माझ्या राजकीय आठवणी ११

रौलट कायद्याविरुध्द विशेषकरून उत्तर भारतात तीव्र असंतोष पसरला होता. या कायदयाविरुध्द १३ एप्रिल १९१८ रोजीं अमृतसरच्या नागरिकांनी एक निषेधपर सभा जालीयनवाला बागेत भरविली होती. या सभेस स्त्री पुरुष मिळून सुमारे वीस हजार नागरीक उपस्थित होते. सभेस सुरवात होते न होते, तोच जनरल डायरने आपल्या लष्करी तुकडीसह एकदम गोळीबारास सुरवात केली. या अमानुष गोळीबारात चारशे निरपराध लोक मारले गेले व दोनशे जखमी झाले.

श्री. यशवंतराव व मी

अशा रितींने भारतीय जनतेंत अन्याय वागणूकीमुळें असंतोष फैलावत होता. त्याला आम्हीहि अपवाद नव्हतो. पुण्यास ब्राम्हणेतर पक्षाचें ‘मजूर’ नांवाचे मुखपत्र निघत असे. हे पत्र कराडमध्यें बहुधा आम्हीच प्रथम मागविले. ते साल १९२४ असावे. त्यावेळी माझ्या सारखेच वाचनाचे अत्यंत नादी श्री. यशवंतराव चव्हाण यांची व माझी मजूर पत्राच्या वाचनाच्या निमित्ताने ओळख झाली. हळुहळू जिव्हाळा उत्पन्न झाला. राजकारणांतील सर्व विषयावर चर्चा होऊ लागली. श्री. यशवंतराव माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी सर्व विषयावर सुक्ष्मतेनें बोलत. त्यामुळें आम्हा दोघांचे संघटन दृढ होत गेले. अशा वेळचे बोलण्याचे विषय असे असत की जालीयनवाला बाग, पहिले महायुध्द, त्या निमित्ताने महात्मा गांधीनी इंग्रजांना लष्कर भारतीस केलेली मदत, लोकमान्य टिळकांची होमरुल चळवळ, प्रतियोगी सहकार, इंग्रजी सत्तेचे फोडाझोडा धोरण, ब्राम्हणेतर चळवळीपासून शिकावयाचे तत्वज्ञान, साधनशुचिता व पावित्र्य यांचा सार्वजनिक जीवनावर होणारा परिणाम वगैरे कितीतरी गोष्टी आमच्या चर्चेचे विषय असत.

जागतीक महायुध्द १९१९ मध्ये संपून तहाच्या वाटाघाटीत तुर्कींची खिलापत नामषेश होण्याच्या संभवाने भारतातल्या मुसलमानांना भेडसावले तेव्हां भारतातील मुसलमानांनी खिलापत जगविण्याची चळवळ सुरू केली. हिंदुमुसलमानांच्या एकीचे साधन या नात्याने महात्मा गांधीनी ती चळवळ आपल्या पोटाशी धरली व प्रथम असहकारतेचा महामंत्र मुसलमानांना पटविला. या मंत्राने सारा भारतदेश व्यापला. खिलाफत चळवळीचे प्रचारार्थ कराडास अनेक मौलवी व इतर वक्ते येत असत. यांची उत्तेजक व्याख्याने आम्हीही ऐकत असू.

महात्मा गांधीचे नेतृत्व

महायुध्दानंतर इंग्रज सरकारने भारतास दिलेली वचने मोडली. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर राजकीय धुरा महात्मा गांधीनीं स्विकारली. सन १९२० सालीं कलकत्त्यास भरलेल्या काँग्रेसच्या जादा अधिवेशनांत व नंतर त्याचवर्षी डिसेंबरांत झालेल्या नेहमीच्या वार्षिक अधिवेशनांत याप्रमाणें दोन वेळा महात्मा गांधींची राजकीय असहकारीता मान्यता पावताच भारताच्या राजकारणाला नवीन वळण लागले. असहकाराच्या आरंभाच्या काळांत सन १९२० च्या नोव्हेंबरांत महात्मा गांधीनीं अखिल भारतीय दौरा मौलाना अहमदअल्ली व मौलाना शोकतअल्ली व त्यांच्या मासाहेब यांना बरोबर घेऊन काढला होता त्यावेळीं ते कराडासहि आले होते. सभा कराड गोरक्षण संस्थेच्या जागेंत होती. त्यावेळी म. गांधी वगैरेंचे जवळून दर्शन घेण्यासाठी सभेच्या अगोदर दोन तीन तास स्टेजजवळ बसून राहिलो होतो. व्याख्याने हिंदी भाषेंत झाली. नीटशी कांही समजली नाहीत पण होमरुल व खिलाफत चळवळ नेटानें चालविण्याचा उपदेश व देशभक्तीचा कानमंत्र कानाशी गुणगुणू लागला. असहकार म्हणजे इंग्रजी राजसत्तेविरुध्द संप व तो सातारा जिल्ह्यांत प्रथम सुरू झाला. त्याचा आरंभ ज्यांचे कुलकर्णी वतन खालसा होत होते, अशा लोकांचे हातून व वाई तालुक्यातील शाळा मास्तरांच्या पासूनच कुलकर्णी संपाचेवेळी व शाळा मास्तरांच्या संपाचे वेळी म्हणजे सन १९२१ साली मराठी सातवी पास झाल्यावर सरकारशी सहकार करणा-या लोकांच्या फसवणुकीनें तलाठी नेमण्याच्या योजनेप्रमाणें तलाठ्याच्या जागेसाठीं माझा अर्ज लिहून घेतला. त्यावेळचे कराडचे कुलकर्णी श्री. बापुराव कुलकर्णी यांनीहि कुलकर्णी वतनी कामाचा राजीनामा दिला होता.