माझ्या राजकीय आठवणी ४२

आमच्या घरातल्या माणसाचा, घरातल्या माणसाकडून व घरातल्या माणसासमोर होत असलेला हा सत्कार आहे असे सांगून श्री. काशीनाथ देशमूख (तांबवेकर) म्हणाले, समाजातील अत्यंत दुबळा माणूस सत्त्याग्रह करू शकतो हे गांधीजीनी सिद्ध केले आहे. आपल्या स्वत:साठी काही करू न शकणारा व देशातील साम्राज्यशाही हादरून सोडणारा सर्वात मोठा पंगू सत्त्याग्रही म्हणून हरिभाऊंचा गौरव केला पाहिजे.

ना. यशवंतराव चव्हाणासारख्या लोकशाहीच्या मानक-याला सभेच्या सिंहासनावर नेऊन बसविणारा एक मायेचा वडीलधारी नेता या समर्पक व अचूक शब्दामध्यें श्री. संभाजीराव थोरात यांनी हरिभाऊंचा गौरव केला.

श्री. व्यंकटराव पवार व गौरीहर सिंहासने यांचीही भाषणे झाली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. यशवंतरावजी चव्हाण म्हणाले,  ‘चाळीस वर्षापूर्वीचा राजकीय इतिहास जनतेसमोर यावा म्हणून त्या पिढीतील सा-यांचा प्रातिनिधिक प्रतिकात्मक सत्कार असे या सोहळ्याचे स्वरुप आहे. मृत्यूचा क्षण जवळ आला तरीही न हालणारा तो धैर्यवान माणूस अशी व्याख्या करता येईल. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी हरिभाऊ सारख्या ध्येयवादी व धैर्यवान माणसाची गरज आहे. त्यांच्या कार्याची सतत आठवण राहिली पाहिजे.

१९२५ ते २८ च्या काळांत हरिभाऊसारखे कार्यकर्ते जर भेटले नसते तर आम्ही एवढे वाढलो नसतो. कारण मंडईच्या कोप-यावर राजकीय शिक्षणाची गोडी आम्ही हरिभाऊजवळ शिकलो. युवकांना विचार देवून वाढविणारा एक राजकीय व्यापारी म्हणून मी हरिभाऊकडे पहातो. कृष्णाकाठच्या या विद्यापिठामध्ये आम्ही राजकीय शिक्षणाचे पाठ गिरविले. हरिभाऊच्या तोंडामध्यें दात नाहीत, पण चावा घेण्याची शक्ति मात्र आहे. दहा वर्षे मी हरिभाऊजवळ राजकारणाचे धडे गिरवले. त्यांच्या समवेत घालवलेली दहा वर्षे हा माझ्या जीवनातील अमोल ठेवा आहे. हरिभाऊच्या राष्ट्रसेवेचा गौरव करण्यासाठीं व त्यामधून अंशत: उतराई होण्यासाठी त्यांना जो आम्ही प्रेमाने निधी देत आहोत, त्या निधीचा उपयोग हरिभाऊंनी स्वत:च्या कुटुंबियाकरता करावा. जनतेचे संसार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहोत.

सद्गदित अंत:करणाने सत्कारास उत्तर देतांना हरिभाऊ म्हणाले, मला स्वातंत्र्याचा मोह होता, ते मिळाले आहे. माझ्या राजकीय जीवनाला जे वळण लागले, माझ्यावर जे चांगले संस्कार झाले त्याचे श्रेय यशवंतरावजींना आहे.

यानंतर आभार प्रदर्शन होऊन हा कार्यक्रम संपला.