माझ्या राजकीय आठवणी ९

लोकमान्य सन १९०१ मध्यें कलकत्त्यास तपस्विनी माताजी महाराणी यांच्या भेटीस गेले होते. तपस्विनी माताजी या झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांची भाची होय. त्यांच्या नेपाळच्या राजघराण्याशी घनीष्ट संबंध होता. तेंव्हा त्यांच्या सहाय्याने लो. टिळकांनी नेपाळशी संबंध जोडले व कृष्णाजीपंत खाडीलकर आणि हणमंतराव कुलकर्णी या दोघांना नेपाळमध्ये बंदुकीचा कारखाना काढण्यासाठी गुप्तपणे पाठविले. पण सरकारला त्याचा सुगावा  लागून ही योजना प्रत्यक्षांत येऊ शकली नाही. बंगालचे क्रांतीकारक हेमचंद्रदास बाँब तयार करण्याची विद्या युरोपमधून शिकून आल्यावर त्याचे प्रात्याक्षिक पुण्याला चित्रशाळेच्या जागेत लो. टिळक व वासुकाका जोशी यांना करून दाखविले. चाफेकरांच्या होतात्म्यापासून प्रेरणा घेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीचे निशाण फडकाविले. त्यांनी सन १९०० मध्ये क्रांतीकारक संस्था स्थापन केली. सन १९०६ सालीं स्वातंत्र्यवीर सावरकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यापूर्वी त्यांना भारतात क्रांतीपक्ष संघटीत केला होता. त्यांनी कायद्याचा अभ्यास इंग्लंडमध्ये करीत असतानाच तेथे क्रांतीसंस्थेचे जाळे निर्माण करणेस प्रारंभ केला. त्यांत लालाहरदयाळ, भाई परमानंद, सेनापती बापट यांच्यासारखे ध्येयनिष्ठ पुरुष सावरकरांच्या सहमतानें कार्य करीत होते. त्यावेळीच रशियाचे निहिलीस्ट, चिनचे सन्यत्सेन व त्यांचे अनुयायी इत्यादि आंतरराष्ट्रीय क्रांतीकारकांचा स्वा. सावरकरांशी घनीष्ठ संबंध आला. सेनापती बापटांनी बाँब विद्या रशियन क्रांतीकारकाकडून हस्तगत केली. अशाप्रकारे बाँब तयार करण्याची विद्या सेनापती बापट व हेमचंद्र यांनी भारतांत आणली बाँबतंत्र हस्तगत होताच, क्रातीकारकांत त्याच्या प्रचारास व प्रयोगास सुरवात झाली. स्वा. सावरकरांनी रिव्हाल्व्हर्स वैगरे सामान विपूल प्रमाणांत भारतांत पाठविले. अशाप्रकारें कांतीकार्य व्यापक होत असतानांच स्वा. सावरकरांना लंडनमध्ये अटक करून भारतांत आणण्यात आले व १२ मार्च सन १९११ ला दोन जन्मठेपा व आणखीहि शिक्षा झाल्या. एकूण शिक्षा ५५ वर्षे मुदतीच्या होत्या व  त्या भोगण्यास त्यांना अंदमानास पाठविण्यांत आले. स्वा. सावरकरांनी जे अनेक क्रांतीकारक ग्रंथ लिहिले त्यांचे प्रकाशक हरदयाळ, भगतसिंग व सुभाषचंद्र बोस हे होते. स्वा. सावरकरांच्या अटकेनंतर त्यांचे शिष्य हरदयाळ, सहचारी रासबिहारी बसू यांनी तेच कार्य पुढे नेटाने चालू ठेवले. हरदयाळ जसे क्रांतीकारक होते, तसेंच विख्यात पंडितहि होते. स्वा. सावरकरांचे अनुयायी चिदंबर पिल्ले व जिवलग मित्र व्ही. व्ही एस्. अय्यर यांनी दक्षिण भारतात व रासबिहारी बसू यांनी पंजाब ते बंगाल, दिल्ली ते जबलपूर या भागांत क्रांती चळवळ अत्यंत नटाने चालू ठेविली. तसेंच हरदयाळ, खानखोजे, बरकतुल्ला, रामचंद्र प्रभृतींनी अमेरिकेत क्रांतीपक्ष जोरात संघटीत करणेस आरंभ केला. त्यांनी कॅनडा व अमेरीकेतील हजारो भारतीयांना संघटीत करून तिकडेहि क्रांतीकारक पक्ष स्थापन केला. त्या पक्षांमार्फत वर्तमानपत्राद्वारा भारतांतील चौदां भाषेंत प्रचार सुरु केला. त्या पत्रांच्या हजारो प्रती भारतांत पाठवून क्रांतीयुध्दाचा प्रचार जोरात सुरु केला. त्यामुळें त्यांना इंग्रजांविरुध्द जर्मन राष्ट्राचेहि सहाय्य मिळू लागले. अमेरिकेतील भारतीय धनीकांनी आर्थिक सहाय्य करून क्रांतीपक्षास संपन्न केले. अशावेळी सन १९१४ साली युरोपांत पहिल्या महायुध्दास प्रारंभ झाला.

१९१४ सालचे युध्द व त्याचा भारतीय राजकारणावरील परिणाम.

युरोपमध्यें सन १९१४ साली सुरू झालेल्या महायुध्दांत शस्त्रांचा खणखणाट चालू असता व इंग्लंड त्यामध्ये गुंतले असताना भारतमंत्री माँटे्ग्यूसाहेबांनी भारतासाठीं खालीलप्रमाणें जाहीरनामा काढला “ब्रिटिश सरकारचे असे धोरण आहे की, भारतांतील लोकांचे राज्यकारभाराशी अधिकाअधिक सहकार्य साधावे व या देशातील स्वयंशासित संस्थाची क्रमाक्रमाने वाढ होत जावी” हेतू हा की, त्यामुळें भारतांत जबाबदार राज्यपध्दतीचा उद्य होण्याची तयारी व्हावी व भारत हा ब्रिटिश राज्यांतील एकजीव घटक होऊन राहावा.”

इंग्लंड युध्दाच्या धुमश्चक्रीत होते. वसाहतींनी तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यावी. त्याप्रमाणें इंग्लंडला एकीकडे मदत करीत असताना साम्राज्यात आपले स्थान अधिकाधिक महत्त्वाचे करून घेण्याची निकड लागली होती. आयर्लंडमध्ये तर उघड उघड बंड झालेले ब्रिटिशांना मोडावे लागले होते. रशियांत रशियन राज्यक्रांती होऊन झारशाही उलथून पडली होती व तेथे काहीकाल झोटिंगशाही व नंतर लोकशाही सुरु झाली. अमेरिका युध्दात पडली. राष्ट्राराष्ट्राचे स्वातंत्र्य निर्वेध रहावे, म्हणून अमेरिकेने युध्दांत उडी घेतली होती. इंग्लंड तर लहान लहान राष्ट्रांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून युध्दांत पडले होते. ब्रिटनमध्ये राष्ट्रीय प्रधान – मंडळ आले होते. इकडे भारतात महायुध्दाच्या प्रारंभी राजनिष्टेची एकच लाट उसळली होती. भारताने आपले सैन्य व संपत्ती साम्राज्याच्या सेवेसाठी दिली, नव्हे तर ती इंग्रजांनी सत्तेच्या जोरावर नेली होती. पश्चिम रणक्षेत्रावर संयुक्तांच्या फौजाची होणारी पिछेहाट फ्रान्समध्यें मार्ने नदीवर ज्या वीरांनी थोपवून धरली व पराभवाच्या परंपरेस कलाटणी दिली. त्या वीरांत हिंदी जवान प्रमुख होते.