माझ्या राजकीय आठवणी १८

सन १९२० ते १९२९ या कालांत परिस्थिती आजच्या सारखीच गोंधळाची होती. सकृतदर्शनी सरकारपक्ष व लोकपक्ष असे दोनच पक्ष होते. सरकार पक्षांत राजेरजवाडे, जहागिरदार, सरकारी नोकर, रावसाहेब, सरसाहेब, रावबहादूर व त्यांचे आश्रीत असे राजनीष्ठ लोक होते. लोकपक्षांत स्वातंत्र्याचे हक्क कसे कसे मागावे याविषयी मतभेद होऊन त्या त्या अनुषंधानें पक्षभेद होते. प्रथमचे सामाजिक प्रश्नावरून झालेले सनातनी व सुधारक हे तंटे मागे पडून, नंतर मवाळ व जहाल असे पक्ष निर्माण झाले. परंतु तेहि लखनौचे काँग्रेसचे अधिवेशनांत काँग्रेसमध्यें एकत्र आले. पण त्याचवेळीं भारताचे दुर्दैवानें लोकमान्य दिवंगत झाले. पुन्हां काँग्रेसमध्यें फेरनाफेरवाले असे पक्ष पडले. त्यांत कौन्सिल प्रवेश व बहिष्कार तसेंच वसाहतीचे राज्यकीय स्वातंत्र्य इत्यादी विचारसरणीमुळें परस्पर विरोधी तट पडले. काँग्रेसचे बाहेर गुप्त क्रांतीकारक संस्था होत्याच, शिवाय एकीकडे हिंदुमहासभा व दुसरीकडे मुस्लिम लीग अशा संस्था तयार झाल्या होत्याच कम्युनिष्ठ निराळे होते. काँग्रेसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक रेडिकल, सोशालिस्ट उद्भवले होते, पण सर्व पक्ष देशहितावर स्थिर नजर ठेवून समीकरणाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत. मतभेद नाहीसे करण्यापेक्षा राष्ट्राच्या अभ्युद्याकरितां एकोप्यानें प्रयत्न करण्याचे तत्त्व प्रथमत: अमलांत आणण्याचाही प्रयत्न होई. जो तो पक्ष आपआपली मते अधिकाधिक लोकप्रिय व्हावीत यासाठी व देशकार्यासाठी दोघांनी एकत्र काम करण्यास कांहीही अडचण निर्माण होऊ देत नसत. त्यावेळीं प्रत्येक पक्षाचे विचार भिन्न असले तरी अंतीम हेतू विविक्षित कार्य करण्याच्या कामी जे ऐक्य अपेक्षित असते त्यामध्ये एकमेकांच्या आड आलेच पाहिजे ही क्षुद्र मनोवृत्ती कोणीही दाखविली नाही. मतभेद विरहित कार्यक्रमांत अनेक प्रकारच्या विचाराचे लोक कार्यान्वित होत असत. देशकाल परिस्थितीप्रमाणें अभ्युद्याचा पल्ला अंतीमातल्या अंतीम मर्यादेपर्यंत जाणार नसल्यानें याबद्दल आपापसांत भांडण करून दूर होण्याचा प्रसंग कोणीहि निर्माण केला नाहीं. एका पक्षानें दुस-या पक्षास आपल्या विशिष्ट मताचा आग्रह करणें अत्यंत चुकीचे होय असे मानून प्रत्येकानें आपापली मते लोकापुढें मांडून जनतेस आज नाहीं, तर उद्या आपल्या बाजूचे करून घेण्याची निरनिराळ्या पक्षांची जी झटापट चालू होती, तीच राष्ट्राच्या प्रगतीचे खरे साधन होय. काही विशिष्ट मते लोकांपुढे मांडण्याचे प्रत्येक पक्षास स्वातंत्र्य असणे यांतच राष्ट्राचे हीत असते, अशी त्यावेळच्या पक्ष प्रमुखांची धारणा होती. या विचारसरणीमुळें आम्हा मित्रसमुहाला सर्व पक्षांचे पुढा-याजवळ प्रत्यक्ष जाऊन त्यांचे म्हणणे नीट समजावून व अभ्यासून  घेता येत होते. या परिस्थितीचा फायदा तरूण पिढीस त्यावेळीं होत होता. त्यावेळचे काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधीच्याकडे होते. त्यांच्या जनताभिमुख कार्यक्रमास तसेंच निस्वार्थ, त्याग, सत्य, अहिंसा या तत्वज्ञानाचा संपूर्णपणे विचार करून आम्ही व आमचा मित्रसमुह काँग्रेसमध्येंच स्थिर झाला.

सन १९२७ सालीं छत्रपती श्री शिवाजीमहाराजांचा त्रिशतसांवत्सरीक उत्सव सार्वजनीक वर्गणी जमा करून मोठ्या प्रमाणावर साजरा केला. त्या कार्यक्रमांत वाईचे राष्ट्रीय किर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धनबुवा आणि अहमदाबादचे राष्ट्रीय पोवाडेकार शाहीर पां. द. खाडीलकर एम्. ए. यांचे किर्तन, पोवाडे व गायनाचे कार्यक्रम ठेवण्यांत आले होते. राष्ट्रीय प्रचार कार्यक्रमामुळें उत्सव बहारीचा रंगला. लोकांना आमच्या प्रयत्नशील देशप्रेमाबद्दल कौतुक वाटू लागले. या व अशावेळीं सहृद्य मित्रद्व्यांच्या अंत:करणांत ज्वलंत देश-प्रेमाला भर आला.

सन १९२७ सालीं मद्रास येथील डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाबरोबर देशांतील काँग्रेसखेरीज मुस्लीम लीग, हिंदुमहासभा आदिकरून सर्वपक्षीयांची परिषद भरली. सर्वपक्षीय परिषदेनें हिंदी लोकांचे तात्पुरते समाधान करणा-या मागण्या कोणत्या हे ठरविण्याकरता एक कमिटी नेमली. त्यामध्यें पुढीलप्रमाणें सभासद होते.

पं. मोतीलाल नेहरू, सर अल्ली इमामस सर तेजबहादूर सप्रू, लोकनायक मा. कु. अणे, सरदार मंगलसिंग, शेख कुरेशी, नेताजी सुभाषचंद्र बोस, रा. बहादूर जी. आर. प्रधान अशा या कमिटीचे अध्यक्ष पंडीत मोतीलाल नेहरू होते.