माझ्या राजकीय आठवणी ८

लोकमान्य टिळक व क्रांतीचा इतिहास

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बा. गं. टिळक यांच्या राजकीय जीवनावर क्रांतीसिंह वासुदेव बळवंत फडके, आण्णासाहेब पटवर्धन व विष्णुशास्त्री चिपळूणकर या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला आहे. वासुदेव बळवंतांच्या व्यायाम शाळेत विदयार्थी म्हणून लो. टिळक जात असत. त्यांच्यापासून स्वातंत्र्यवाद, आण्णासाहेब पटवर्धनांचेपासून भारतीय जीवनदृष्टी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्यापासून जनशक्ती आव्हानांचा मंत्र या तीन गोष्टी घेतल्या असे म्हणावयास हरकत नाहीं. लोकमान्यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्याद्वारे जनमत चेतविण्याचे कार्य चालू केले. तसेंच क्रांतीकारक मार्गाचाही पाठपुरवठा करून क्रांतीयुध्दाच्या निर्मितीचाही प्रयत्न केला. श्रीगणेशोत्सव, श्रीशिवजयंत्युत्सवासारख्या राष्ट्रीय उत्सवांचा प्रारंभ करून त्यांनी जनतेत असंतोषाच्या जागृतीचे कार्य सुरू केले. सन १८९६ मध्यें महाराष्ट्रांत दुष्काळ पडला व त्या मागोमाग आलेला प्लेग व त्याकामी रँडसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरावर झालेला अत्याचारी व अविचारी अम्मल याचा पुरेपुर फायदा घेवून लोकमान्य टिळकांनी जनतेत इंग्रजी राजवटीबद्दल असंतोष पसरविला. पण नुसता असंतोष चेतवीत राहण्याने राष्ट्रात कधीच जोम निर्माण होणार नाही. त्याच्या जोडीस परकीय सत्तेस दहशत वादही असणे जरूर असते. आणि त्यासाठी क्रांतीचे तत्वज्ञान राजकारणांत मान्य केले गेले आहे. राजकारणाच्या तत्वज्ञानांत त्यासाठी दोन मार्गाचा पुरस्कार केलेला आहे. एका प्रचाराने असंतोष फैलावणे व दुसरा म्हणजे अत्याचारी राजसत्तेच्या मनांत धाक उत्पन्न करणे हे होत. यासाठी अत्याचा-यांची हत्त्या घडवून आणणे आवश्यक असते. एखादया व्यक्तिच्या हत्तेने राज्ययंत्र उलथून न पडले तरी ते चालविणा-या अधिका-यांच्या मनांत मृत्यूची भिती निर्माण करून अत्याचारी मनोवृत्तीला पायबंद बसतो व त्यामुळे जनतेत प्रतिकाराचे धैर्य निर्माण होते हे ओळखून त्यातूनच लोकमान्यांचे क्रांतीकारक सहकारी व अनुयायी दे. भ. दामोदर चाफेकर यांनी २२ जून सन १८९० रोजीं आपले बंधु बाळकृष्ण चाफेकर यांच्या सहकार्यांने रँड व आयस्टे या अधिका-यांचा महाराणी व्हिक्ट्रोरियाचे ज्युबिली उत्सवाच्यावेळी खून केले गेले. या कटाची व कृत्याची बातमी सरकारला द्रवीड बंधूंनीं दिली. तेव्हां त्यांचा बंदोबस्त चाफेकरांचे तिसरे बंधू वासुदेव चाफेकर व त्यांचे सहकारी रानडे यांनी द्रवीड बंधूंचा खून करून केला व फितुरांना काय शिक्षा होते त्याचे प्रात्याक्षिक दाखविले. या प्रकरणी सर्व चाफेकर बंधू व त्यांचे सहकारी रानडे हे अलौकिक धैर्याने फाशी गेले. लोकमान्यांचे चाफेकर घराण्य़ाशी अत्यंत घनिष्ट संबंध होते.

उदयपूर संस्थानचे विख्यात दिवाण पंडीत शामजीकृष्ण वर्मा हे असतांना चाफेकर बंधूपैकीं दामोदर चाफेकरांची संस्थानी सैन्यांत भरती करण्याचे शिफारस-पत्र टिळकांनीच शामजीकृष्णाना पाठविले होते व या पुराव्याच्या अनुरोधाने त्यावेळचे पुण्याचे कलेक्टर लॅम्बसाहेब यांनी लोकमान्य टिळकांना अत्याचारी धमक्या देण्यास सुरवात केली. तेव्हा लो. टिऴकांनी आपल्या केसरीतून ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ ? असा परखड लेख लिहिला व कलेक्टरसाहेबांच्या कारवायावर सडेतोड उत्तर दिले. रँड व आयर्स्ट या खूनानंतर लोकमान्य टिळकांनीं बाळकृष्ण हरी चाफेकर यांना हैद्राबादचे तत्कालीन न्यायाधीश श्री. ना. श्री. कोल्हटकर यांच्याकडे आश्रय मिळवून दिला. तसेच दामोदर, चाफेकरांच्या फाशी जाण्याच्यावेळी लोकमान्यांच्या हस्ताक्षरांतील ‘गीता’ ग्रंथाची त्यांनी केलेली मागणी लो. टिळकांनी पुरी केली. चाफेकरांची उत्तरक्रियाकर्मे टिळकांचे भांचे धोंडोपंत विध्वंस यांनी लोकमान्यांच्य़ा आज्ञेनुसार केली त्यामुळे सदर रँड व आयर्स्ट यांच्या खुनासंबंधी सरकारला लोकमान्यांचा संशय आला. परंतु जरूर तो पुरावा पुढे करता न आल्यामुळे तो आरोप सिध्द होऊ शकला नाही.