माझ्या राजकीय आठवणी ७

क्रांतीसिंह वासुदेव बळवंत
          
दरम्यानच्या काळांत भारताला पारतंत्र्यातून स्वतंत्र करण्यासाठी भारतीय लोकांनी जी अनेक आंदोलने केली, त्यांत क्रांतीकारकाच्या आंदोलनाचे स्थान सर्वाधिक महत्वाचे आहे. भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याची पहिली घोषणा ह्याच क्रांतीकारकांनीच केली आहे. त्यांनी स्वतंत्र भारताच्या प्रतिष्ठापनेच्या ध्येयाला साकार करण्यासाठी क्रांतीच्या अग्निकुंडात आत्माहुती देऊन त्यागाची मोठीच परंपरा निर्माण केली आहे. भारतीय क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्य प्रयत्नांना प्रथम आरंभ महाराष्ट्रातूनच झाला. क्रांती आंन्दोलनाचे आद्यप्रवर्तक हुतात्मा वासुदेव बळवंत फडके हे होत. इंग्रजी  सत्तेविरुध्द सशस्त्र बंड घडवून आणण्याकरता त्यांनी प्रथम महाराष्ट्रीय सुशिक्षीतांना संघटीत करण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही.

तरीहि अशिक्षित रामोशांची संघटना करून सन १८७९ मध्ये त्यांनी ब्रिटिशशासनाविरुध्द बंड उभारले. सहा महिनेपर्यंत पुणे व पुण्याच्या आसपासचा परिसर हुतात्मा वासुदेव बळवंतांच्या नावाने दुमदुमून गेला. शेवटी त्यांना विश्वासघाताच्या कुटील नीतीने पकडून त्यांचेवर खटला भरण्यात आला त्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. एडनच्या तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यामुळे त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. त्यातच त्यांचा सन १८८३ च्या फेब्रुवारी महिन्यांत यातनांमय अंत झाला.

महर्षि आण्णासाहेब पटवर्धन
                                                                                                                                                                                   
हुतात्मा वासुदेव बळवंताच्या नंतर महाराष्ट्रांत महर्षि आण्णासाहेब पटवर्धनांनी क्रांतीयुध्द चेतविण्याचा प्रयत्न केला. ते कायद्याची व वैद्यकीची सर्वोच्च परिक्षा पास झाले होते. त्यांचा जन्म संपन्न घराण्यांत झाला होता. ते चारित्र्यसंपन्न, बुध्दिमान, लोकसंग्राहक होते. त्यांनी त्यावेळच्या इंदोर, बडोदा व लिमडी संस्थानाशी संबंध जमवून आपल्या प्रयत्नांना प्रारंभ केला. एकादा प्रांत संपूर्णपणे आपल्या अधीन असावा म्हणून त्यावेळीं निजामाच्या ताब्यांत असलेल्या विदर्भ प्रांतासाठी प्रयत्न चालविले, व-हाडावर निजामाची कागदी मालकी असली तरी इंग्रजांचे निजामावर कर्ज असल्याने तो प्रांत वहिवाटीसाठी इंग्रजाकडेच होता. तेंव्हां ते कर्ज देवून आपल्या आधीन करून घेण्यासाठी आण्णासाहेब पटवर्धनांनी निजामाचे विख्यात दिवाण सालारजंग यांच्याशी संधान बांधून योजना आखली. पण इंग्रज राज्यकर्त्यांना या योजनेचा व तिच्या मागील हेतूचा सुगावा लागून, त्यांनी सालारजगावर विषप्रयोग केला व या एका योजनेचा नाश केला. नंतर आण्णासाहेबांनी सांगलीचे राजे आप्पासाहेब पटवर्धन यांच्याशी संधान बांधून पुन्हां एकवेळ प्रयत्न केला. काही कारणास्तव त्यांचा हाही प्रयत्न विफल झाला. तरीहि त्यांनी पुनश्च मद्रास इलाख्यांतील व्यंकट परिमाल नांवाच्या एका संस्थानिकाशी मैत्री जोडून प्रयत्न केले. पण तोही संस्थानिक अकस्मित मरण पावला. या सर्व गोष्टींचा मनावर विलक्षण परिणाम होऊन आण्णासाहेबांनी राजकारण संन्यास घेतला. लोकमान्य टिळक आण्णासाहेबांना गुरुस्थानी कल्पून त्यांचे मार्गदर्शन घेत असत.