यशवंत चिंतनिका ७

सहकारातील सत्तेचे विकेंद्रीकरण

सहकारी साखरधंदा ही महाराष्ट्राची अभिमानास्पद कमाई, असे मी मानतो. त्याच्याकडे जिव्हाळ्याने पाहायला पाहिजे. त्यात काही दोष निर्माण झाले असतील, ते दूर करण्याकरिता सहानुभूती व विधायक दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. सहकारी साखरकारखानदारीतील सर्वच सभासद श्रीमंत शेतकरी आहेत, असा सोईस्कर गैरसमज काही लोकांच्या मनांत झालेला दिसून येतो. त्यांच्यापुढे वस्तुस्थिती ठेवून त्यांचा हा गैरसम दुर केला पाहिजे. परंतु त्याचबरोबरो सहकारी कारखानदारीच्या क्षेत्रात एकाधिकारशाहीची प्रवृत्ती आपले डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात नवीन नेतृत्व निर्माण झालेले आहे, त्याचा मला अभिमान आहे. पण पहिल्या पिढीतील या नेतृत्वाने आपल्या अनुभवाचे व सत्तेचे विकेंद्रीकरण करून या क्षेत्रात दुसरी-तिसरी पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे मला मुळीच दिसत नाही.