माझ्या राजकीय आठवणी ३१

सर्व तयारी केली, पण मोटारीची व्यवस्था काय ? या कामासाठीं योग्य अशी मोटार पाहिजे होती. आम्ही स्वजनाकडे मागणी केली, पण कांहींना सबबी सांगून असहकार झाला. तेव्हां मी व यशवंतरावांनी विचाक करून कराडचे नगराध्यक्ष व त्यावेळचे मुस्लिम लीगचे अधिकृत उमेदवार खानसाहेब अहमदसाहेब कासमसाहेब कच्छी यांचेकडे मोटारीची मागणी केली. पंडीत नेहरूना लांबून आणण्याचे असल्याने ती मोटार चांगली व्यवस्थित असावी अशी विनंती केली. त्यावेळी खानसाहेब कच्छी यांनी उद्गार काढले कीं, जर तुम्ही आगोदर ही गोष्ट मला सांगितली असती तर नवी मोटार पंडीत नेहरूंच्या स्वागतासाठीं आणली असती. तरी पण त्यांनी गाडीची उत्तमप्रकारे तयारी करून मागितलेल्या मुदतीच्या आंत स्वखर्चानें आमचेकडे पाठविली. पंडीत जवाहरलाल नेहरू कराडास आले. त्यावेळीं आमाप जनसमुदाय खेडयापाडयांतून व इतर तालुक्यांतून आला होता. पंडीत नेहरूंचे स्वागतहि जनतेकडून प्रचंड प्रमाणांत झाले. त्यांचा सत्कार प्रथम हार घालून कोणी कारावयाचा याची चर्चा होऊ लागली. परंतु काँग्रेस कमिटीनें अगोदरच सर्व व्यवस्था ठरविली होती. नगराध्यक्ष खानसाहेब कच्छी यांनी प्रथम हार घालावा व नंतर काँग्रेस कमिटी व इतरांनी आपापले हार घालावे अशी ही योजना होती. मिरवणूकीच्या या मोटारीस फुलांची सजावट खानसाहेब कच्छी यांनी स्वेच्छेने केली होती. खावसाहेब कच्छी यांनी काँग्रेस कमिटीला दिलेल्या सहकाराची कल्पना आम्ही पंडीतजींना दिली तेव्हां त्यांनी त्यांची प्रशंसा केली. पण पंडीतजींनी आपल्या भाषणांत असे निक्षून सांगितले कीं, काँग्रेस उमेदवारांच्या विरुद्ध उभे असलेले उमेदवार व्यक्तिश: भले कीं बुरे हा प्रश्न नसून ते काँग्रेसचे उमेदवार नाहींत. ते जनतेचे प्रतिनिधीं नाहींत, म्हणून त्यांना मते देऊ नका व आपली मते काँग्रेस उमेदवारांनाच द्या. सभा संपली. पंडीत नेहरू साता-यास रवाना झाले. नंतर यशवंतरावांनी गौरीहर सिंहासने, उमेदवार आत्माराम पाटील व इतर मित्रमंडळीसह प्रचार दौ-यास आरंभ केला. आम्ही सर्वच पोरसवदा, प्रचाराच्या प्रथम फेरीत विशेष कांही घडल्याची कल्पना आली नाहीं. पण पुढें प्रचाराची दंगल सुरूं झाली. तेव्हां अनेक गोष्टी दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. प्रचाराचे साधन म्हणून छापखाना आमचे मालकीचा असल्यानें प्रचार – पत्रकाद्वारे आम्ही आमचे म्हणणे मांडीत होतो. दुस-या प्रचार फेरीस आरंभ झाला. सर्व तालुक्यांतील खेडोपाडी जनतेंतील आपुलकीच्या प्रेमानें श्री. आत्माराम पाटील यांचे उमेदवारीस चोहोकडून प्रचंड पाठींबा जाहिर झाला. मतदानाचा दिवस उजाडला. मतदाने झाले. त्याचा निकाल पुढीलप्रमाणें झाला. आमचे काँग्रेस उमेदवार श्री. आत्माराम पाटील हे  ४०००० च्या प्रचंड बहुमतानें निवडून आले. रावसाहेब कल्याणी काँग्रेसविरोधी १८००० मते मिळून निवडले गेले. शंकरराव मोहिते यांना १४००० मते मिळाली व काँग्रेसचे दुसरे उमेदवार दे. भ. पांडुआण्णा शिराळकर १०००० मते मिळून निवडून आले. येणेंप्रमाणें जनमताचा कौल मिळाला.  श्री. शंकरराव मोहिते यांनीं निवडणूकीपूर्वी सरकारी नोकरीसाठीं अर्ज केला होता. तेव्हां त्यांना नोकरीबद्दल सरकारकडून विचारणा झाली व ती त्यांना मान्य होऊन त्यांनी नोकरी पत्करली आणि आपल्या सभासदत्वाचा राजिनामा दिला. दक्षिण साता-यांतील या रिकाम्या झालेल्या जागेची निवडणूक सरकारनें जाहिर केली. तेव्हां श्री. यशवंतरावांना काँग्रेसतर्फे श्री. चंद्रोजी पाटील, कामेरी यांची उमेदवारी सुचविली. तेव्हां काँग्रेस कमिटीनें त्या उमेदवारीस मान्यता दिली. पूर्व निवडणुकीचा काँग्रेस कमिटीवर व विरोधी पक्षावर श्री. यशवंतराव व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नांचा व चिकाटीचा परिणाम म्हणून श्री. चंद्रोजीराव पाटील बिनविरोध निवडून आले व दक्षिण सातारा जिल्ह्यांत काँग्रेसचे तीन सभासद निवडून आले. निवडणुकीत अकरा प्रांतापैकी सहा प्रांतांत काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले तेव्हा काँग्रेस पक्षानें अधिकार ग्रहण करावेत किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनें व काँग्रेस कमिटीनें असा ठाराव केला कीं, गव्हर्नरांनी सन १९३५ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्टातील कलम ५२ प्रमाणें जे विषेश अधिकार आहेत, ते काँग्रेस प्रधान मंडळ जोपर्यंत सनदशीर मर्यादेत वागत आहेत तोपर्यंत अमलांत आणावयाचे नाहींत असे आश्वासन दिले तर अधिकार स्विकार करावा. यावर सरकारी उत्तर असे मिळाले कीं, गव्हर्नरांनी कायद्यांतील कलम ५२ व ५४ कडे बोट दाखवून सांगितले कीं, जोपर्यंत गव्हर्नरांना कायद्याने अधिकार दिले आहेत ते कसे उपयोगांत आणले जातात हे पाहण्यासाठी त्यावर गव्हर्नर जनरल व भारतमंत्री यांची देखरेख आहे तोपर्यंत गव्हर्नरांना वरीलप्रमाणें आश्वासन देतां येणें अशक्य आहे.