यशवंत चिंतनिका ३

कृष्णाकाठ

कृष्णाकाठावर उभे राहिल्यानंतर स्वच्छ जीवनाचा तो प्रशांत प्रवाह आणि तीरावरील हिरवागार सुंदर निसर्ग पाहत राहणे याचा आनंद काही वेगळाच. अंत:करणात तो बसून राहतो आणि स्मरणमात्रे अंतश्चक्षूंसमोर उभा राहतो.

सबंध कृष्णाकाठ हा एक माझ्या प्रेमाचा, आवडीचा विषय आहे. महाबळेश्वरातल्या, उगमापासून निघून कृष्णेच्या काठाकाठाने थेट राजमहेंद्रीपर्यंत, तिच्या मुखापर्यंत जावे, असे माझे फार दिवसांचे स्वप्न आहे. बदलत्या पात्राची भव्यता पाहावी, निसर्गशोभा मनात साठवावी, गावोगावच्या लोकानां भेटावे, त्यांच्या चालीरीती पाहाव्यात, पिके डवरलेली शेती पाहावी, असे सारखे मनात येत असे. अजूनही येत राहते. श्रावणसरी कोसळू लागल्या की, कृष्णामाईची याद मनात हटकून येते.