माझ्या राजकीय आठवणी ३५

अमेरिकेचे प्रेसिडेंट रुझवेल्ट यांची पूर्वीपासून भारतीय जनतेचे राजकीय समाधान करावे अशी इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना वारंवार टोचणी चालू होती. त्यांतच इंग्लंड युद्धाच्या घोर आपत्तींत सापडले असतांना भारतीय काँग्रेसच्या ‘चलेजाव’ च्य़ा आदेशानें भारतांत तीव्र असंतोष पसरला. असे पाहून ब्रिटनचे मुख्यप्रधान विस्टन् चर्चिल यांनीं एक कमिशन नेमावयाचे ठरविले. त्या कमिशननें पुन्हां एकदां साक्षीपुरावा गोळा करावयाचा आणि विद्वत्तापूर्ण पण कोणाचेहि समाधान ज्याने होणार नाही, असे निवेदन करावयाचे ही ब्रिटिश साम्राज्यशाहीची पूर्वापार पद्धत भारतीयांनी अनुभवली होतीच. वरीलप्रमाणें ब्रिटिश सरकारनें सर स्टॅफोर्ड स्क्रीप्स यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नेमले याचा कांहींहि परिणाम भारतावर व भारतातील असंतोषावर झाला नाही. त्यामुळें जनतेंत सरकारबद्दल अधिकच कटु भावना निर्माण झाली. काँग्रेसचा जबाबदार पुढारी बाहेर मार्गदर्शनासाठीं कोणीच नव्हते. तरुण कार्यकर्ते आपापल्या योजनेप्रमाणें चऴवऴ करू लागले. त्यांतूनच सातारा जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन करण्याचा प्रयत्न अत्यंत जोरांत झाला. याच प्रतिसरकाराची परिणती पत्रीसरकारांत झाली. खेडोपाडी ब्रिटिश सरकारी हस्तकांचा बंदोबस्त या पत्रीसरकारमार्फत त्यांचे समजुतीप्रमाणें होऊ लागला. ब्रिटिश सरकारी हस्तकांना चांगलाच वचक बसला. या सरकारने ब्रिटिश सरकारशी यंत्रणेत व्यत्यय आणणेंसाठीं टेलिफोनच्या तारा तोडणे, रल्वेस्टेशनांची जाळपोळ करणें, रहदारी बंगल्याचा नाश करणे, टपालांचा नाश व लुटालूट करणेच सुरू केले. सदर कार्यक्रमाची खर्चाची व्यवस्था व्हावी, या सबबीवर शेणोली जवळ पगास्ट्रेन आडवून लुटली गेली. अशासारखी विध्वंसक कार्ये महाराष्ट्रांत चालू होती. एकंदरींत या पत्रीसरकारनें हातांत कायदा घेतला होता. श्री. यशवंतराव यावेळी सातारा जिल्ह्याबाहेर होते. अशा परिस्थितीत श्री. यशवंतराव भूमिगत असतांना त्यांना फलटण येथे अटक झाली. त्यांना येरवडा जेलमध्यें स्थानबद्ध करण्यांत आले.

सरकारी दडपशाही व लोकांची चळवळ याची लढत जुंपली. दोन्ही पक्ष न्याय-निती व हिंसा-अहिंसा याचा विचार करीनासे झाले. त्यांत सरकारी सामर्थ्य विपुल यामुळें त्यांचे अत्याचार प्रखर व संख्येने जास्त होते. अशाच एका प्रकारांत काँग्रेस वर्किंग कमेटिच्या सभासद अरुणा असफअल्ली यांच्याशी झालेल्या पोलिसी झटापटीत एक बाँबस्फोट झाला. त्यामुळें त्यांवेळचे व्हॉईसरॉय लिनलिथगो यांनी महात्मा गांधींना पत्र पाठवून, वरील बाँबस्फोट अहिंसेचे प्रतीक कीं काय ? म्हणून विचारणा केली, तेव्हां त्याचे उत्तर महात्मा गांधींनी समर्पक असे दिले कीं, सरकारी अत्त्याचारापुढें जे असे कांही प्रकार घडतात, ते कांहींच नाहींत. सरकार तोफा, बंदुका, विमाने, बाँब अशा विध्वंसक शक्तिनें जनतेवर अत्त्याचार करीत असतांना जे कांही प्रकार घडतात, ती शूरांची अहिंसा आहे. मानव हा हिंस्त्र मनोवृत्तीचा आहे. त्यास संस्कारानेच संयमी व अहिंसक बनवावे लागते. आपण या गोष्टीचा निर्णय कोठल्याहि न्यायलवादापुढें मांडून घेऊ. या गोष्टीस व्हॉईसरॉयसाहेबांनी मान्यता दिली नाहीं. झाल्या प्रकाराबद्दल महात्मा गांधींनी आत्मशुद्धीसाठीं सन १९४६ च्या फेब्रुवारीत तुरुंगांत २१ दिवसाचा उपवास केला. तेव्हां सरकारने महात्मा गांधींना जेलमध्यें सवलती दिल्या. पण त्यांना बंधमुक्त करणेस मुळींच तयार नव्हते. मात्र यावेळीं सन १९४२ साली पकडलेल्या काँग्रेसजनांना गटागटानें व मुदती मुदतीनें सोडण्यास सुरवात झाली. त्याप्रमाणें सातारा जिल्ह्यांतील ४५० बंदी मुक्त झाले. राजकीय कैद्यांच्या बंदमुक्ततेचे हुकूम जिल्ह्या जिल्ह्यांतून येत असत. सातारा जिल्ह्यांतून ‘यशवंतराव चव्हाण’ या एकाच नांवाचे दोन डेटिन्यू पकडण्यांत येऊन त्यांची रवानगी हिंडलगा जेल व येरवडा जेल अशा दोन ठिकाणी झाली होती. कोल्हापूरचे यशवंतराव चव्हाण हिंडलगा जेलमध्यें, त्यांना सोडण्याचा हुकूम सातारा कलेक्टर ऑफिसमधून निघाला. पण कोणाच्या चुकीमुळें कोणास ठाऊक तो हुकूम येरवडा जेलमधील श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या मुक्ततेला कारण झाला व त्यामुळें श्री. यशवंतराव बंधमुक्त झाले.