माझ्या राजकीय आठवणी ४३

-    देशभक्त हरिभाऊ –

मायभू विमोचनार्थ स्वार्थ होमुनी
धन्य तुम्ही मान्य तुम्ही जाहला जनी ।।धृ०।।

ज्ञानाचे बळ समृद्ध ते असो नसो
दुर्बल तनु होय परी ध्येय मनि वसो
निष्ठा ही वागविली नित्य जीवनी
धन्य तुम्ही मान्य तुम्ही जाहला जनी ।।१।।

शोभविते स्वाभिमान अंगी नम्रता
कार्योत्सुक वृत्ती खुलवी प्रबल अस्मिता
सत्कार्या सफल करी प्रेमपूजनी
धन्य तुम्ही मान्य तुम्ही जाहला जनी ।।२।।

कारगृह कष्ट हाल साहिले सुखे
शरणागति शब्द न ये ज्याचिया मुखें
तप कठोर आदर्शचि राहि होऊनि
धन्य तुम्ही मान्य तुम्ही जाहला जनी ।।३।।

एक ध्यास दास्यमुक्ति मातृभू पुजा
सेवाव्रत आचरिले शिकविले दुज्या
भाग्य थोर होउनि कृतकार्य जीवनी
धन्य तुम्ही मान्य तुम्ही जाहला जनी ।।४।।

बाळकृष्ण
कराड
१६-०८-१९७०