माझ्या राजकीय आठवणी ३३

महाराष्ट्रांत रॉयवादाचा प्रचार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या प्रभावी वाणीनें विद्वत्तापूर्ण शब्दांत केला. त्यांना महाराष्ट्रांत अनुकूल असाच कौल मिळाला. सातारा जिल्ह्यांत श्री. आत्माराम पाटील, ह. रा. महाजनी, वाटवेशास्त्री वगैरे पस्तीस तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॉयवादाचा स्वीकार केला. श्री. यशवंतराव व मी आणि कांही मित्रगण काँग्रेसच्या तत्वज्ञानापासून विचलित झालो नाहीं.

सातारा जिल्ह्यांत रावसाहेब, खानसाहेब, सरसाहेब अशा पदव्या धारण करणारी एक मोठी संघटना कपूर पार्टी या नांवाने जिल्हा बोर्डाच्या राजकारणांत ठाण मांडून बसली होती. त्याविरुद्ध काँग्रेसचे मान्यावर पुढारी दे. भ. भाऊसाहेब सोमणानीं अनेक सामने देऊन वरील संघटना कमकुवत करीत आणली होती. तेंव्हा तिला समाजातून संपूर्ण नष्ट करण्याचा आम्ही दे. भ. भाऊसाहेबांच्या आशिर्वादाने निश्चय केला व श्री. यशवंतराव सातारा जिल्हा लोकलबोर्डाच्या इलेक्शनच्या नियंत्रण आखाड्यांत उतरले. इलेक्शन बोर्ड स्थापन केले. तालुकावार उमेदवार उभे केले. काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार निवडून आले. अशा त-हेनें जिल्हाबोर्डांत काँग्रेसचे मताधिक्य झाले व ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सन १९५२ सालापर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यांत राहिले.

सन १९३७ पासून श्री. यशवंतरावांचा लोकसंग्रहाचा प्रयत्न पुन्हां अधिक जोमानें चालू होता. प्रथम तालुक्यांत प्रत्येक गांवी कर्तृत्ववान तरुणाची निवड, ओळख व नंतर देशप्रेमाची आवड निर्माण करणे व वाढविणें हा कार्यक्रम चालू असे. यावेळी अनेक तरुणांना त्यांनी आपल्या निकट आणले. कोल्हापूर, सांगली, संस्थानांतून मोठा प्रचार करून खूपच जागृती करून अनेक कार्यकर्ते मित्र मिळविले. तसेंच कराड तालुक्यांत संभाजीराव थोरात, पाटण तालुक्यांत श्री. व्यंकटराव पवार, बाळासाहेब देसाई वगैरे लोकांना जवळ आणून काँग्रेस कार्यास जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सन १९४० मध्यें भाई मसानी यांच्या अध्यक्षतेखाली श्री. व्यंकटराव पवार यांनी प्रवेश  केला. याचवेळी श्री. बाळासाहेब देसाई हे जिल्हा लोकलबोर्डांत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडून आले होते. कराडांत वकिली करीत असतानां हरीभाऊ लाड यांच्या जवळकीनें श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या अधिक सान्निध्यांत आल्यानें बाळासाहेब देसाई काँग्रेसच्या कार्यात समरस होऊ लागले. जिल्हा बोर्डाचे काँग्रेसचें पहिले प्रेसिडेंट श्री. बाबासाहेब शिंदे आखाडकर हे मुंबई असेंब्लीत निवडून गेल्यानें नंतरच्या रिकाम्या झालेल्या जागेवर श्री. बाळासाहेब देसाई यांची निवड झाली. ते सन १९५२ पर्यंत प्रसिडेंट पदावर होते. जिल्हा बोर्डाचा कारभार उत्तमप्रकारें केल्यामुळें त्यावेळच्या शासनांने त्यांना रावसाहेब हा किताब देऊन त्यांचा बहुमान करण्याचे ठरविले, पण त्यांनी हा किताब न स्विकारता परत केला. त्यामुळें त्यांची काँग्रेसनिष्ठा लोकमतावर चांगली बिंबली. त्यानंतर सन १९५२ मध्यें पाटण तालुक्यातर्फे मुबई असेंब्लीत उमेदवार म्हणून श्री. बाळासाहेबांना निवडण्यांत आले. नंतर त्यांची काँग्रेस कार्यासाठीं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. सन १९५७ सालीं दे. भ. मुरारजीभाई देसाई मध्यवर्ती मंत्रीमंडळात गेल्यानें ‘मुंबई व्दिभाषिक’ राज्याचे मुखमंत्री म्हणून श्री. यशवंतराव चव्हाणांची निवड झाली त्यावेळीं श्री. यशवंतरावांनी बाळासाहेबांना आपले मंत्रीमंडळांत घेतले.

सन १९३७ चे निवडणूकीनें स्थापन झालेली प्रधानमंडळे सन १९३९ पर्यंत अस्तित्वात होती. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यांत युरोपांत दुसरे महायुद्ध सुरू झाले. जर्मनराष्ट्रानें हेर हिटलरच्या नेतृत्वाखालीं ता. १ सप्टेंबर सन १९३९ रोजीं पोलंडवर स्वारी करून दुस-या महायुद्धास युरोपखंडांत आरंभ केला. जर्मन राष्ट्रानें पुकारलेल्या युद्धाविरुद्ध ता. ४ सप्टेंबर १९३९ रोजीं इंग्लंड आणि फ्रान्स यांनीहि जर्मन राष्ट्राविरुद्ध युद्ध जाहिर केले. ही वेळ भारतांतील क्रांतीकारकांनाहि सोयीची वाटली. त्याप्रमाणें रासबिहारी बसूंनी भारतांत भारतीय क्रांतीकारकांची संघटना उभारून तयारी चालविली. भारतसरकारने सदर युद्धांत कोणाचाहि सल्ला न घेता युद्धांत सामील झाल्याचे जाहिर केले. या संबंधांत काँग्रेसचे काय धोरण असावे या प्रश्नावरून प्रांतिक मंत्रीमंडळांनी राजिनामे द्यावेत असे काँग्रेसने ठरविले. त्याप्रमाणें काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजिनामे दिले.