माझ्या राजकीय आठवणी ४०

आमच्या शाळेच्या आवारांत एक लिंबाचे झाड होते. त्यावर तिरंगी झेंडा लावून दररोज सकाळीं झेंडावंदनाचा कार्यक्रम करण्यास याचवेळीं आम्हीं सुरवात केली. या झेंडावंदनासाठीं शाळेंतील पन्नास पाऊणशे मुलें स्वयंस्फूर्तीने जमत. आमच्या शाळेचे हेडमास्तर या गोष्टीकडे कानाडोळा करून या कार्यास उघड स्फूर्ती जरी नाहीं, तरी मुकपणें सहाय्य करीत असत. ध्वजवंदन करणे, वंदेमातरम् म्हणणे, प्रभातफेरी काढणे या आज राजकीय जीवनांतील अतिशय मामुली गोष्टी होऊन बसल्या आहेत. परंतु त्याकाळीं असे कांहीं करणे म्हणजे कारावासाला निमंत्रण देणे असे.

अशात-हेनें विधायक आणि शांतपणे चाललेली माझी शालेय जीवनांतील देशसेवा एकदम प्रकाशांत येण्याजोगा एक प्रसंग पुढीलच वर्षी घडून आला. १९२९ सालच्या लाहोर काँग्रेसमध्यें २६ जानेवारीच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गांवोगांवी देशनिष्ठेची शपथ घेणारी हस्तपत्रकें लावावीत असा एक ठराव झाला. त्या ठरावानुसार क-हाड येथें पत्रके लावीत असतानाच पोलिसांनी मला पकडले आणि इंग्रजी पाचवीत असतांनाच मला दंड आणि कारावास. अशी दुहेरी शिक्षा झाली. यापैकीं कारावासाचे त्यावेळीं मला विशेष वाटले नाहीं. परंतु दंडाचे पैसे भरण्यासाठीं दिडशे रुपये पुणे येथील रानडे वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस म्हणून मिळालेले मला खर्च करावे लागले. याचे त्याकाळीं माझ्या मनास फार दु:ख झाले.

या कारावासांतून सुटून आल्यानंतर माझे शालेय जीवन व राजकीय जीवन पूर्ववत सुरूं झाले. आणि १९३२ साली मी मॅट्रीकच्या वर्गात गेलो. या साली झालेल्या कायदेभंगाच्या चळवळींत मला पुन्हां एकवार अठरा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगून परत आल्यानंतर १९३४ साली मी मॅट्रीक झालो. देशासाठी करावास भोगणारे देशभक्त आमच्या गांवी पुष्कळ होते. परंतु मॅट्रीक होण्याच्या आगोदरच दोनदा तुरुंगात जावून आलेला कुमार कार्यकर्ता आमच्या गांवांत मी एकटाच असेन.

देशभक्तीचे वळण माझ्या मनाला कसे लागले याची हकीकत थोडक्यांत ही अशी आहे. या हकिकतीमध्यें रोमांचकारी भाग थोडाबहुत निश्चितच आहे, परंतु त्यामध्यें अव्दितिय कांही आहे असे मला प्रामाणिकपणें वाटत नाहीं. देशप्रेमानें झपाटले जाण्याच्या भाग्यशाली कालखंडांत दैववशात् माझा जन्म झाला. देशप्रीतीच्या भावनेने झापाटलेले अनेक तरुण महाराष्ट्रात त्याकाळी होते. अशापैकींच मीहि एक होतो. त्यामुळे देशासाठीं आपण कांहीं केले, म्हणजे फार मोठा पराक्रम केला असे यावेळीं मला वाटले नाहीं, आजही तसे वाटत नाहीं.

(मासिक शब्दरंजन दिवाळी विशेषांक १९६२ वरून)