अभिनंदन ग्रंथ - गेल्या शतकाचा वारसा 1



नवीं धार्मिक सामाजिक व राजकीय आन्दोलनें.

धर्म, समाज व राज्य या तिन्ही क्षेत्रांत व विषयांत नवा विचार व मूलगामी समीक्षण सुरु होऊन या संस्थांमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणणारी तीन महत्त्वाची आंदोलनें या देशांत गेल्या दीडशें वर्षांच्या कालावधींत निर्माण झाली. पहिला नवयुगधर्माचा स्थापक राजा राम मोहन रॉय होय. राज राममोहन रॉय यांना समाजसुधारणा आणि धर्म सुधारणा यांचा संबंध अविभाज्य होय, या सिद्धांताचे दर्शन झालें. धर्मदृष्टि बदलल्याशिवाय सामाजिक बंधनें नष्ट करण्याचें मानसिक सामर्थ्य लाभत नसतें. कारण, हीन प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धेनेच सामाजिक रुढि बळकट केलेली असते. धार्मिक अंधश्रद्धेचें पोषण धार्मिक पोथ्या करीत असतात. राजा राममोहन रॉय यांनी ग्रंथप्रामाण्यावर आघात केला. ग्रंथप्रामाण्यावर आधारलेल्या जुन्या सर्व धर्मसंस्था प्रत्येक समाजास दुस-या समाजापासून मानसिक दृष्ट्या अलग करतात. त्यामुळे मानवी सहकार्य व बंधुभाव यांची वाढ होत नाही. राजा राममोहन रॉय यांना भावी व्यापक जागतिक मानव संस्कृतीचें विशाल स्वप्न दिसलें. याकरिता त्यांनी सर्व मानवांच्या विवेकबुद्धीवर अधिष्ठित झालेला एक धर्म त्यापन व्हावयास पाहिजे असा विचार घोषित केला. भिन्न धर्मग्रंथांचें प्रामाण्य व विरुद्ध विरुद्ध रुढि यांच्यावर आधारलेले धर्म मागे पडलें पाहिजेत, असा व्यापक संदेश त्यांनी दिला. या व्यापक संदेशाचा प्रभाव महाराष्ट्राघरहि पडला. महाराष्ट्रांत या व्यापक संदेशांची प्रेरक शक्ति परावर्तित होऊन पोचली.

ब्राह्म-प्रार्थनासमजा, आर्यसमाज व सत्यशोधक समाज

मुंबई शहरांत इंग्रजी सुशिक्षितांची जी पहिली पिढी तयार झाली तिच्यावर राजा राममोहन यांच्या विचारांचे पडसाद उमटले. विष्णु शास्त्री पंडित, लोकहितवादी, नाना शंकरशेट, बेहरामजी मलबारी, धि. ना. मंडलिक, भाऊ दाजी लाड, भगवानदास पुरुषोत्तमदास, कावसजी जहांगिर, मंगळदास नथुभाई आदि महाराष्ट्र व गुजरात येथील सामाजिक सुधारणेचे प्रवर्तक झाले. त्यांच्यामधूनच अधिक प्रभावी अशा दोन व्यक्ति म्हणजे न्या . महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. मांडगावर आल्या . हिदू समाजांतील कुटुंबसंस्था बदलावी, स्त्री जातिभेद नष्ट व्हावा, मूर्तिपूजेच्या कर्मकांडाचे बंड मोडावे, लोकांत बंधुभाव यावा अशी आतुरता या धार्मिक व सामाजिक चळवळीच्या मुळाशीं होती. बंगालमध्ये ब्राह्मो समाज व मुंबईत प्रार्थनासमाज या रुपाने या धर्मसुधारकांच्या व समाजसुधारकांच्या संघटना अस्तित्वांत आल्या.

ब्राह्मसमाज व प्रार्थनासमाज यांच्यापेक्षा विचाराने संकुचित परंतु हिंदु समाजाच्या सुधारणेच्या दृष्टीने अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक चळवळ पंजाबमध्ये उत्पन्न झाली. ती म्हणजे आर्यसमाजाची. आर्यसमाजाचे प्रस्थापक स्वामी दयानद यांचा जन्म रौराष्ट्रांत झाला. गेल्या शतकांत गुजरातमधून भारताला अत्यंत थोर अशा दोन विभूतींची देणगी मिळाली. असें इतिहासात म्हणावें लागेल. त्या दोन विभूति म्हणजे स्वामी दयानंद व महात्मा गांधी होत. स्वामी दयानंदाचे कार्यक्षेत्र गुजरात न राहतां पंजाब बनलें. एकेश्वरवाद हें आर्यसमाज व ब्राह्मसमाज यांचे समान लक्षण होय. परंतु ब्राह्मणसमाज हृदयाचे म्हणजे विवेकबुद्धीचें प्रामाण्य मान्य करतो व धर्मग्रंथास दुय्यम स्थान देतो. आर्यसमाज आपला पवित्र धर्मग्रंथ वेद होय असें मानतो. बाकीच्या सामाजिक सुधारणा दोन्ही पंथांस सारख्याच मान्य आहेत. आर्यसमाजास जातिभेद अमान्य आहे. आर्थसमाज ही हजारों वर्षांतली पहिलीच जोरदार व आक्रमक अशी हिंदुधर्माची संस्था होय.

ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज आणि बुद्धिवादी समाजसुधारकांचा पंथ या सर्वांच्यापेक्षा भिन्न धार्मिक व सामाजिक क्रांतीची चळवळ महाराष्ट्रांतील मागासलेल्या जमातींत उत्पन्न झाली. या चळवळीचे मूळ प्रवर्तक ज्योतिबा फुले होते. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ सालीं पुणे शहरीं केली. हिदु धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारी ही चळवळ होती. सामाजिक विषमता व त्या विषमतेने निर्माण केलेलें बहुजनसमाजाचें पतन यांचे आविष्करण या चळवळीने केलें. सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध उठाव करणारी भारतांतील ही पहिली चळवळ होय. सामाजिक जन्मसिद्ध उच्च-नीचतेच्या रुढींवर लोकहितवादी, आगरकर यांच्यासारखे अनेक सुधारक टीका करीत होते. परंतु ज्यांच्यावर युगानुयगें अन्याय झाला त्यांचा उठाव त्या टीकेने केला नाही. असा उठाव ज्योतिबा फुले व त्यांच्या पाठीमागून निर्माण झालेली सत्यशोधक समाजाच्या नेत्यांची परंपरा यांनी निर्माण करून सतत कायम ठेवला. सत्यशोधक समाजामुळे हिंदी समाजांतील मागासलेल्या खालच्या थरांतील माणसांना आत्मज्ञान व आत्मविश्वास प्राप्त झाला. मागासलेल्या खालच्या थरांना आपल्या प्रगतीची आशा उत्पन्न झाली. या थरांमध्ये या चळवळीमुळे मानसिक अस्वस्थता आणि उत्थानाची तळमळ निर्माण झाली. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य व स्पृश्य यांना एकत्र शिकविण्याची पाठशाला स्थापून अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीचा प्रारंभ १८५२ सालीं केला हा भारतांतला पहिला अस्पृश्यता-निवारक सुधारक होय. सत्यशोधक चळवळीला ब्राह्मण-ब्राह्मणेतर असें जातीय झगड्याचें प्रतिगामी व अराष्ट्रीय रुप येऊन त्यांत संकुचित मनोवृत्तीचीं बीजें उत्पन्न झालीं, हें जरी खरें असलें तरी सामाजिक समतेच्या ध्येयवादाची पूर्वतयारी या नात्याने या चळवळीने मनोभूमिका तयार केली.