माझ्या राजकीय आठवणी १६

मुसलमान आम्हास राष्ट्रीय कार्यात राजसत्तेच्या बाजूनें सतावीत होते. त्यास योग्य जाणीव देणेचे श्री शिवछत्रपती मंडळामार्फत ठरविले. मोहरमचा मुसलमानांचा सण जवळ आला होता. त्याबाबत ‘हिंदूनो विधर्मी देव देवता भजून धर्मभ्रष्ट होवू नका’ अशा मथळ्याचे पत्रक आम्ही तयार केले, नंतर ते पत्रक खेडोपाडी व शहरातहि वाटले. प्रचार सभा खेडोपाडी होणं जरूरीचे वाटल्यावरून त्याप्रमाणें प्रचारसभा घेण्याच्या ठरविल्या. श्री. ल. म. उर्फ नानासाहेब देशपांडे, आबासाहेब धोपाटे व धर्मवीर बटाणे यांनी आम्हास सहाय्य दिले. आम्ही उभयता वरील मंडळींचे नेतृत्वाखाली खेडोपाडी जावून प्रचारसभा घेतल्या, शहरांतहि सभा झाल्या. या कामी हिंदुमहासभेचीहि साथ भरपूर मिळाली. यामुळें ताबूताच्या मिरवणुकीत मुसलमानाशिवाय खेड्यापाड्य़ांतील व शहरांतील हिंदूंनी फारच अल्प भाग घेतला. श्री गणपतीचे व ताबूताचे मिरवणुकीचे वेळीं कांहीही गैरप्रकार किंवा दंगाधोपा झाला नाही.

भारतांत राजसत्तेने मुसलमानांना हातीशी धरून त्यांना जादासवलती देऊन सरकारनें पक्षपाती राजकारण सुरू केले होतेच. दिल्ली येथील एका मुसलमानी वृत्तपत्रांत हसन इझामी नांवाच्या मौलवीने ‘छत्रपती’ शिवाजीमहाराज हे मुसलमानांचेच चिरंजीव आहेत असा लेख लिहून थोडाच असंतोष निर्माण केला. त्यामुळे हिंदू अस्वस्थ झाले. देशभर हिंदुमुसलमानांचे दंगे होऊ लागले. त्यातच अबदूल रशीद नांवाच्या माथेफिरूनें स्वामी श्रद्धानंदांचा खून केला. स्वामी श्रद्धानंदाच्या या अमानुष खुनामुळें हिंदूंच्या भावना अधिकच दुखावल्या गेल्या.

स्वामी श्रद्धानंद व श्रद्धानंद साप्ताहिक

स्वामीजींचे स्मरणार्थच जणू श्री. ना. दा. सावरकरांनी ‘श्रद्धानंद’ नांवाचे साप्ताहिक पत्र सुरू केले. ‘पातकी सूर्यावर थुंकला’ वगैरे हिंदुच्या भावना जागृत करणारे अनेक तेजस्वी लेख सावरकरांचे लेखणीतून येऊ लागले. अशा त-हेचे लेख वाचून मने अस्वस्थ होऊ लागली. आरंभापासूनच आम्ही ‘श्रद्धानंदांचे’ वाचक होतो. मागे म्हटल्याप्रमाणें श्री. यशवंतरावांना लहानपणापासून वाचनाचे, लेखनाचे मनस्वी वेड होते. क्रांतीकारकांच्या मनोधैर्याच्या अनेक रोमहर्षक कथा व अनेकांचे रक्तपात, कत्तली आणि अनेकांचे त्याग अशा बंदी असलेल्या व नसलेल्या ग्रंथाचे वाचन चालू होते. बंदी असलेल्या पुस्तकानाच वाचक जास्त भेटतात. अनेक तरुण गुप्तपणे अशा पुस्तकांची पारायणे करून आपल्या मनांतील स्वातंत्र्यज्योत तेवत ठेवत असतात.

स्वा. सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाचे वाचन श्री. यशवंतरावांच्या दृष्टीपथांतून सुटले नाहीं. दे. भ. पांडुआण्णा शिराळकर, क्रांतीकारक विचाराचे भाऊसाहेब कळंबे आदि राष्ट्रीय वृत्तीच्या व्यक्तिकडून अशा प्रकारची पुस्तकें मिळवित असू. ती वाचून तत्कालीन राजकारणावर नेहमीचे वादविवाद, चर्चा व निर्धार आमच्या मंडळांत होत असत. श्री. यशवंतराव चव्हाण रत्नागिरीस स्वा. सावरकरांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून आले होते. त्याच कालांत कारडांत डॉ. मुंजे, श्री. पांचलेगांवकर महाराज, श्री. विनायकमहारज मसूरकर, पंडीत मदनमोहन मालवीय, साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचेहि दौरे झाले.

रिफार्म्स इक्वायरी कमिटी म्हणजेच मुडिमन कमिटीच्या रिपोर्टानंतर भारताच्या सनदशीर झगडयांतील दुस-या टप्प्यास सुरवात नोव्हेंबर १९२७ रोजी पार्लमेंटने केलेल्या सायमन कमिशनची नेमणूक ही होय. सन १९१९ च्या सुधारणा कायद्यांत असे एक स्पष्ट कलम ४१ आहे कीं, दर दहा वर्षांनी भारताच्या राज्यकारभाराची चौकशी व्हावी व त्या चौकशीच्या अनुरोधाने राज्यकारभारात योग्य सुधारणा काराव्यात. या कलमान्वये सन १९२७ साली ब्रिटिश सरकारनें सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली पार्लमेंटच्या सभासदांचे एक कमिशन नेमले. त्यात मजूरपक्षीय दोन, लिबरल पक्षाचे सर जॉन सायमन व इतर काँझर्व्हेटिव्ह पाक्षाचे चार असे सात सभासद होते. परंतु या कमिशनमध्यें एकहि भारतीय सभासद नव्हता. यामुळें सदर कमिशनशी सहकार्य करणे भारताचा अपमान आहे, असे वाटून भारतांतील राष्ट्रीय सभेनें नव्हे तर नेमस्त पुढा-यांनीदेखील या कमिशनवर बहिष्कार टाकला.