अभिनंदन ग्रंथ - श्री. यशवंतरावांच्या सहवासांत आल्यानंतर - 5

ते आले, त्यांनी पाहिलें व त्यांनी जिंकले.

कोणाच्या ध्यानींमनी नव्हतें. एकाएकी १० ऑगस्ट १९५६ रोजीं विशाल द्विभाषिक मुंबई राज्याचें बिल लोकसभेंत पास झालें. इच्छा असो वा नसो, लोकसभेचा निर्णय आम्हां सर्वांना मान्य करावा लागला. राज्यपुनर्रचनेच्या काळांत ज्या पुरुषसिंहाच्या पुरुषार्थाने नागपूर विभागांतील लोक आकर्षित, व प्रभावित झाले होते त्या यशवंतरावांना पाहण्याची त्यांना फार जिज्ञासा होती. हें जाणून मी त्यांना नागपूर येथील सरकारी आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीचा कोनशिला बसविण्याकरिता निमंत्रित केलें. ते आले. माझ्याकडेच त्यांचा मुक्काम होता. त्यांच्या भेटीकरिता कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. त्यांच्या सौजन्यपूर्ण, प्रेमळ वागणुकीने व रोखठोक भाषणाने सर्वांना आपलेसे करून घेतलें. सर्वांना आपल्या व्यक्तिमत्त्वाने त्यांनी आकर्षित केलें. थोडक्यांत, ते आले, त्यांनी पाहिलें व त्यांनी जिंकले.

पुढे ता. १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल मुंबई राज्य स्थापित झालें. यशवंतरावांकडे मुख्य मंत्रिपद आलें.

एकजिनसी, एकविचारी मंत्रिमंडळ

महाराष्ट्र राज्याचें मंत्रिमंडळ बनवितांना यशवंतरावांचा हाच दृष्टिकोण राहिला आहे की, मंत्रिमंडळांतील सर्व प्रमुख व्यक्ति, मंत्री व उपमंत्री खेळीमेळीने, एकजुटीने कारभार असावेत. तरच राज्य यशस्वी रीत्या चालूं शकतें व लोकांचे प्रश्न सुटूं शकतात. 'अपनी अपनी डफली, अपना अपना राग।' अशी 'मन:पूतं समाचरेत् ' परिस्थिती राहिल्यास मंत्रिमंडळाची प्रतिष्ठा खिळखिळी होऊन जाते. आज इतर कांही प्रांतांत एकभाषी राज्य असतांना देखील आपापसांतील खिंचाताणीमुळे व मतभिन्नतेच्या तीव्रतेमुळे मंत्रिमंडळाला चिरा गेल्या आहेत. कै. पंडित रविशंकर शुक्ल यांच्यासारख्या ८० वर्षांच्या वृद्ध मुख्य मंत्र्यांच्या हाताखाली, तसेंच माझ्यापेक्षा वयाने लहान अशा तरुण मुख्य मंत्र्यांच्या - यशवंतरावांच्या हाताखालीहि काम करण्याचा मला योग आला आहे. मला यशवंतरावांच्या आखीव व रेखीव धोरणाबद्दल फार समाधान वाटतें. ते सर्वांना सांभाळून घेणारे आहे. - निभावून नेणारे आहेत. ते सर्वांना आपापलें काम स्वतंत्रपणें, मोकळ्या मनाने करावयाला भरपूर वाव देतात. काम नीट चालतांना कधीहि कोणाच्या कामांत ते हस्तक्षेप करीत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकींत प्रत्येकाला आपापले विचार निर्भयपणे खुल्या दिलाने मांडण्याची मोकळीक असते. आपसांतील चर्चेंनंतर जो निर्णय लागतो तो सर्वांनी प्रामाणिकपणे अमलांत आणावा; मग मात्र 'पण' - 'परंतु' कोणी करावयाला नको, असा त्यांचा कटाक्ष असतो. कोणत्याहि प्रश्नाचे बाबतींत त्यांची एककल्ली वृत्ति नसते. तत्त्वाला व धोरणाला बाध येऊं न देतां सर्वांशी जुळवून मिळवून घेण्यांत ते सदा तत्पर असतात. प्रत्येकाच्या चांगल्या कामाला त्यांचे प्रोत्साहन असतें. त्यांच्या अशा स्थिर, गंभीर विचारप्रवण कार्यप्रणालीने सर्वांचे एक हृदय, एक चित्त झालें असून मंत्रिमंडळाचे रुपांतर जणुं मित्रमंडळांत झालें आहे !

द्विभाषिक राज्य हें भारतांतील पहिल्या प्रतीचे राज्य होय, अशी जी ख्याति झाली त्याला कारण यशवंतराव होत. हें राज्य चालविण्याचे कार्य अति कठीण व किचकट होतें. ही तारेवरची कसरत होती. या द्विभाषिकाच्या मंत्रिमंडळांत एकमेकांचे जमूं शकलें नाही, आपापसांतील भांडणामुळे हें राज्य अखेरीस मोडावें लागलें, असा कोणाचाहि उपका यशवंतरावांनी येऊं दिला नाही. पण स्वच्छ व स्थिर पाण्यांत नदीच्या तळाच्या भाग जसा स्पष्ट रीतीने दिसतो तद्वत् साडेतीन वर्षांच्या द्विभाषिकाच्या समाधानकारक राज्यकारभारामुळे महाराष्ट्रांतील जनतेच्या अंतरंगातील ख-या भावनेचा तळ काँग्रेसश्रेष्ठींना दिसला ! तो म्हणजे भावनात्मक ऐक्याचा अभाव !! द्विभाषिकाचा राज्यकारभार व्यवस्थिती चालू असला तरी लोकांचे भावनात्मक ऐक्य साधण्यांत यश मिळूं शकलें नाही, हें काँग्रेसश्रेष्ठींच्या कानावर यशवंतरावांनी उचित प्रसंगी घातलें. काँग्रेस श्रेष्ठींना तें पटलें आणि द्विभाषिकविसर्जनाच्या विचाराला चालना मिळाली.

विदर्भाबाबात भूमिका

नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनाच्या समयाला याची गुणगुण चालू होती. लोकनायक अणे यांना लोकसभेचें तिकीट देतांना यशवंतरावांनी सांगितले होतें की, द्विभाषिकाच्या प्रश्नाचा फेरविचार झाल्यास आपल्या मंडळींना स्वतंत्र विदर्भाकरिता प्रयत्न करण्याची मोकळीक राहील. द्विभाषिक-विसर्जन प्रश्नाच्या बरोबर स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न पुन: जोराने समोर आला. मला त्याला साथ देणें क्रमप्राप्त झालें. परंतु चळवळीच्या ऐवजी वाटाघाटीचा मार्ग मीं व माझ्या सहका-यांनी अवलंबिला.

द्विभाषिक राज्याचें विसर्जन होणार म्हणून गुजराथी मंडळी यशवंतरावांवर भयंकर रागावली, त्यांना अद्वातद्वाहि बोलूं लागली.