोशी मुंबईला एका भाषणांत म्हणाले होते की, " ज्या टोपीलींत खेकडे घालून ठेवलेले असतात त्या टोपलीवर झांकण ठेवण्याची आवश्यकता नसते. कारण खेकडा बाहेर जाऊं लागला की लगेच दुसरा खेकडा त्याचे पाय मागे ओढतो. अशी वृत्ति कांही महाराष्ट्रीयांची आजवर राहिली आहे. वृत्तीचा भावी महाराषअट्राच्या हिताच्या दृष्टीने त्याग करावयास पाहिजे." हे उद्गार आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितींत सर्वांनी ध्यानी घेतले पाहिजेत. कारण पुढील १० वर्षे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचीं आहेत. या अवधींत यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आपल्या समाजवादी समाजरचनेच्या ध्येयाची बरीच मोठी मजल गाठल्यावांचून राहणार नाही. त्यांचे हात मजबूत करणें सर्वांचें कर्तव्य आहे. त्यांच्यावर नितांत विश्वास टाकल्याने महाराष्ट्राचें भलेच भले होणार आहे, अशी माझी खात्री आहे.