माझ्या राजकीय आठवणी ४

श्री. यशवंतराव हे माझ्याहून बरेच लहान असले तरी त्यांची कुशाग्रबुध्दी व कोणतेही काम अभ्यासून व तळमळीने करण्याचा गण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी कलेले कार्य व मिळविलेले यश हे जनतेपुढे प्रकट असेच झाले आहे. पण अत्यंत नम्र आणि गौरवाचा क्लेशही मनात न आणता श्री. यशवंतरावांच्या लौकिकाच्या पायाचा दगड म्हणवून घेण्यास मला मोठा अभिमान वाटण्यासारखी परिस्थिती खासच आहे. केवळ याच विचारातून प्रस्तुतच्या ‘माझ्या राजकीय आठवणीचे’ प्रकाशन करण्याचे धाडस मी करीत आहे.

राष्ट्रीय विचारांचे उगमस्थान जे पुणे शहर त्यांतून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर अखिल भारताला स्वातंत्र्यप्राप्ती विषयीची तळमळ प्राप्त होत असलेल्या काळात आमचे काराडगाव त्यापासून कसे दूर राहू शकणार ? आमच्या घराशेजारीच रहात असलेल्या दे. भ. आप्पासाहेब  अळतेकरांच्या घरी सदैव राजकारणाच्या गोष्टी चालत, आणि त्या ऐकून मन विचलित झाल्यावाचून रहात नसे.

दे. भ. सदाशिव खंडो उर्फ आप्पासाहेब अळतेकर

कोल्हापूर संस्थानाला वावड्या असलेल्या राष्ट्रीयवृत्तीमुळे त्या संस्थानातुन हद्दपार झालेल्या व कराडात वास्तव्य करणा-या दे. भ. आप्पासाहेबाच्या समर्थ देशभक्तीची शिकवण तशीच प्रभावी होती. श्रीगणेशोत्सव व श्रीशिवजयंत्योत्सव कराडात धुमधडाक्याने होत. त्यांस जोरात चालना मिळाली. त्यांत भाग घेण्याचे भाग्य साधून घेतल्याशिवाय मला राहवले नाही. हे दोन्ही उत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे करावयाचे तर त्यांत व्याख्याने, राष्ट्रीय कीर्तने, पोवाडे आदि राष्ट्रीय विचारप्रवर्तक कार्यक्रम अवश्यक होते. आणि त्यादृष्टीने आमच्या गावातील कार्यक्रमांत या गोष्टींचा आम्ही प्रामुख्याने समावेश करीत होतो. दे. भ. अच्युतराव कोल्हटकर, राष्ट्रीय कीर्तनकार वाईचे डॉ. पटवर्धन, पोवाडेकार गायक शाहीर पा. द. खाडीलकर, इत्यादि राष्ट्रीय प्रचारकांचे कार्यक्रम आम्ही धुमधडाक्याने घडवून आणीत असू. त्यामुळे समाज-मनात राष्ट्रीय विचाराचे वारे शिरू लागत. हा तर देशाचा मोठा फायदा होता. पण आम्ही अधिक विचारसंपन्न होत होतो. हा आमचा राजकीय स्वार्थ साधत होता. देशाचा प्राचीन इतिहास, परदेशात झालेल्या राजकीय क्रांत्या इत्यादी गोष्टी ऐकून एक प्रकारची उर्मी अंत:करणाच्या तळापासून उसळत असे. आणि आपणही आपल्या देशासाठी तनमन धनाने झटले पाहिजे, किंबहुना देशासाठी प्राणर्पणही केले पाहिजे असे वाटू लागे.

राजकारणांचा मूलभूत अभ्यास जरी मला करता आला नाही तरी व्याख्याने, प्रवचने, राष्ट्रीय कीर्तने, वृत्तपत्रांच्या नियमित वाचनाने तसेच श्री. यशवंतरावासारख्या कुशाग्र बुध्दीच्या नवविचाराच्या तरुणाशी केलेल्या विचारविनिमयाने व सहकाराने बहुश्रुत होवून राजकारणाचे धडे मला घेता आले.

अंत:करणातील देशप्रमाने उत्स्फूर्त होऊन माझ्या हातून दे थोडेबहुत कार्य झाले त्यातूनच उद्भवलेल्या किंवा अनुभवलेल्या या ‘माझ्या राजकीय आठवणी’ होत.